ड्रॅगनफ्लायची संख्या घटल्यास रोगराईचे अराजक 

ड्रॅगनफ्लायची संख्या घटल्यास रोगराईचे अराजक 

धामापूर - आकाशात हजारोंच्या संख्येने भिरभिरणाऱ्या ड्रॅगनफ्लाय स्थानिक भाषेत  "चतुर' म्हणजेच भिंगऱ्यांची संख्या कमी होणे म्हणजे रोगराईला निमंत्रण आहे. गोड्या पाण्याच्या साठ्याच्या संवर्धनातून या भिंगऱ्यांचे संवर्धन शक्‍य आहे, असे मत डॉ. पंकज कोपर्डे यांनी व्यक्त केले. 

ड्रॅगनफ्लाय साऊथ एशिया कार्यशाळेस येथे प्रारंभ झाला. यामध्ये डॉ. कोपर्डे बोलत होते.  ड्रॅगनफ्लाय साऊथ एशिया, साऊथ एशियन कॉन्सिल ऑफ ओडोनॅटोलॉजी आणि धामापूरस्थित सिंधुदुर्ग वेटलॅण्ड ब्रीफ डॉक्‍युमेंटेशन कमिटीतर्फे ही कार्यशाळा आयोजित केली आहे. याचे उद्‌घाटन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी केले.

यावेळी डॉ. कोपर्डे, गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सभासद पराग रांगणेकर, कोलंबो विद्यापीठाचे (श्रीलंका) अमिला सुमनापाला आणि सिंधुदुर्ग वेटलॅण्ड ब्रीफ डॉक्‍युमेंटेशन कमिटीचे संदीप राणे यांनी संशोधकांचे स्वागत केले. 

13 ऑक्‍टोबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेमधे ड्रॅगनफ्लाय अर्थात भिंगरी किंवा चतूर अथवा हेलिकॉप्टर या कीटकांविषयीचे अध्ययन, संशोधन आणि संवर्धन केले जाणार आहे. याच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट करताना डॉ. कोपर्डे म्हणाले, ""चतुरांवर अत्यल्प प्रमाणात संशोधन झाले आहे. अतिशय सुंदर आणि विविध रंगांचे हे कीटक जवळपास 35 कोटी वर्षांपासून पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. जगभरात जवळपास सहा हजार जातींच्या चतुर आणि टाचण्या आढळून येतात. भारतात पाचशे वेगवेगळ्या जातींची नोंद आजपर्यंत झालेली आहे. महाराष्ट्रात, 133 जातींची नोंद करण्यात आलेली आहे. चतूरांच्या अंदाजे साठ जाती सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून नोंदवल्या गेल्या आहेत आणि यातील कित्येक जाती प्रदेशनिष्ठ आहेत. या प्रदेशनिष्ठ जाती पश्‍चिम घाट सोडता जगात इतरत्र कुठेच आढळत नाहीत. याचवर्षी मे महिन्यात हरिद्र टाचणी या विज्ञानासाठी नवीन जातीची नोंद देवगड तालुक्‍यामधून करण्यात आलेली आहे. चतुर (ड्रॅगनफ्लाय) आणि टाचण्या (डॅमसेलफ्लाय) प्रजननासाठी पाण्यावरती अवलंबून असल्यामुळे त्यांच्या अधिवासांना धोका पोहोचताच त्यांच्या संख्येवर अमुलाग्र परिणाम होतात. याच कारणामुळे चतुर आणि टाचण्या यांना अधिवासाच्या तब्येतीचे द्योतक मानले जाते. चतूर उपद्रवी कीटक खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात. डास आणि शेतीवर पडणाऱ्या कीडीला खाऊन चतूर मनुष्यांसाठी परिसंस्था सेवा पुरवतात. परिसंस्थांमधून चतूर जर नष्ट झाले तर उपद्रवी कीटकांची संख्या झपाट्याने वाढेल आणि शेतीचे न भूतो न भविष्यती नुकसान होईल तसेच डासांची संख्या वाढून रोगराई पसरेल. गोड्या पाण्याच्या साठ्यांच्या संवर्धनातूनच भिंगऱ्यांचे संवर्धन शक्‍य होणार आहे.'' 

"चतुरां'विषयी लवकरच संशोधन 
कार्यशाळेत देशाच्या वेगवेगळ्या भागांतून तसेच श्रीलंकेवरून संशोधक धामापूर येथे एकत्र आले आहेत. येत्या दिवसांमधे धामापूर तलाव परिसरात चतूरांविषयी संशोधन केले जाणार आहे. संशोधनामध्ये इच्छुक व्यक्तींनी डॉ. योगेश कोळी यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मान्यवरांनी उद्‌घाटन सोहळ्यात मार्गदर्शन केले.  
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com