esakal | पीएच.डी. शोधनिबंधातून ‘इन्फायनाइट अपटाइम’
sakal

बोलून बातमी शोधा

पीएच.डी. शोधनिबंधातून ‘इन्फायनाइट अपटाइम’

उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या कारखान्यांमध्ये यंत्रसामग्री उत्पादनादरम्यान ऐनवेळी बंद पडल्यास दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि परिणामी कोट्यवधींचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी डॉ. रौनक भिंगे या तरुणाने ‘इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज’ तंत्रज्ञानावर आधारित यंत्र बंद पडण्यापूर्वी सूचना देणारे ‘इन्फायनाइट अपटाइम’ स्टार्टअप सुरू केले आहे. त्या संदर्भात डॉ. भिंगे यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद.

पीएच.डी. शोधनिबंधातून ‘इन्फायनाइट अपटाइम’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

स्टार्टअप सुरू करण्याचा प्रवास कसा झाला?
मी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिकलो. त्यानंतर चेन्नई येथील आयआयटीमध्ये इंजिनिअरिंग डिझाइनची पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात बर्कले येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी पदवी संपादन केली. ‘डेटा ड्रिव्हन मॅन्युफॅक्‍चरिंग यूझिंग एक्‍स्टर्नल सेन्सर्स फॉर एनर्जी अँड टूल कन्डिशन मॉनिटरिंग’ हा संशोधनाचा विषय होता. त्या शोधनिंबधाचे रूपांतर स्टार्टअपमध्ये करण्याचे डोक्‍यात होते. त्यामुळे मी पुन्हा पुण्यात आलो आणि २०१६मध्ये औंध येथे ‘इन्फायनाइट अपटाइम’ स्टार्टअप सुरू केले. जगभरातील आयओटी सोल्यूशन कंपन्यांच्या क्रमवारीत ‘अपॅक सीआयओ आउटलुक’ संस्थेने ‘इन्फायनाइट अपटाइम’ला सर्वोत्कृष्ट दहा कंपन्यांमध्ये स्थान दिले आहे.

स्टार्टअप नेमके काय काम करते?
उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील कारखान्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री उत्पादनादरम्यान ऐनवेळी बंद पडते. त्यामुळे दुरुस्तीसाठी लागणारा वेळ, खर्ची पडणारे मनुष्यबळ, पैसा यामुळे उद्योगांचे कोट्यवधींचे नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी ‘इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज’ तंत्रज्ञानावर आधारित यंत्र बंद पडण्यापूर्वी सूचना देणारे ‘इन्फायनाइट अपटाइम’ हे मी मशिन तयार केले आहे. त्यामध्ये इंडस्ट्रिअल डेटा एनॅबलर हे छोटेसे उपकरण आणि संगणक प्रणाली विकसित केली आहे. ते यंत्रावर लावले असता सेन्सरच्या मदतीने कंपनांद्वारे माहितीचे विश्‍लेषण करते. त्यामुळे यंत्रात कधी व कोणता बिघाड येणार याचा अचूक अंदाज मिळू शकतो. त्यामुळे संबंधित मशिनची दुरुस्ती करणे शक्‍य होऊन भविष्यातील वेळ वाचविता येईल.

या स्टार्टअपसाठी निधी कसा उभारला?
या मशिनसाठीची संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यासाठी ‘मेफिल्ड सीड अँड सीरिज ए इन्व्हेस्टर्स’कडून १३ लाख ७० हजार डॉलर, ‘आयएलए अँड एफएस सीरिज ए इन्व्हेस्टर्स’कडून २० लाख डॉलर, जीएसआर व्हेंचर्स सीड अँड सीरिज ए इन्व्हेस्टर्सकडून १३ लाख ७० हजार डॉलर, ‘जीआयटीव्ही’कडून २६ हजार डॉलर, असा निधी उभारला आहे. भारतीय चलनामध्ये या गुंतवणुकीचे मूल्य ३० कोटी रुपये इतकी होते. 

loading image