मोबाईल स्क्रीनटाईमला आळा घाला

child attraction mobile
child attraction mobile sakal media

डॉ. समीर दलवाई

मोबाईल स्क्रीनटाईमला आळा घाला

तुमचा मुलगा, तुमचा मुलगा आहे. हजारो ॲप्समुळे त्याचं भवितव्य बदलणार नाही. मात्र ते बिघडण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना आई-वडिलांचे प्रेम, वेळ आणि आपुलकी द्या. त्यांच्यावर फक्त ओरडण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात वेळ वाया घालवू नका. त्यांचा मोबाईल सोडवायचा असेल तर मोबदल्यात प्रेम द्यावे लागेल. त्यांच्या बालपणाचा आनंद घ्या. मोबाईल देऊन तो खराब करू नका. ( Dr samir dalwai says have control on children mobile addiction - nss91)

लहान मुलांची लाईफस्टाईल बदलत चालली आहे. टीव्ही, गॅजेट्स, मोबाईल फोन, लॅपटॉप, कम्प्युटर आजच्या मुलांच्या दैनंदिन जीवनाचा एक हिस्सा झाला. पण त्याचा वापराचा अतिरेक होत चालला आहे. पालकांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. आई-वडीलच नाही तर काका, काकू, आजी-आजोबा नेहमीच आपला पाल्य मोबाईल कसा शिताफीने हाताळतो, याबद्दल कौतुक करत असतात. खरं तर मुलांच्या हाती मोबाईल देऊन पालकांना आपली कामे उरकता येतात. सध्या मुलं सरासरी सात ते आठ मोबाईल, गॅजेट्सचा वापर करतात. आता शाळा, अभ्यासक्रम ऑनलाईन झाल्यामुळे मोबाईलचा वापर वाढणार आहे.

मुलांचा स्क्रीनटाईम वाढला आहे. २४ तासांत मुले टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल, गॅजेट्सच्या स्क्रीनवर किती वेळ घालवतात, याला स्क्रीनटाईम म्हणतात. स्क्रीनटाईम वाढल्याने जगभरात चिंता व्यक्त होत आहे. मुलांसोबत पालक किती संवाद साधतात, वेळ घालवतात यावर त्यांची भाषा, संवादाचे कौशल्य, एकंदरीत विकास अवलंबून असतो. मात्र याकडेच सध्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. परिणामी आई-बाबा, आजी-आजोबा कसे वागतात, बोलतात हे शिकण्याऐवजी मुलं स्क्रीनवर कार्टून अॅनिमेशन पाहण्यात व्यस्त होतात, ते आभासी जग त्यांना खरं वाटायला लागतं. ते पालक, आजी-आजोबांना कॉपी करण्याऐवजी कार्टूनना कॉपी करतात. हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे.

मोबाईलचे व्यसन वाढायला लागले की मुलगा तो आनंद मिळवण्यासाठी इतर गोष्टी बंद करतो. तो बोलणे, भेटणे थांबवतो. त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान होतं. मुलांचा स्वत:वर ताबा राहत नाही. क्षणाक्षणाला मुलाचा मूड बदलतो. मोबाईल सोडून इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची समाजाशी नाळ तुटते. सामाजिक दुरावा निर्माण होतो. त्यात तो स्वत:ला अॅडजेस्ट करू शकत नाही. मुलं काही महिन्यांनी या आभासी जगात हरवून जातात. जुगार किंवा सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट करणे, कमी लाईक्स मिळाले तर निराश होणे, लाईक्स मिळाले तर विश्व जिंकल्याचा आनंद होणे या गोष्टीचा मुलाच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो.

स्मार्ट फोनमुळे हे प्रश्न वाढले आहेत. स्मार्ट फोनचे विश्व एवढे मोठे आहे, की मुलगा त्या आभासी जगात गुंतून जातो. फोनशिवाय जगात कुठल्याच गोष्टीची गरज नाही, असे त्याला वाटते. त्यामुळे मोबाईल फोनचे व्यसन हे या शतकातील सर्वात मोठे व्यसन आहे, असं आपण म्हणतो. त्यातून अनेक मानसिक, शारीरिक आजार मुलांना जडतात. ज्या घरात मोबाईल फोनची संख्या जास्त तिथं मोबाईलचे व्यसन जास्त असते. त्यातच ज्या मुलांची स्वतंत्र रूम असते, तिकडे या व्यसनात अधिक गुरफटून जाण्याचा धोका जास्त असतो. जे पालक स्वत: अमर्याद मोबाईल फोनचा वापर करतात, त्यांच्या पाल्यामध्ये मोबाईल व्यसनाचे प्रमाण अधिक असते.

अति मोबाईल वापरामुळे कामात उशीर होतो. भाषा, वाचन आणि विकासात खंड पडू शकतो. झोपेवर परिणाम होतो. स्क्रीनमधून येणाऱ्या प्रकाशझोतामुळे मुलांच्या मेंदूला आणि डोळ्यांवर परिणाम होतो. सोशल मीडियावर सातत्याने असल्यामुळे त्यांना एन्झायटी इन्सोमेनिया म्हणजे निद्रानाशाचा आजार जडतो. मोबाईलच्या नादात खाण्याचे प्रमाण वाढते. त्यातून वजन वाढते, हालचाली मंदावतात, त्यामुळे स्थूलता वाढते. स्वभाव दोष किंवा वर्तनाचे दोष अतिचंचलता, लक्ष नसणे, मानसिक आणि भावनात्मक समस्या वाढतात. अभ्यासावरही त्याचा व्यापक परिणाम होतो. मोबाईलचे व्यसन वाढले तर ड्रग्जप्रमाणे ॲडिक्ट होऊन मुलं मोबाईलसाठी वाटेत ते करतात.

स्वत:चे न्यूड, सेमी न्यूड पिक्चर्स, फोटो काढून पाठवणे या सर्व गोष्टींमुळेसुद्धा ब्लॅकमेलिंग वगैरे या सर्व गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे निराशा, सायकोलॉजिकल एन्झायटिक, पॅनिक हे सर्व प्रकार वाढतात. सायबर बुलिंगमुळे नवेच सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाईलचा अतिरेक थांबवण्यासाठी मुलासोबत स्वत:ला नियमावली आखून घेणे गरजेचे आहे. मोबाईल वापराची नियमावली, वेळा निश्चित करायला हव्यात. काही वेळ, काही जागा मोबाईल फ्री ठेवायला हव्यात. बेडरूम, डाईनिंग रूम मोबाईल फ्री झोन ठेवणे गरजेचे आहे. सुट्टीच्या दिवशी, जेवणाच्या वेळी मोबाईल न वापरण्याचे नियम ठरवायला हवेत. पालकांनी स्वत: मोबाईल स्क्रीनटाईम कमी केला तर मुलंही आपला कित्ता गिरवून मुलं आपल्याकडून चांगले गुण शिकू शिकतात.

मोबाईल फोन दिला की मुलं जेवतात हा भ्रम आहे. दोन वर्षापर्यंतच्या मुलांना अजिबात मोबाईल वापरू देऊ नये, असे इंडियन पीडियाट्रीक असोसिएशन सांगते. पाच वर्षांच्या मुलांना आपल्या देखरेखीत दिवसातून एक तास मोबाईल वापरायला किंवा पालकांसोबत लाईव्ह चॅट करू देण्यास काही हरकत नाही, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे. मुलांचा स्क्रीनटाईम कमी करायचा असेल तर त्यांच्या शारीरिक कसरत, खाणे-पिणे यासाठी वेळ द्या. मुलांशी सातत्याने संवाद साधा. घरात मुलांसोबत पकडापकडी, गाणी गाणे, अंताक्षरी भेंड्या खेळा. सहा वर्षांच्या मुलासाठी वेळ निश्चित करा. मुलाने एक ते दीड तास व्यायाम करायला हवा, हे लक्षात ठेवा.

ऑनलाईन अभ्यास करताना दर २० मिनिटांत, वीस सेंकद लांब असलेल्या वस्तूकडे बघावं. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. प्रत्येक तासामध्ये मुलांना दहा मिनिटांचा ब्रेक द्या, स्क्रीनची पोझिशन ३० डिग्री खाली असावी, आय लेव्हलच्या खाली स्क्रीन असायला हवा. मोबाईल एक फूट, डेस्क टॉप दोन फूट, टीव्ही दहा फूट. फॉण्ट साईज वाढवा. स्क्रीनची ब्राईटनेस कमी ठेवा. मुलांचे डोळे नियमित तपासा. मुलांना प्रायव्हसी सेटिंगबद्दल माहिती द्या. चुकीच्या गोष्टी ते पाहू शकतात. त्यामुळे त्याचे मित्र कोण आहेत. ऑनलाईन मित्र कोण आहेत, यावर लक्ष ठेवा. चूक केल्यास त्यावर ओरडू नका.

लहान मुलं रडतात म्हणून समजूत घालण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल देऊ नये. ॲप्समुळे आपला मुलगा न्यूटन, आईन्स्टाईन होईल अशी अपेक्षा धरू नका. तुमचा मुलगा, तुमचा मुलगा आहे. हजारो ॲप्समुळे मुलांचं भवितव्य बदलणार नाही. मात्र ते बिघडण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना आई-वडिलांचे प्रेम, वेळ आणि आपुलकी द्या. त्यांच्यावर फक्त ओरडण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात वाया घालवू नका. त्यांचा मोबाईल सोडवायचा असेल तर मोबदल्यात प्रेम द्यावे लागेल. त्यांच्या बालपणाचा आनंद घ्या. मोबाईल देऊन तो खराब करू नका.

‘बेस्ट ॲप्स इज अ पॅरेट्स लॅप्स’

‘चाईल्ड नीड्स मोअर स्माईल दॅन मोबाईल’

(लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

samyrdalwai@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com