पावसाळ्यात गाडी चालवताय? मग हे वाचाचं

ओंकार भिडे 
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मान्सून चांगलाच बहरात आहे. त्यामुळे अशा वेळी वर्षासहल वा लॉंग ड्राईव्हला जाण्याची इच्छा नक्कीच होईल; पण पावसाळ्यात वाहन चालवताना दक्षता घ्यायलाच हवी... 

आजपासून श्रावणास सुरुवात होणार असून, आता ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. मान्सून चांगलाच बहरात आहे. त्यामुळे अशा वेळी वर्षासहल वा लॉंग ड्राईव्हला जाण्याची इच्छा नक्कीच होईल; पण पावसाळ्यात वाहन चालवताना दक्षता घ्यायलाच हवी... 
--------------- 
पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी वा पाण्याच्या डोहात बुडालेला रस्ता असल्यास त्यातून गाडी नेण्याचे धाडस करावेसे वाटू शकते; पण हे धाडस करू नये. यामुळे आपण स्वतःचा व सहप्रवाशांचा जीव धोक्‍यात टाकतो. अनेकदा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत; तसेच चारचाकीत आपण सुरक्षित असतो. पाण्यात गाडी घालू, असा विचार करणे चुकीचे आहे. इंजिनाला पाणी लागल्यास इंजिन बंद पडू शकते. तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास वा अन्य कारणामुळे गाडी अडकल्यास सर्वांचेच जीव धोक्‍यात जातात. त्यामुळे पाणी रस्त्यावर अधिक प्रमाणात साठले असल्यास त्यात गाडी नेऊ नये. पुढील गाडी गेली; मग आपलीही जाईल, असा विचार करून गाडी घालणेही योग्य नाही. 

काय तपासावे 
- पावसाळ्यात दुचाकीचा टायर प्राधान्याने तपासावा. त्यावरील ग्रिप कमी झाली नाही ना, याची खात्री करणे आवश्‍यक आहे. कारण ग्रिप योग्य नसल्यास गाडी घसरण्याची शक्‍यता वाढते. 
- पावसाळ्यात टायरमधील हवेचा दाब तपासण्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक वाहनासाठी हवेचा दाब वेगळा असतो. त्यामुळे आपल्या वाहनासाठी हवेचा दाब किती आवश्‍यक आहे, हे जाणून घ्यावे. तसेच, तेवढाच दाब टायरमध्ये आहे ना, याची तपासणी हवा भरताना स्वतः करावी. प्रत्येक वाहन कंपन्यांकडून विशिष्ट मॉडेलच्या गाडीसाठी टायरमध्ये हवेचा दाब किती हवा, याचा उल्लेख करणारा स्टिकर वाहनावर लावलेला असतो. तसेच, मॅन्युअलमध्येही दिलेले असते. त्यामुळे ते जाणून घेऊन त्यानुसारच हवेचा दाब टायरमध्ये ठेवावा. 
- वाहनास डिस्क ब्रेक्‍स असल्यास ब्रेक ऑईल लेव्हल तपासावी. यावरच ब्रेकची क्षमता अवलंबून असते. तसेच दुचाकी असल्यास पुढील आणि मागील ब्रेक व्यवस्थित लागतो ना, हे तपासावे. परिणामकारक ब्रेकसाठी दुचाकीचा पुढील व मागील ब्रेक एकाच वेळी लावणे आवश्‍यक असते. यामुळे वाहनावर नियंत्रण मिळविता येण्यास अधिक मदत होते. 
- नव्या दुचाकींना व चारचाकींना ऑटो हेडलॅम्पची सुविधा आहे; पण जुन्या वाहनांना अशी सुविधा नाही. पावसात हेडलॅम्प लावण्यामुळे आपले वाहन दुसऱ्यांना दिसण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी दिवे व्यवस्थित लागत आहेत ना, हे तपासावे. तसेच, पावसात फॉगलॅम्प वा हेड लॅम्प सुरू ठेवावेत. 
- पावसळ्यात स्पार्कप्लगला पाणी लागल्याने वा आर्द्रतेमुळे वाहन सुरू होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळेच गाडी पुसण्याच्या कापडाव्यतिरिक्त आपल्याकडे आणखी एक कापड ठेवावे व ते भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. याचा उपयोग स्पार्क प्लग कोरडा करण्यास होतो. तसेच, टूल किटही सोबत असावे. 
- मोटरसायकलना इंजिनच्या पुढील बाजूस लावण्यात येणारे प्लॅस्टिक कोटेड करोगेट बॉक्‍सचे आयताकृती कव्हर लावू नये. यामुळे इंजिनवर परिणाम होतो. 
- पावसामुळे दृश्‍यमानता कमी झाल्याने रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन येत नाही. त्यामुळेच वायपर्स रबर ब्लेड, वायपरचा स्पीड व्यवस्थित सुरू आहे ना, याची खातरजमा ड्रायव्हिंग करण्यापूर्वी करा. 
- पावसाळ्यात टॉप गिअरवर वाहन चालविण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे. यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रिप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो. 

हायड्रोप्लेनिंग म्हणजे... 
कारही पाण्यामुळे घसरते आणि पावसाळ्यात असे प्रकार घडण्याचे शक्‍यता बळावते. त्यामुळेच असे होऊ नये यासाठी योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. पावसात वेगाने कार चालविणे धोकादायक असते. पावसामुळे साठलेल्या वा वाहत असलेल्या पाण्यामुळे चारचाकी घसरते. 
रस्ता व टायर यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास रस्त्यावरील टायरची ग्रिप कमी होते आणि वाहन घसरते. हायड्रोप्लेनिंगमध्ये पुढील टायरखाली मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने टायरची रस्त्यावरील पकड कमी होते आणि ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटतो. यालाच हायड्रोप्लेनिंग म्हणतात. पावसाळ्यात कार चालविताना रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होत असते. पावसात रस्त्यावर सांडलेले ऑईल आणि वाळलेले घटक पाण्याच्या प्रवाहात मिसळतात आणि यामुळे रस्त्यावर एक थर तयार होतो. त्यामुळे रस्ता निसरडा होतो आणि अशा वेळेस वेगाने वाहन गेल्यास वाहन नियंत्रणाच्या बाहेर जाते. त्यामुळेच पावसात गाडी पलटी होते. त्यामुळेच असे होऊ नये, यासाठी गाडीचा वेग नियंत्रितच ठेवणे आवश्‍यक आहे. 

हे तपासा अन्‌ करा 
- हायड्रोप्लेनिंग होत असल्याचे जाणवल्यास स्टिअरिंग सरळच ठेवावे. कारण स्टिअगिंर वळविल्यास कार उलटण्याचा धोका वाढतो. स्टिअरिंग सरळ ठेवल्याने मागील चाकांच्या तुलनेत पुढील चाकांची पकड परत मिळविता येऊ शकते. 
- साठलेल्या पाण्यातून ड्रायव्हिंग करणे टाळावे. कारण यामुळे हायड्रोप्लेनिंगची शक्‍यता वाढते. पाऊस पडायला लागल्यावर होणाऱ्या डबक्‍यांपासून सावधान राहावे. 
- हायवेवर क्रूझ कंट्रोलचा वापर केला जातो. पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना क्रूझ कंट्रोल वापरू नये. यामुळे आपल्याला रत्यावरील ग्रिपचा अंदाज लावता येतो. तसेच, वेग कमी करण्याची गरज आहे, हे कळते. 
- उतारावर वा नागमोडी वळणावर टॉप गिअरवर गाडी ठेवल्यास हायड्रोप्लेनिंगचा धोक कमी होतो. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच एक गिअर कमी ठेवावा. पावसात शार्प टर्न घेऊ नये. यामुळे वाहन उलटू शकते. 
- कारला अँटी ब्रेकिंग सिस्टिम व ईबीडी नसल्यास हळूहळू ब्रेकचा वापर करावा. करकचून ब्रेक लावल्यास वाहनाची चाके एकदम लॉक होतात आणि वाहन घसरू शकते. त्यामुळे एकदम वेग वाढविणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driving in the rainy season? Then read this