‘ॲप’निंग : लाभले अम्हांस भाग्य टंकतो मराठी

Social-Media
Social-Media

सध्या सोशल मीडियामुळे मोबाईल वापर खूपच वाढला आहे. सोशल मीडियाच्या जगात आपण सातत्याने संदेश पाठवत असतो. मित्र-मैत्रिणींबरोबर संवाद साधतो. गप्पा मारतो (चॅट). हे सगळे मातृभाषेतून करायला मिळाले, तर ती मजा काही औरच.

हल्ली अनेक जण आपले काही फोटो सोशल मीडियावर अपडेट करत असताना त्यासोबत काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही या क्षणांविषयी आपल्या मातृभाषेतून लिहिण्याकडे सर्वांचा कल असतो. याचे कारण उघडच आहे. आपल्या भावना मातृभाषेत आणि सहजपणे व्यक्त करता येतात, तेवढ्या त्या अन्य भाषेत येतीलच, असे नाही. पण होते असे, की मोबाईलवरील इंग्रजी ‘की-बोर्ड’ हा जास्त अंगवळणी पडलेला असतो. त्यामुळे मातृभाषेत लिहिताना अडचण होते. परंतु, काही ॲप्सच्या मदतीने आपण इंग्रजीत टाइप केलेले मराठीत येऊ शकते.

अशा प्रकारच्या विविध ‘ॲप’च्या मदतीने आपले मराठीत लिहिण्याचे काम सोपे होते. अशाच एका ‘ॲप’विषयी आपण माहिती घेऊ. ‘जी-बोर्ड’ नावाचे हे ॲप आहे. प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करून आपल्याला दिलेल्या की- बोर्डच्या पर्यायांपैकी एका पर्यायाची आपण निवड करायची असते. समजा, आपण ‘इंग्रजी टू मराठी’ या पर्यायाची निवड केली आहे. त्यानंतर ‘की-बोर्ड’वर आपण इंग्रजीत काही लिहिल्यास ते मराठीत दिसेल. सध्या सोशल मीडियामुळे या ‘ॲप’ची मागणी वाढली असून, या ‘ॲप’चा तरुणाई सर्रास वापर करताना दिसत आहेत. कारण कमी वेळात आपल्याला आपल्या मातृभाषेत या ‘ॲप’च्या मदतीने काहीही पटकन टाइप करता येते.

जी-बोर्ड हे ॲप ॲन्ड्रॉइड आणि आयएसओ सिस्टीम मोबाईलसाठी कार्यप्रणीत आहे. या ॲपची मूळ भाषा ही इंग्रजी आहे. जीबोर्डचा वापर आपण मराठीव्यतिरिक्त आणखी काही भाषांच्या वापरासाठीही करू शकतो. यामध्ये गुगल व्हॉइस टायपिंगसोबत फक्त मातृभाषेतील अक्षरे टाइप करण्याचाही पर्यायही उपलब्ध आहे. त्याचबरोबर, आपण हॅंडरायटिंग नावाच्या पर्यायाचा वापर करून लिहूनही टाइप करू शकतो. वेगवेगळ्या थीमचाही यामध्ये वापर करता येऊ शकतो. तसेच, शब्दांच्या अचूकतेसाठी ऑटो-करेक्‍शन नावाच्या पर्यायाचा वापर करून आपण आपले लिखाण आणखी अचूक करता येऊ शकते.

जी-बोर्ड ॲपचा वापर करताना, आपण एक वैयक्तिक शब्दकोशही तयार करू शकतो. आपल्या शब्दकोशातील शब्दांना आपल्याला या ॲपच्या मदतीने शॉर्टकटही तयार करता येतात. तसेच या कीबोर्डचा आकार व उंचीही आपल्याला ठरवता येते. एक्‍स्ट्रा शॉर्ट, शॉर्ट, मिड-शॉर्ट, नॉरमल, मिड-टॉल, टॉल, एक्‍स्ट्रा टॉल, असे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या कीबोर्डमध्ये क्रमांकाचा पर्याय ठेवायचा की नाही, हा पर्यायसुद्धा या कीबोर्डवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर, कीबोर्डवर स्पेस ‘की’ला आपण ईमोजी किंवा कीबोर्ड बदलण्याच्या पर्यायासाठीही वापरू शकतो. लेआऊटसाठी ‘राईट-हॅंडेड मोड’ किंवा ‘लेफ्ट हॅंडेड मोड असेही दोन पर्याय उपलब्ध आहेत. कीबोर्डवर टाइप करत असताना साउडसाठी या ‘ॲप’द्वारे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

स्पेल चेक नावाचा पर्यायही ॲपमध्ये उपलब्ध असल्याने इंग्रजीत टायपिंगच्या चुका होण्याची शक्‍यता कमी आहे. आपल्याला नको असलेली अक्षरेही कीबोर्डच्या मदतीने ब्लॉक करता येऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com