पृथ्वीच्या "समूळ जैविक नाशा'ची प्रक्रिया सुरु...

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

उपलब्ध असलेल्या शास्त्रीय माहितीच्या आधारे जागतिक लोकसंख्येत मोठी घट होण्याबरोबरच जगभरातील विविध प्राण्यांच्या हजारो जाती समूळ नष्ट होण्याची शक्‍यता अत्यंत दाट आहे

न्यूयॉर्क - पृथ्वीवर "समूळ जैविक नाशा'ची प्रक्रिया सुरु झाली असल्याचा अत्यंत गंभीर इशारा जागतिक पातळीवरील एका प्रतिथयश नियतकालिकामधील शोधनिबंधामधून देण्यात आला आहे. पृथ्वीवर याआधी पाच वेळा "जैविक नाशा'चे (मास एक्‍टिंक्‍शन) संकट येऊन गेल्याचे शास्त्रज्ञांना अभ्यासांती आढळले आहे.

नैसर्गिक कारणांमुळे या आपत्ती येऊन गेल्या होत्या. मात्र आता पृथ्वीने "समूळ जैविक नाशा'च्या सहाव्या चक्रात याआधीच प्रवेश केल्याचा इशारा अमेरिकेतील "नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस' या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या शोधनिबंधामधून देण्यात आला आहे. "वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे जगात सर्वत्र धोक्‍यात आलेली प्राण्यांची वसतिस्थाने,' हे पृथ्वीवर ओढविलेल्या या संकटामागील मुख्य कारण असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. 

मेक्‍सिकोमधील संशोधक गेरार्डो सेबालोस, स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या पॉल आर एर्हलिच व रोडोल्फो डिर्झो यांनी या शोधनिबंध प्रकाशित केला आहे. "उपलब्ध असलेल्या शास्त्रीय माहितीच्या आधारे जागतिक लोकसंख्येत मोठी घट होण्याबरोबरच जगभरातील विविध प्राण्यांच्या हजारो जाती समूळ नष्ट होण्याची शक्‍यता अत्यंत दाट आहे,' असे सेबालोस यांनी म्हटले आहे.

वन्य प्राण्यांचे धोक्‍यात आलेले अधिवास, प्रदूषण, हवामान बदल अशा विविध घटकांचा अभ्यास करुन या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. जमिनीवरील सुमारे 30% "व्हर्टिब्रेट्‌'स जातीचे प्राणी (सस्तन, पक्षी, सरिसृप इत्यादी) नष्ट होण्याच्या या धोक्‍याचा सामना करत आहेत; तर जगभरातील विविध भागांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे सस्तन प्राण्यांच्या विविध जातींमधील 70% सदस्य नष्ट होत आहेत.

या अभ्यासामध्ये चित्ता, बोर्निओ व सुमात्रा येथील ओरॅंगओटान, आफ्रिकेमधील सिंह अशा विविध भागांमधील प्राण्यांच्या घटणाऱ्या संख्येचा विशेषत्वाने अभ्यास करण्यात आला आहे.

'मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वी विषारी होत असल्याची,' भावना एर्हलिच यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Era of 'biological annihilation' is underway, scientists warn