सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील एथिकल हॅकिंग

प्रमोद गायकवाड
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

प्रत्येक संस्था आणि शासकीय विभाग माहिती साठविताना पासवर्ड देऊन किंवा अन्य साधनांचा वापर करून त्या माहितीच्या सुरक्षेचीही काळजी घेतात. तथापि संगणकाच्या या युगात काळजी घेऊनही अनेक लोक या माहितीची चोरी करतात. या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञालाच अशी चोरी करता येते. पूर्वी जेव्हा माहिती कागद किंवा फाइलमध्ये साठविली जायची, तेव्हा कागदपत्रे किंवा फाइल गहाळ व्हायच्या. त्याच प्रकारे संगणकीय माहितीची चोरी म्हणजे ‘हॅकिंग.’ अशा प्रकारे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी हॅकिंगचे अधिकृत काम करणाऱ्यांना ‘एथिकल हॅकर’ म्हणतात. या क्षेत्रात संभाव्य करिअरच्या संधी, सायबर सिक्‍युरिटीबाबत या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.
- प्रमोद गायकवाड, संचालक, सिलिकॉन व्हॅली

एथिकल आणि अनएथिकल हॅकिंग
बॅंकेतून एखाद्याच्या अपरोक्ष दुसऱ्याने परस्पर पैसे काढून घेतले किंवा पाकिस्तानच्या एखाद्या हॅकरने भारतीय संरक्षण खात्याची गोपनीय माहिती पळवली किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा डेटा दुसऱ्या एका स्पर्धक कंपनीने मिळवला, अशा बातम्या आपल्या कानावर सतत पडत असतात. या बातम्यांमधील मास्टर माइंड म्हणजे हॅकर. पण हे मास्टर माइंड आपल्या ज्ञानाचा उपयोग कुठल्या तरी चोरीच्या उद्देशाने, फसवणूक करण्यासाठी करत असतात. चोरलेली माहिती ते अनैतिक कामासाठी करतात आणि त्यातून गुन्हेगारी स्वरूपाचे काम होते. अशा प्रकारच्या हॅकिंगला ‘अनएथिकल हॅकिंग’ म्हटतात. दुष्ट प्रवृत्तीचे लोक नेहमीच अनएथिकल हॅकिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हे करतात.

या क्षेत्रातील वाईट लोकांचा शोध घेऊन, त्यांच्यावर वचक ठेवण्याचे, हॅकिंग होणार नाही अशा नवनव्या प्रणाली शोधणे, सायबर गुन्ह्यांचा तपास किंवा तपासात सहकार्य करण्यासाठी हॅकिंग केले जाते, त्याला ‘एथिकल हॅकिंग’ म्हणतात. हे सर्व करताना या लोकांनाही आपल्या ज्ञानाचा उपयोग करून हॅकर्सच्या संगणकातून, नेटवर्कमधून माहिती गोळा करावी लागते. थोडक्‍यात, चोर आणि पोलिस यातील जो फरक आहे, तोच अनएथिकल आणि एथिकल हॅकिंगमध्ये आहे.

एथिकल हॅकर करिअरसाठी पात्रता

  • संगणकाचे सखोल ज्ञान 
  • आपल्या ज्ञानाचा योग्य गोष्टींसाठी उपयोग करण्याची तयारी
  • सुरक्षेच्या उपाययोजना 
  • नैतिक अधिष्ठान 
  • संवादकौशल्य 
  • डिटेक्‍टिव्ह माइंड 
  • नवनवीन प्रणालींचा अभ्यास आणि बदलांची माहिती

‘एथिकल हॅकिंग’मधील करिअर
एथिकल हॅकिंगचे कोर्सेस अनेक संस्थांमार्फत चालविले जातात. विद्यापीठे, महाविद्यालये आणि काही खासगी संस्था हे कोर्सेस शिकवतात. प्रवेश घेताना कोर्सेसचा कालावधी, शुल्क आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षकांचे ज्ञान. या गोष्टी बघणे आवश्‍यक ठरते. अनेक संस्था कोर्सेस तर चालवतात, पण त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नसलेले शिक्षक असतात. अशा परिस्थितीत ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार’ या न्यायाने विद्यार्थी नीट शिकू शकत नाहीत आणि हे विद्यार्थी पुढे फिल्डवर अपयशी ठरतात. 

या कोर्सला प्रवेश घेताना अजून एक महत्त्वाची गोष्ट बघणे, या क्षेत्राची आवड. विद्यार्थ्याला आवड असेल तरच या क्षेत्रात यावे. कारण हे काही दहा ते पाच असे रुटीन काम नाही. इथे तुमच्या डोक्‍याचा, स्किलचा, लॉजिकचा पुरेपूर वापर करावा लागतो. एखाद्या गुन्ह्याची उकल करताना रात्रंदिवस विचार करावा लागतो. अत्यंत बारीकसारीक गोष्टी बघाव्या, शोधाव्या लागतात. त्यामुळे अशी तयारी असणाऱ्या डिटेक्‍टिव्ह माइंडच्या तरुणांनी या क्षेत्रात यायला हरकत नाही. हे कोर्सेस केल्यानंतर अनेक संस्था, कंपन्या किंवा सायबर गुन्हे शाखेत करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
 

एथिकल हॅकरची जबाबदारी 
एथिकल हॅकर्स हे सायबर / इंटरनेट क्षेत्रातील सुरक्षारक्षक आहेत. खासगी, शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत त्यांना काम करावे लागते. पोलिस जशी समाजकंटक, चोर, दरोडेखोर अशा गुन्हेगारांपासून समाजाला सुरक्षित ठेवतात, तसेच सायबर क्षेत्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी एथिकल हॅकर्स निभावतात. एथिकल हॅकर्सला सर्वप्रथम सायबर चोरांची मानसिकता समजून घ्यावी लागते. डेटा चोरीसाठी ते काय करतात, कोणत्या युक्‍त्या योजतात, पासवर्ड ब्रेक कसा करतात, कशासाठी करतात या गोष्टी समजावून घेतल्या, तर पुढचे काम सोपे होते. या बाबी समजल्या तर चोरी कशी रोखता येईल? हॅकर्सचा पत्ता कसा शोधता येईल? त्यांच्यावर आळा कसा बसवता येईल, या गोष्टी शोधणे एथिकल हॅकर्सला सोपे जाते. 

अनेक गुन्हेगारांशी संबंध आल्याने, गुन्ह्यांची उकल केल्याने पोलिसांना अनुभवांती जसे त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ माहीत असते, तसेच एथिकल हॅकर्सलाही बऱ्याच गोष्टींचे ज्ञान असते. चोरांची मानसिकता, त्यांची कमजोरी, कच्चे दुवे, कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी ते कशा पळवाटा शोधतात या सर्व गोष्टींवर हॅकर्सला विचार करावा लागतो. थोडक्‍यात सायबर चोर ज्या अनैतिक गोष्टी करण्यासाठी आपले ज्ञान वापरतो तेच ज्ञान एथिकल हॅकरला चोऱ्या पकडण्यासाठी वापरावे लागते. चोर डेटा पळविण्यासाठी प्रयत्न करतो, तर एथिकल हॅकर डेटा वाचविण्याच्या प्रयत्नात असतो.

एथिकल हॅकर्सची गरज 
संगणक आणि संगणकाचा विविध कामांतील उपयोग अपरिहार्य झाला आहे. संगणक न येणारी व्यक्ती आता निरक्षर समजली जाते. शिक्षण, बॅंकिंग, लेखन, अकाउंट, संरक्षण, विज्ञान या सर्व क्षेत्रांत आता संगणक वापरला जातो. परीक्षा देण्यापासून तर निकाल बघेपर्यंत, रजेचा अर्ज लिहिण्यापासून तर मेलपर्यंत सर्वच गोष्टीत संगणक वापरला जातो. प्रत्येक कार्यालय, संस्थेत, कंपनीत एक दिवस जरी संगणक प्रणाली बंद पडली तर संपूर्ण काम ठप्प होते. संगणकासोबत आलेल्या अनेक फायद्यांसोबत संगणकातील हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटाची चिंता प्रत्येक युजरला करावीच लागते. एखाद्या हॅकरची वक्रदृष्टी संगणकावर पडू नये, यासाठी अनेक उपाययोजना करणे अपरिहार्य बनते. या उपाययोजना करण्यासाठी आता एथिकल हॅकर्सची मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागली आहे. थोडक्‍यात, सायबर क्षेत्रातील पोलिसांची भूमिका निभावण्यासाठी एथिकल हॅकर्स निर्माण होणे, ही काळाची गरज आहे.

‘हॅकर्स’चे उद्योग
सॉफ्टवेअर, सुरक्षाप्रणाली, वेबसाइटवर ॲटॅक झाल्याचे दिसताच त्याची माहिती काही हॅकर्स योग्य ऑथिरिटीज्‌ना देतात. त्यावर सुरक्षेचे उपाय योजतात. काही हॅकर स्वतः दुसऱ्याची माहिती हॅक करून त्याचा गैरफायदा घेतात किंवा ती माहिती दुसऱ्यांना विकतात. काही डिस्ट्रक्‍टिव्ह हॅकर्स दुसऱ्यांच्या संगणकावर ॲटॅक करून तिथली माहिती नष्ट करतात किंवा त्या माहितीत अन्य माहिती टाकून देतात. संगणकाची हार्डडिस्क नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक मजेत किंवा बदला घेण्यासाठी असे कृत्य करतात.

सायबर गुन्हा म्हणजे काय? 
संगणक, इंटरनेटचा वापर करून केलेले गुन्हेगारी कृत्य म्हणजे सायबर गुन्हा. उद्देश एकच. आर्थिक, मानसिक फसवणूक, दुसऱ्याचे नुकसान करणे. अनेक समाजकंटक, आर्थिक घोटाळेबाज या मार्गाचा अवलंब करतात. काही आफ्रिकन देशांतील लोक आणि पाकिस्तानी यात आघाडीवर आहेत. लॉटरी लागल्याचे अनेक मेल, मेसेज आपल्याला येत असतात. हे सर्व फेक असतात आणि यांची निर्मिती अनेक सायबर गुन्हेगार लोकांकडून होते. थोडक्‍यात तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवण्याचा प्रकार म्हणजेच सायबर गुन्हा. या गुन्हेगारांना शोधण्याचे काम एथिकल हॅकर्सला करावे लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ethical hacking in cyber security sector