सतत जीपीएस वापरामुळे मेंदू निष्क्रिय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

सध्या आपण कोणत्याही नव्या पर्यटनस्थळी किंवा शहराच्या कानाकोपऱ्यात जाण्यापूर्वी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करतो. "अति परिचयात अवज्ञा' याप्रमाणे सतत जीपीएसच्या वापराने मेंदूतील काही भाग निष्क्रिय होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून दिसले. 

सध्या आपण कोणत्याही नव्या पर्यटनस्थळी किंवा शहराच्या कानाकोपऱ्यात जाण्यापूर्वी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करतो. "अति परिचयात अवज्ञा' याप्रमाणे सतत जीपीएसच्या वापराने मेंदूतील काही भाग निष्क्रिय होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून दिसले. 

नवे ठिकाण शोधण्यासाठी जीपीएसचा वापर करीत असतो, पण ही सुविधा वापरण्यामुळे मेंदूतील एक भाग बंद होतो जो प्रत्यक्षात जाण्याच्या विविध मार्गाचे दृश्‍यीकरण करीत असतो. त्यामुळे मेंदूची नैसर्गिक क्षमता कमी होते असा याचा दुसरा अर्थ आहे. नवीन संशोधनानुसार जीपीएसचा अतिरेकी वापर हा अशा प्रकारे मेंदूच्या नैसर्गिक क्षमता कमकुवत करतो. 
"युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन'च्या संशोधकांनी लंडनमधील दिशा शोधणाऱ्या 24 स्वयंसेवकांवर हा प्रयोग केला त्यात त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंगही करण्यात आले होते. 

यानंतर असे दिसून आले की, आपल्या मेंदूचा जो भाग स्मृती व दिशाशोधनाचे काम करतो किंवा नियोजन व निर्णय घेण्याचे काम करतो त्या प्रिफ्रंटल कॉर्टेक्‍स भागाच्या नैसर्गिक क्षमतेवर परिणाम होतो. किंबहुना त्याच्या काही क्षमता वापर न झाल्याने बंद होतात. लंडनच्या रस्त्यांच्या जाळ्याला मेंदूतील भाग कसे प्रतिसाद देतात हेदेखील यांत पाहिले गेले. 
जेव्हा स्वयंसेवक जीपीएसशिवाय मार्ग शोधत होते तेव्हा ते नवीन भागात गेल्यानंतर हिप्पोकॅम्पस, प्रिफ्रंटल कॉर्टेक्‍स हा भाग सक्रिय दिसला. जेव्हा पर्यायी रस्त्यांची संख्या वाढली तेव्हा त्यांची सक्रियता जास्त वाढली पण जेव्हा त्यांनी सॅटनॅव्ह ही उपग्रहआधारित दिशादर्शन प्रणाली वापरण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मेंदूतील सक्रियता कमी झाली. जेव्हा रस्त्यांच्या अनेक पर्यायातून मार्ग निवडायचा असतो तेव्हा हिप्पोकॅम्पस व प्रिफ्रंटल कॉर्टेक्‍स काम करते, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे ह्युगो स्पायर्स यांनी सांगितले. 

संभाव्य मार्गांचे दृश्‍यीकरण हिप्पोकॅम्पस करीत असते व कोणत्या मार्गाने आपण योग्य ठिकाणी पोहोचू हे प्रिफ्रंटल कॉर्टेक्‍स हा भाग ठरवत असतो. आता आपल्याकडे कोणत्या दिशेने जायचे हे ठरवण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञान आहे, पण ते वापरताना मेंदूत ही क्रिया नैसर्गिक पद्धतीने काम करणारे भाग बंद होतात त्यांच्यात सक्रियता राहता नाही. मेंदूला रस्ते निवडण्याच्या कामात स्वारस्य रहात नाही, असे त्यांनी सांगितले. 

यापूर्वीच्या संशोधनानुसार लंडनच्या टॅक्‍सीचालकांच्या मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग रस्ते व संबंधित खुणा लक्षात ठेवताना प्रसरण पावतो. नवीन संशोधनानुसार उपग्रह दिशादर्शन प्रणाली वापरताना हिप्पोकॅम्पस हा भाग निष्क्रिय होतो व शहरातील रस्त्यांचे जाळे नैसर्गिकरीत्या समजून घेण्याची क्षमता मेंदू गमावून बसतो. जर्नल नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात हे संशोधन विस्तृत दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GPS devices switch off part of the brain: study