चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

देशात टिकटॉक, हॅलो, युसी ब्राउझर आणि शेअरईट सारख्या 59 चिनी अॅपवर सोमवारी बंदी घालण्यात आली आहे. मात्र आपले हजारो फॉलोव्हर्सला गमावण्याचे दुःख बहुतांश टिकटॉक कलाकारांनी आपल्या शेवटच्या व्हिडीओ मधून दर्शविले.

पुणे, ता. 30 : कॉमेडी, भावुक थॉट, डान्ससह अनेक बाबींचे व्हिडीओ बनवणारे व त्यांना लाखो फॉलोव्हर्स असलेले टिकटॉक आणि हॅलो या चिनी अप्लिकेशनवरील मंडळी पहिल्याच दिवशी पर्यायी अप्लिकेशनकडे ओळली आहेत. देशात टिकटॉक, हॅलो, युसी ब्राउझर आणि शेअरईट सारख्या 59 चिनी अॅपवर सोमवारी बंदी घालण्यात आली आहे. मात्र आपले हजारो फॉलोव्हर्सला गमावण्याचे दुःख बहुतांश टिकटॉक कलाकारांनी आपल्या शेवटच्या व्हिडीओ मधून दर्शविले. तसेच आपल्याला इतर अप्लिकेशनवर फॉलो करण्याचे आवाहनही त्यांनी फॉलोव्हर्सला केले.

टिकटॉक हे मनोरंजनाचा एक मोठा पर्याय म्हणून देशात मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. लॉकडाऊनच्या काळातही अनेक मालिका आणि चित्रपट जगातील कलाकारांनी या ऍपच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संबंध जोडून ठेवले होते. मात्र या ऍपमुळे देशवासीयांच्या प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होत असल्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याबाबतचे स्पष्टीकरण देत लवकरच सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक करून टिकटॉक आपली बाजू मांडणार असल्याचे टिकटॉककडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान या चिनी ऍपच्या जागी काही स्वदेशी ऍप नेटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

"लॉकडाऊनच्या काळात टिकटॉकचा वापर करण्यास सुरुवात केली होती. माझी डान्स अकादमी आहे आणि या ऍपच्या माध्यमातून फक्त माझ्या विद्यार्थ्यांपर्यंतच नाही तर विविध शहर आणि गावांमध्ये सुद्धा डान्स पोहोचविणे शक्य झाले. यूट्यूबवर इतका प्रतिसाद मिळत नाही. पण आता पुन्हा फेकबूक पेज, इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलचा पर्याय निवडावे लागत आहे."
- भरत सऊद, नृत्य प्रशिक्षक- फ्लायइंग स्टेपर्ज 

टिकटॉकर्स म्हणतात इन्स्टाग्राम, युट्यूब आणि रोपोसोवर करा फॉलो : 
टिकटॉक माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना देशातील प्रत्येक भागात पोहोचणे शक्य झोले. देशात 14 भाषांमध्ये हे ऍप उपलब्ध असून यामध्ये नवोदित कलाकार, शिक्षक व कवी यांसारख्या विविध क्षेत्रातील नागरिक आपला उदरनिर्वाह करत होते. काही कलाकारांना तर लॉकडाऊनच्या काळात प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र टिकटॉक बंद होणार असल्याची माहिती मिळताच सर्व वापरकर्त्यांनी लाईव्ह येऊन किंवा व्हिडिओ शेअर करून आपल्या फॉलोव्हर्सला त्यांना इन्स्टाग्राम, रोपोसो आणि युट्यूब चॅनेलवर फॉलो करण्यास सांगितले. यातील बहुतांश कलाकारांनी शासनाच्या या निर्णयाला आपले समर्थन दिले.

"हॅलो ऍपच्या माध्यमातून व्हिडिओ, मिम्ससारख्या गोष्टी शेअर करणे सोपे होते. परंतु आता इंस्टाग्रामचा वापर करणार आहे. तसेच व्हिडिओसाठी टेलिग्राम पर्याय वापरणार."
- प्रतीक जावडे, मिम्स ग्रुप- पुणेचे अव्हेन्जेर्स

चिनी ऍपसाठीचे पर्याय
चिनी ऍप : पर्यायी स्वदेशी व इतर ऍप 
टिकटॉक, हॅलो, लाईक : रोपोसो, मित्रो, चिंगारी, डबस्मॅश, यूट्यूब/इन्स्टाग्राम
शेअरईट, झेंडर : जिओ स्विच, शेअर ऑल, फाईल्स बाय गूगल
युसी ब्राउझर : फायरफॉक्स, जिओ ब्राउझर, क्रोम 
क्लब फॅक्ट्री : फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, अमेझॉन
झूम : गूगल मेट, से नमस्ते, मायक्रोसॉफ्ट टीम
यू डिक्शनरी : इंग्लिश हिंदी डिक्शनरी
पॅरेलल स्पेस : क्लोन ऍप (डुअल ऍप), ऍप क्लोनर 
ब्यूटीप्लस : बी612, लाईटएक्स फोटो एडिटर
कॅमस्कॅनर : डॉक स्कॅनर, ऍडॉब स्कॅन, मिक्रोसॉफ्ट लेन्स
विवा व्हिडीओ : फोटो व्हिडीओ किंग मेकर, पावर डायरेक्टर

"मागील दोन वर्षांपासून टिकटॉकचा वापर करत आहे. यावर माझी फॉलोव्हर्सची संख्या सुमारे 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. पण सरकारच्या या निर्णयाचे विरोध न करता मी सर्व फॉलोव्हर्ससाठी युट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणार आहे."
- प्राची मोरे

रोपोसो, मित्रो आणि चिंगारीचा बोलबाला

रोपोसो, मित्रो आणि चिंगारी हे ऍप टिकटॉक सारखेच आहेत व यांची निर्मिती देशातच झाली आहे. दरम्यान टिकटॉक बंद होणार असल्याची माहिती मिळाल्यावर टिकटॉकवरील कलाकारांनी आता या तीन ऍपला निवडण्यास सुरुवात केल्याचे काही कलाकारांनी खुद्द आपल्या टिकटॉककवरील व्हिडिओमार्फत सांगितले आहे.

ऍपचे नाव : डाउनलोड करण्यात आलेला आकडा
रोपोसो : 50 कोटीहून अधिक
मित्रो : 10 कोटीहून अधिक
चिंगारी : 10 लाखाहून अधिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian apps options for banned chinese apps roposo mitro and chingari most download