सर्च इंजिनचे हे ‘गणित’ जाणून घ्या

Search-Engine
Search-Engine

एखाद्या उद्योगापर्यंत योग्य माणसे योग्य वेळेला येतात, तेव्हा तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. तुमची वेबसाइट/ उत्पादन किंवा सेवा कंपनीसाठी सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे, जेव्हा नवीन ग्राहक तुमच्यापर्यंत पोचतात किंवा कुणी गुगलवर सर्च करते, तेव्हा तुम्ही पहिल्या पाच लिंक्सपैकी एक असता. सर्चमध्ये पहिल्या पाच लिंक्सपैकी तुमच्या कंपनीची लिंक असावी, यासाठी सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ).

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे दीर्घकालीन प्रयत्नांतून साध्य होत असते. टॉप लिंक्समध्ये समाविष्ट होण्यासाठी नवीन उद्योगांना (त्यांचे उत्पादन आणि इतर गोष्टी गृहीत धरून) किमान तीन ते पाच महिने सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अर्थात खूप फायदे असले, तरी अनेक उद्योजक एसईओला गांभीर्याने घेत नाहीत-कारण ‘गुगल, फेसबुक किंवा ट्विटरवरचे योग्य ट्रॅफिक कुणी तरी ‘खरेदी’ केलेले असते’ अशा प्रकारची माहिती मार्केटिंगमधल्या कुठल्या तरी ‘मित्रा’ने ‘पटवून’ दिलेली असते. तर मग सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे खरेच महत्त्वाचे आहे का? आपण ‘गुगल’कडून योग्य ‘वाचक’ ‘खरेदी’ का करू शकत नाही?...त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला एसईओचे वेगवेगळे पैलू माहीत करून घेतले पाहिजेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एसईओ कशासाठी?
नेटिझन्सचा ‘अटेन्शन स्पॅन’ हा खरे तर चिमणीच्या ‘अटेन्शन स्पॅन’पेक्षाही कमी असतो. त्यामुळे तुमच्या वेबसाइटकडे येऊ शकणाऱ्या संभाव्य वाचकाचे लक्ष वेधून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट असते. तुम्ही परंपरागत व्यवसायात असाल आणि ‘डिजिटल’चा विचार आधीपासून केला नसेल, तर तुम्हाला अनेक ‘डिजिटल फर्स्ट’ व्यवसायांशी स्पर्धा करावी लागेल. इंटरनेटने नवीन स्टार्टअपसाठी ‘ऑनलाइन प्रेझेन्स’ तयार करणे अतिशय सोपे केले आहे आणि त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढली आहे. गुगलवरचे ‘पे पर क्लिक्स’ (पीपीसी) उपक्रम खूप महाग असतात, त्यामुळे तुम्ही फक्त त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. 

सर्च इंजिनचे उद्दिष्ट म्हणजे ‘सर्च क्वेरी’ ला अनुसरून योग्य, ‘रिलेव्हंट’ निष्कर्ष तुमच्यापर्यंत पोचवणे. युजर एखादी ‘क्वेरी’ टाइप करत असतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सर्च इंजिनकडे डेटाबेस असावा लागतो. प्रत्येक सर्च इंजिनकडे वेबसाइट कंटेंट गोळा करणे आणि त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे यासाठी पद्धती असतात. त्याला ‘इंडेक्सिंग’ म्हणतात. सर्च इंजिनकडे ‘बॉट’ किंवा ‘क्राऊलर्स’ नावाचे घटक असतात, जे सातत्याने वेब स्कॅन करत असतात.

क्राऊलर्स नक्की काय वाचतात?
१. वेबसाइटवरील कंटेंट : सर्च इंजिन बॉट्स वेबसाइटचे प्रत्येक पान स्कॅन करतात, वेबसाइट काय कव्हर करते याचा शोध घेतात आणि काही टॅग्ज, तपशील यांच्यासाठी वेबसाइटचा बॅक-एंड कोडसुद्धा स्कॅन करत असतात.
२. तुमच्याबरोबर कोण लिंक होत आहे?: सर्च इंजिन बॉट्स वेबपेजेस स्कॅन करत असतात, तेव्हा ते इतर वेबसाइट्सच्या लिंक्ससुद्धा शोधत असतात. वेबसाइटमध्ये जितक्या इनबाऊंड लिंक्स असतील, तेवढा तिचा प्रभाव जास्त असतो. प्रत्येक इनबाऊंड लिंकमुळे त्या वेबसाइटचे वजन अधिकाधिक वाढत जाते.

सर्च इंजिन्स वेबसाइटवरील ट्रॅफिक, तुमच्या वेबसाइटवरचा बाऊन्स रेट, पेज स्पीड, सोशल मीडिया हँडल्स, विविध प्लॅटफॉर्म्सवरचे तुमचे रेप्युटेशन आदी सर्व गोष्टींचा विचार करत असतात. फक्त सर्च इंजिन्सपुरते काहीही करून नका. तुमची वेबसाइट कोण वाचणार आहे, त्या माणसांचा विचार करा. कारण सर्च इंजिन्स हे मानवी वर्तनाच्या पॅटर्न्सनुसारच वागायचा प्रयत्न करत असतात.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वाढविण्यासाठी....
वेबसाईट कंटेंट फॉरमॅटिंग

कंटेंटच्या विषयांवबरोबरच वेबपेजेसचा फॉरमॅट्स हासुद्धा सर्च इंजिन बॉट्सवर प्रभाव टाकणारा भाग असतो. प्रत्येक वेबपेजमध्ये वाचकाचे लक्ष वेधणारे, विचारप्रवृत्त करणारे शीर्षक आणि त्याचबरोबर वेबपेज कव्हर करत असलेल्या विषयाचा कीवर्ड किंवा फ्रेझ हीसुद्धा असली पाहिजे. काही कीवर्ड्‌स किंवा फ्रेझेस बोल्ड करणे अशा गोष्टींमधूनही तुम्ही ऑप्टिमाइझ करत असलेल्या या फ्रेझेसचे महत्त्व ठसू शकते.

वेबसाइट यूआरएल स्ट्रक्चर
तुमच्या वेबसाइटच्या यूआरएलचा आराखडा सर्च इंजिनकडून इंडेक्सिंग होण्याच्या क्षमतेवर आणि तुमच्या वेबसाइटचा कंटेंट समजून घेण्यावर परिणाम करत असतो. यूआरएल आराखडा अधिक ऑर्गनाइझ्ड किंवा शिस्तबद्ध असेल तर त्याचा परिणाम जास्त होतो. तुम्ही यूआरएल संपादित करून त्यात तुमच्या वेबपेजचे शीर्षक समाविष्ट करू शकत असाल, तर तसे नक्की करा. 
चुकीचा यूआरएल : www.yourwebsite.com/aeghbs49063fskgd.html 
योग्य यूआरएल : www.yourwebsite.com/buy-best-furniture-in-pune.html

चित्र आणि छायाचित्रांचे फाइल नेम्स
तुम्ही वेबसाइटवर अपलोड करत असलेल्या प्रत्येक चित्राला एक फाइल नेम असते. हे चित्र वेबसाइटमध्ये समाविष्ट होत असते, तेव्हा ते फाइल नेम वेबसाइटच्या सोर्सेस कोडमध्ये किंवा एचटीएमएलमध्ये तसेच राहत असते. सर्च इंजिन्स वेबसाइटचा कोड स्कॅन करत असल्यामुळे शक्यतो त्या चित्राची माहिती सांगणारे फाइल नेम दिले पाहिजे. उदाहरणार्थ, pic12345.jpg च्या ऐवजी White-tennis-shoes.jpg हे जास्त योग्य ठरेल.
      
हेडलाइन टॅग्ज
सर्च इंजिन बॉट्स वेबपेजेस स्कॅन करत असतात, तेव्हा ते वेबपेज नक्की कशा संदर्भात आहे याबाबत क्लूज शोधत असतात. त्यामुळे वेबपेजवरचे कीवर्ड्‌स इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे दाखवले, तर हे कीवर्ड्‌स इतरांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असे सर्च इंजिनला दाखवले जाते. त्यामुळेच पेजमध्ये हेडलाइन टॅग्ज वापरणे महत्त्वाचे असते. वेगवेगळे हेडलाइन टॅग्ज  वापरून (प्रत्येक टॅगला वेगवेगळ्या आकाराचे शीर्षक असेल) तुम्ही तुमच्या वाचकासाठी वाचन सोपे करत असताच; पण त्याचबरोबर सर्च इंजिनलाही त्या पेजवर काय महत्त्वाचे आहे याबाबत क्लूज देत असता. 

तुमच्या साइटवरील इतर पेजेसच्या लिंक्स
वेबसाइटवरील, ब्लॉगवरील किंवा इतर विशिष्ट वेबपेजेससाठी कंटेंट तयार करत असताना तुम्हाला तुमच्याच वेबसाइटवरील इतर पेजेसचा संदर्भ देण्याची गरज भासू शकते. तुम्ही या पेजेसच्या लिंक्स समाविष्ट करून मजकुरातच संदर्भ देऊ शकता. 

वेबसाइटरील मजकुराच्या अंतर्गत असलेल्या लिंक्सचे उदाहरण 
तुम्ही दुसऱ्या वेबपेजचा किंवा दुसऱ्या वेबसाइटचा संदर्भ देत असता, तेव्हा अशा लिंक्स देणे जास्त योग्य. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा अँकर टेक्स्ट वापरत असता, तेव्हा त्याचा अर्थ त्या अँकर टेक्स्टमधला कीवर्ड किंवा फ्रेझ ही लिंक केलेल्या पेजची संबंधित आहे असा होतो. सर्च इंजिनचे लक्ष वेधून घेण्याचा हा मार्ग आहे. 

हे मुद्दे लक्षात घ्या

  • सर्च इंजिन्स स्मार्ट असतात. तुम्ही एकाच विषयावरची खूप वेबपेजेस तयार केलीत तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला खूप विषय कव्हर करणारा वैविध्यपूर्ण कंटेंट तयार करावा लागेल.
  • तुमचा एकूण व्यवसाय/ व्हॅल्यू प्रपोझिशन आणि तुमच्याकडे येणारे व्हिजिटर्स यांना देण्याजोगी उच्च प्रतीची किंवा सर्वसाधारण माहिती या गोष्टी कव्हर करण्यासाठी तुमचे होमपेज वापरा. तुमच्या वेबसाइटवरचे जेनेरिक कीवर्ड्‌स तुमच्या होमपेजवर असले पाहिजेत. 
  • तुम्ही काही उत्पादने किंवा सेवा उपलब्ध करत असलात, तर त्या प्रत्येकासाठी विशिष्ट वेबपेज तयार करा.
  • तुमच्या वेबसाइटवरील ज्या ठिकाणी शिक्षण, सल्ले किंवा टिप्स या गोष्टी कव्हर केल्या जातात त्यांच्यासाठीच्या लिंक्स देणारे एक वेबपेज तयार करा.
  • खूप मोठा कंटेंट तयार करण्यासाठी; तसेच ताजेपणा राहण्यासाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे. नियमितपणे ब्लॉगिंग करण्यातून (आठवड्यातून एकदा हे आदर्श) एसईओवर अतिशय मोठा परिणाम होतो- कारण प्रत्येक ब्लॉग पोस्ट हे एक नवीन वेबपेज असते.
  • सर्च इंजिन्ससाठी मजकूर लिहू नका. तुमच्या वाचकांसाठी लिहा. प्रत्येक वेबपेजला एक स्पष्ट उद्दिष्ट असेल आणि एकाच विषयावर भर असेल याची खबरदारी घ्या.

एसईओची पातळी तपासा
https://www.seoptimer.com/ या वेबसाइटवर जा आणि तुमच्या वेबसाइटचा पत्ता टाइप करून विनामूल्य विश्लेषण करून घ्या आणि सर्च व्हिजिबिलिटीसाठी काय करता येईल ते जाणून घ्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com