मोबाईल वापरामुळे ब्रेन ट्युमरचा धोका 

हर्षदा परब
Saturday, 2 September 2017

पाश्चिमात्य देशांमध्ये 1970 ते 80 च्या दशकात आलेल्या तंत्रज्ञानचे दुष्परिणाम दिसत असल्याचा यापूर्वी अनेकदा उल्लेख झालेला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये यासंदर्भातील आकडेवारी उपलब्ध आहे.

मुंबई : वाढत्या तंत्रज्ञानामुळे जगणे सुकर झाले असले तरी त्याने शारीरिक तोटेही वाढले आहेत; याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. टाटा कर्करोग रुग्णालयाच्या न्युरो ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. राकेश जलाली यांच्या मते मोबाईलच्या अती वापराने ब्रेन ट्युमर होण्याचा धोका मोठा आहे. 10 वर्षे दिवसाला 6 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरल्यावर ब्रेन ट्युमरचा धोका उद्भवू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.
 
किशोरवयीन आणि तरुणांमध्ये असलेल्या कर्करोगाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयाने परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी डॉ. जलाली यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

पाश्चिमात्य देशांमध्ये 1970 ते 80 च्या दशकात आलेल्या तंत्रज्ञानचे दुष्परिणाम दिसत असल्याचा यापूर्वी अनेकदा उल्लेख झालेला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये यासंदर्भातील आकडेवारी उपलब्ध आहे. भारतात सध्यातरी अशी आकडेवारी नसल्याकडे डॉ. जलाली यांनी लक्ष वेधले. 

डॉ जलाली यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणांमध्ये ब्रेन ट्युमरची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण हे मोबाईल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

लहान वयातच मुले मोबाईलकडे वळू लागल्याने हा धोका अधिक वाढल्याचे ते सांगतात. भारतात यासंदर्भातील आकडेवारी नसली तरी टाटा कर्करोग रुग्णालयाच्या न्युरो ऑन्कॉलॉजी विभागात याबाबतचा रिसर्च सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जलाली पुढे सांगतात मोबाईलचा वापर थांबवा असं सांगू शकत नाही; परंतु, तो कमी करणे किंवा त्यासाठी पर्यायी सोय करणे गरजेचे आहे. 

काय काळजी घ्याल?

  • फोनवर अधिक काळ बोलायचे तर हेडफोनचा वापर करा 
  • आंघोळीनंतर अंग ओले असताना फोन वापरणे टाळा 
  • लहान मुले फोनवर झोपतात; ते टाळा 
  • झोपताना फोन उशाशेजारी किंवा जवळ ठेवू नका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Health Mobile effects on brain tata cancer hospital