#NationalYouthDay सांगलीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली हायब्रीड सायकल बाजारपेठेच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

सांगली - सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेली स्वयं चार्जिंगद्वारे धावणारी सायकल आता बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे. ही संकल्पना आता वाहन व  सायकल कंपन्यांनी स्वीकारली आहे.

सांगली - सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेली स्वयं चार्जिंगद्वारे धावणारी सायकल आता बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे. ही संकल्पना आता वाहन व  सायकल कंपन्यांनी स्वीकारली आहे.

पंजाबमधील एका सायकल कंपनीशी याबाबत बोलणी झाली असून अशी हायब्रीड सायकल लवकरच बाजारात दिसू शकेल असा आत्मविश्‍वास महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. पारिष्वाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

राजीव गांधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी कमिशनचे सेंटर म्हणून वालचंदची निवड केली होती. समाजोपयोगी संकल्पनांचा विकास व्हावा या हेतूने कमिशनने महाविद्यालयीन स्तरावर अशा संकल्पनांना अर्थिक बळ दिले. त्याचाच एक भाग म्हणून वालचंदच्या  इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि मेकॅनिकल विद्याशाखांनी संयुक्तपणे हायब्रीड रीजनरेटिंग बायसिकलच्या निर्मितीचा संकल्प केला. विपुल वाडकर, सूरज अग्रवाल अदित्य पुसदकर, श्रीधर काळे या विद्यार्थ्यांसह अमर परांजपे, डी. एस. मोरे, सुहास जगताप, विजय मोहाली या प्राध्यापकांनी या संकल्पनेवर आजवर काम करताना आता अशी सायकल बाजारपेठेत आणण्याची पूर्ण तयारी केली आहे.

डॉ. अनिल काकोडकर यांनी काही महिन्यांपूर्वी या  सायकलची पाहणी करून उद्योजकांसोबत यापुढे या प्रोजेक्‍टचे संशोधन आणि विकास कामकाज सुरू ठेवावे असा सल्ला दिला. आता पंजाबमधील एका सायकल कंपनी तसेच बॅटरीवरील वाहने निर्माण करणाऱ्या दोन कंपन्यांशी महाविद्यालयाची बोलणी सुरू झाली आहेत.  या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ही संकल्पना स्वीकारली  असून लवकरच बाजारपेठेतही अशा सायकली दिसू शकतील. तासी वीस ते बावीस किलोमीटर वेगाने ही सायकल पायंडलिंग न करता धावू शकते; मात्र त्यासाठी तीन तास आधी पायडलिंग करावे लागते. त्यानंतर  सुमारे चाळीस किलोमीटर ही सायकल विना पायडलिंग धावू शकते. यातही आणखी संशोधन सुरू आहे.

आकड्यात
० वजन १८ किलो.
० वेग तासी २२ किलोमीटर.
० अंदाजित खर्च १७ हजार.

या सायकलीच्या पेटंटसाठीचा प्रस्तावही तयार केला आहे. किंमत, वजन आणि वेग या मुद्द्यावर काही वाहन कंपन्यांसोबतही चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून हे प्रॉडक्‍ट बाजारात यशस्वी होऊ शकते, असा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उत्साह वाढला आहे.
- डॉ. जी. व्ही. पारिष्वाड, 

संचालक, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Youth Day Special Hybrid cycle