
आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हा अत्यंत परवलीचा शब्द ठरला आहे. तुम्ही भलेही ‘एआय’ हा शब्दही ऐकला नसेल किंवा त्याच्या क्लिष्ट संगणकीय तंत्रज्ञानाविषयी परिचित नसाल; परंतु तुमचे जीवन मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने प्रभावित झाले आहे. मोबाईलपासून ते अवकाशात उड्डाण करणाऱ्या अंतराळयानापर्यंत; नित्याच्या आरोग्य निदानापासून ते अणू-रेणूंचा अभ्यास करणाऱ्या संशोधन शाखेपर्यंत सर्वच क्षेत्रांतील तंत्र विकसन प्रणालीमध्ये ‘एआय’मुळे आमूलाग्र बदल घडत आहे.