‘धनगरी फेटा’च्या शोधाने शिरपेचात तुरा

राजेंद्र बाईत
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

राजापूर - तालुक्‍यातील जांभ्या दगडाच्या कातळावरील डबक्‍यामध्ये फुलणाऱ्या एरिओकॅलॉन रयतीयनम चांदोरे, बोरुडे अँड एस. आर. यादव या जागतिकस्तरीय नव्या फूलवनस्पतीचा शोध लागला आहे. या फूलवनस्पतीला ‘धनगरी फेटा’ असे म्हटले जाते. या नव्या संशोधनामुळे तालुक्‍याच्या कातळ परिसरामध्ये दुर्मिळ वनस्पतींचा खजिना असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

राजापूर - तालुक्‍यातील जांभ्या दगडाच्या कातळावरील डबक्‍यामध्ये फुलणाऱ्या एरिओकॅलॉन रयतीयनम चांदोरे, बोरुडे अँड एस. आर. यादव या जागतिकस्तरीय नव्या फूलवनस्पतीचा शोध लागला आहे. या फूलवनस्पतीला ‘धनगरी फेटा’ असे म्हटले जाते. या नव्या संशोधनामुळे तालुक्‍याच्या कातळ परिसरामध्ये दुर्मिळ वनस्पतींचा खजिना असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. नव्याने संशोधित झालेली फूलवनस्पती तालुक्‍यातील कोबे, साखर, करेल आणि आडिवरे परिसरातील कातळावरील डबक्‍यामध्ये आढळते.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कातळासह जंगलात विविध दुर्मिळ वनस्पतींचा खजिना असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एका नव्या वनस्पतीची भर पडली आहे. कातळात डबक्‍यामध्ये फुललेली नावीन्यपूर्ण वनस्पती डॉ. एस. आर. यादव यांच्यासह आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे आणि सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांना सविस्तर माहिती मिळाली नाही. शिवाजी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ व डॉ. एस. आर. यादव यांच्यासह डॉ. चांदोरे, संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे, प्रतीक नाटेकर, नीलेश माधव यांनी या फूलवनस्पतीवर गेली तीन वर्षे संशोधन केले. ही नवीन फूलवनस्पती जगासमोर आणली आहे. 

न्यूझिलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅकसा’ या जागतिक दर्जाच्या नियतकालिकाने या फूलवनस्पतीच्या संशोधनाची दखल घेतली. ९ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या अंकामध्ये नवसंशोधित जागतिक फूलवनस्पती म्हणून नोंद केल्याची माहिती प्रा. चांदोरे यांनी दिली. या संशोधनामध्ये त्यांना आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, प्रा. संतोष मेंगाल, प्रा. नंदकुमार साळुंके, प्रा. विजय देवकर, प्रा. किरण पाटोळे, प्रा. डॉ. विनोदकुमार गोसावी यांचे सहकार्य लाभले.

रयत संस्थेबद्दल कृतज्ञता
१९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून डॉ. कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली केली. ‘रयत शिक्षण संस्थे’ने शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे. संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयात प्रा. डॉ. अरुण चांदोरे गेली ६ वर्षे वनस्पतीशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अशा संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नव्या फूलवनस्पतीचे ‘रयतीयनम’ असे नामकरण करण्यात आले.

ठळक वैशिष्ट्ये

  •  नर, मादी अशी दोन प्रकारची फुले 
  •  झाडाची उंची २५ ते ४५ सें.मी. 
  •  (खोल पाण्यात ६० सें.मी.पर्यंत)
  •  पाने ५ ते ८ सेंटीमीटर लांब
  •  फुलांचा गुच्छ ७ ते ८ मिलिमीटर
  •  जुलै ते डिसेंबरपर्यंत आढळते
  •  जगात ४००, भारतात १०५ प्रजाती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New flowering plant found in Rajapur Taluka