नोकिया पुन्हा 'कनेक्‍ट' होतोय

mobile handset
mobile handset

"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले. नोकियादेखील मोटोरोलाला रेटून जगाच्या बाजारपेठेत विशेषत: युरोप आणि आशियायी बाजारपेठेत एवढा रूजला होता की मोबाईल म्हणजेच नोकिया अशी पक्की धारणा बनली होती. गुगलने नवी ऑपरेटिंग सिस्टम आणली... अँड्रॉईड. यावर आधारित नवे मोबाईल हॅंडसेट बाजारात आले. तसे नोकियामध्ये काहीच कमी नव्हते. माझ्याकडे शेवटचा नोकिया फोन (एन 7, लॅपटॉपसारखा फोल्ड होणारा) पाच वर्षांपूर्वी होता, त्याला हात न लावता ब्ल्यू टूथ हेडसेटच्या साह्याने ऑपरेट करता येत असे. फोन न पाहता आलेले मसेजेस ब्ल्यूटूथ हेडफोनवरून ऐकता येत असत. म्युझिक स्ट्रीमिंगदेखील फोनला स्पर्श न करता येत असे. पण नोकियाने "सिम्बियन ओएस'मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले नाहीत.

वाऱ्याची दिशा ओळखून त्यानुसार बदल करण्यात नोकिया अपयशी ठरले. अँड्रॉईड मात्र विशिष्ट कालावधीनंतर नव्या अवतारात येऊ लागले. ते लोकांना एवढे भावले की अँड्रॉईड हा परवलीचा शब्द बनला. त्यावर आधारित मार्केट जगभर विस्तारले आणि अनेक नव्या कंपन्यांचा जन्म झाला. मोबाईलचे जग बदलत असताना मार्केटमधील मक्तेदारीच्या मस्तीमुळे सिम्बियन ओएस काही बदलली नाही आणि नोकियाला ग्राहकांनी गाशा गुंडाळायला लावले.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने 2014 मध्ये नोकिया प्रचंड पैसा ओतून खरेदी केली आणि हा व्यवहार आतबट्याचा ठरल्याचे लक्षात आल्यानंतर नोकिया फॉक्‍सकॉन या तैवानी कंपनीला विकून टाकली. डिजिटल क्षेत्राशी परिचित असलेल्या सर्वांना फॉक्‍सकॉन नक्कीच माहिती असणार. मोबाईल उत्पादनात असलेली जगातील कोणतीही कंपनी फॉक्‍सकॉनची मदत घेतेच. मग आयफोन बनविणारी ऍपल असो किंवा सॅमसंग. फॉक्‍सकॉनने काही दिवसांपूर्वी तिची उपकंपनी एचएमडी ग्लोबलशी मोबाईल उत्पादनासाठी करार केला. एचएमडीने आता नोकिया फोन नव्याने बाजारात उतरविण्यासाठी कंबर कसली आहे. अर्थातच जगाला खुणावणाऱ्या अँड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित.

"सुलभता. विश्‍वासार्हता. अत्युच्च दर्जा. आम्ही जनतेसाठी नव्या कोऱ्या आणि असामान्य शक्‍यतांचे दालन खुले करत आहोत. त्याची सुरवात नव्या स्मार्टफोनने 2017 या वर्षात करत आहोत...'' हा निरोप सध्या नोकियाच्या वेबवर चाहत्यांचे स्वागत करत आहे. हा स्मार्टफोन नेमका कसा असेल हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा होती; मात्र कंपनीने ते अद्याप गुलदस्तात ठेवले आहे. नव्या नोकियाची डिजिटल वर्ल्डकडे पाहण्याची दृष्टी नेमकी कशी असेल याविषयी असलेला एक व्हिडिओ लक्ष आकर्षित करून घेतो. त्यावरून नोकिया मोठ्या ताकदीने बाजारात उतरणार असल्याचे स्पष्ट होते. थोडक्‍यात काय तर मोबाईल जगतात नवी स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचा लाभ आपणास चांगले स्मार्टफोन कमी रोकडा देऊन मिळण्यात झाला तर काय वाईट. म्हणून नोकियाच्या दुसऱ्या इनिंगला भरपूर शुभेच्छा देऊ या. चला आम्हालाही घ्या कनेक्‍ट करून.....

कॅशलेस होताना...
कॅशलेस व्हायचे म्हणजे नेमके काय हे परवापर्यंत (8 नोव्हेंबर) अनेकांना कळत नव्हते. उलट पैसेच खिशात नसतील तर करायचे कसे, असा प्रश्‍न विचारला जाई. परंतु गेल्या काही दिवसांत परिस्थिती एवढ्या वेगाने बदलली की कॅशलेस म्हणजे काय हे आता समजावून सांगायची गरज पडत नाही. कॅशलेस व्हायचे म्हणजे, पैशांची प्रत्यक्ष देवाणघेवाण न करता व्यवहार करायचे. त्यासाठी आता अनेक पद्धती आहेत. कार्ड किंवा प्लास्टिक मनी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेतच, त्याच्या जोडीला केवळ मोबाईलच्या आधारे व्यवहार सोपा करणारे तंत्रज्ञान चांगलेच विकसित झाले आहे. त्यामुळे मोबाईल वॅलेट किंवा डिजिटल वॅलेटचा वापर वाढला आहे. कॅशलेस व्यवहारासाठी काही साधने अशी आहेत- पेटीएम, फ्रीचार्ज, ऑक्‍सिजन, मोबीक्विक, पेयू मनी, ओला मनी, जियो मनी वॅलेट, एमरूपी, सायट्रस वॅलेट, एमपेसा, एअरटेलमनी, इनमोबी आणि विविध बॅंकांचे वॅलेट ऍप्स. यापैकी तुम्हाला कोणता पर्याय सुलभ वाटतो तो निवडा आणि कॅशलेस व्यवहार करून काळा पैसा निर्माण होण्यास ब्रेक लावण्यासाठी हातभार लावा.

जाता जाता
मोबाईलमध्ये नवे काय?

मोबाईल वर्ल्ड तंत्रज्ञानात जितक्‍या झपाट्याने बदल होत आहेत तेवढा वेग अन्य कोणत्याही क्षेत्राचा नाही. चिनी कंपनीने पहिला होलोग्राफिक मोबाईल तयार केला होता. आणखी काही कंपन्या त्यावर काम करत आहेत. 2017 मध्ये पूर्ण विकसित मोबाईल हॅंडसेट येण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर मोबाईलचे जग अंतर्बाह्य बदलेले दिसेल. तुम्ही कॉल डायल केलेली व्यक्ती फोनबाहेर येऊन तुमच्याशी बोलू शकेल, एवढेच नाही तर त्याच्याशी शेकहॅंडदेखील करता येईल. 3-डी प्रिंटिंगमध्ये क्रांती होईल आणि अनेक वस्तू किंवा प्रयोग तुम्ही जागेवर बसल्या बसल्या करू शकाल. ऑनलाईन मार्केटिंगला नवा बूस्ट मिळेल कारण तेथील सामग्री तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे दिसायला लागेल. ही तर नव्या मोबाईल क्रांतीची सुरवात आहे, आणखी बरंच काही होईल. कल्पनेतही शक्‍य नसणाऱ्या गोष्टी घडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com