ऑनलाइन किराणा डिलिव्हरी

वैभव पुराणिक (लॉस एंजलिस)
बुधवार, 25 जानेवारी 2017

अमेरिकेच्या बाजारपेठेत सध्या अनेक ऑनलाइन किराणा माल घरपोच देणाऱ्यांनी गर्दी केली आहे. यात इन्स्टाकार्ट, फ्रेश डिरेक्‍ट, यमी डॉट कॉम अशा नवीन कंपन्यांबरोबर ऍमेझॉन आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. "गुगल एक्‍स्प्रेस' आणि "ऍमेझॉन प्राइम फ्रेश'मुळे दूध, अंडी, पाव, फळे, भाज्या आता अमेरिकन लोकांना घरबसल्या ऍप अथवा वेबसाइटवरून मागवता येत आहेत.

अमेरिकेच्या बाजारपेठेत सध्या अनेक ऑनलाइन किराणा माल घरपोच देणाऱ्यांनी गर्दी केली आहे. यात इन्स्टाकार्ट, फ्रेश डिरेक्‍ट, यमी डॉट कॉम अशा नवीन कंपन्यांबरोबर ऍमेझॉन आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. "गुगल एक्‍स्प्रेस' आणि "ऍमेझॉन प्राइम फ्रेश'मुळे दूध, अंडी, पाव, फळे, भाज्या आता अमेरिकन लोकांना घरबसल्या ऍप अथवा वेबसाइटवरून मागवता येत आहेत.

वास्तविक, अशा प्रकारची सुविधा भारतातल्या अनेक भागांत- विशेषतः महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांत अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या भारतभेटीत मी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लोक फोन करून खालच्या वाण्याकडून सामान मागवताना पाहिले आहे. काही ठिकाणी तर नुसता वाणी नव्हे, तर भाज्या आणि दूधही मागवलेले पाहिले आहे. तेही विनाशुल्क - म्हणजे डिलिव्हरी चार्ज न देता! अमेरिकेत मात्र बहुतेक ठिकाणी अशी सेवा उपलब्ध नाही. भारतातल्या मोठ्या शहरांपेक्षा अमेरिकेत अशा सेवेची गरज जास्त आहे. अमेरिकेतल्या बहुतेक शहरांमध्ये तुम्हाला दूध, अंडी आणि पाव आणण्यासाठीही दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जावे लागते. हे अंतर पायी चालणे सोयीस्कर नाही, त्यामुळे गाडीतून जाणे भाग पडते. मुंबई अथवा पुण्यात नुसते सोसायटीतून खाली उतरले, की लगेच आपल्याला अत्यावश्‍यक गोष्टी मिळू शकतात, त्यासाठी गाडी काढायची गरज लागत नाही. तसेच भारताच्या तुलनेने इथे लोक अशा गोष्टी कमी वेळा घेतात; पण जास्त प्रमाणात घेतात. उदाहरणार्थ, सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी घरात अर्धा किंवा एक लिटर दूध आपण दररोज घेतो. पण एखाद्या अमेरिकन घरात हेच दूध आठवड्यातून एकदाच एक गॅलन (3.84 लिटर) घेतले जाते. हे दूध फ्रिजमध्ये ठेवले असता एक महिनाभरही टिकते. भाज्यांचीही तीच गोष्ट आहे. आम्ही अमेरिकेत आठवड्यातून एकदा- वीकएंडला सुपरमार्केट मध्ये जातो व पूर्ण आठवड्याला लागणारे सर्व सामान घेऊन येतो. मुंबई किंवा पुण्यात डाळी, तांदूळ वगैरे गोष्टी आपण लांब कालाकरिता आणतो; पण दूध, भाज्या मात्र एक किंवा दोन दिवसाला पुरेल इतक्‍याच आणतो. अमेरिकेच्या मोठ्या शहरात तर मोठ्या स्टोअरमध्ये पार्किंगचीही समस्या असते. माझ्या लॉस एंजेलिसजवळच्या घराजवळच कॉस्को नावाचे एक खूप मोठे डिपार्टमेंटल स्टोअर आहे. इथे सर्व वस्तू घाऊक प्रमाणातच मिळतात. इथे किमती अतिशय स्वस्त असल्याने खूप गर्दी असते आणि खूप गर्दी असल्याने आणि प्रत्येक माणूस गाडी घेऊन आल्याने याचा पार्किंग लॉटही भरलेला असतो. इथे पार्किंग मिळण्यासाठी कधी कधी पंधरा मिनिटे चकरा माराव्या लागतात अथवा थांबावे लागते. तसेच कॉस्को हे स्टोअर लॉस एंजेलिसमध्ये सर्वत्र नाही. जवळजवळ वीस किलोमीटर परिसरात एकच कॉस्को आहे. म्हणजे काही लोकांना या स्टोअरमधून खरेदी करण्यासाठी तब्बल वीस किलोमीटर अंतर गाडीने यावे लागते. तरुणांचे एक वेळ ठीक आहे. पण ज्येष्ठ नागरिकांना अशा स्टोअरमधून सामान आणणे बरेच त्रासदायक ठरते. तसेच ज्यांच्याकडे तान्ही मुले आहेत त्यांना तान्ह्या मुलांना घेऊन स्टोअरमध्ये जाणेही त्रासदायक ठरते. त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या वस्तू कुणी घरपोच आणून देत असेल तर त्यासाठी जादा पैसे खर्च करायचीही अमेरिकन माणसाची तयारी असली तर त्यात नवल नाही. डिलिव्हरी चार्ज देऊनही तुम्ही कॉस्कोमधून भरपूर खरेदी करत असाल, तर पैसे वाचतीलच. याच बाजारपेठेला काबीज करण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्नशील आहेत.

अशाच काही प्रमुख सेवांचा आपण या लेखात आढावा घेणार आहोत. गुगलच्या किराणा माल सेवेचे नाव त्यांनी आधी "गुगल शॉपिंग एक्‍स्प्रेस' असे ठेवले होते. ते बदलून आता नुसतेच "गुगल एक्‍स्प्रेस' असे केले आहे. गुगलने या क्षेत्रात मार्च 2013 च्या आसपास पदार्पण केले. सुरवातीला त्यांनी कुठलाही आकार न देता चाचणी सेवा सॅन फ्रान्सिस्को व सिलिकॉन व्हॅली (बे एरिया) या भागात सुरू केली. नंतर सप्टेंबर 2013 मध्ये ही सेवा जाहीररीत्या चालू केली गेली. 2014 च्या मेमध्ये ही सेवा न्यूयॉर्क व लॉस एंजेलिस शहरातही चालू करण्यात आली. नंतर हळूहळू अमेरिकेतील अनेक शहरात या सेवेचा विस्तार करण्यात आला. या सेवेअंतर्गत "गुगल एक्‍स्प्रेस'चे ऍप ग्राहकाला डाऊनलोड करावे लागते. या ऍपमधून काही ठराविक असलेल्या स्टोअरमधील वस्तू निवडायच्या. या वस्तूंच्या किमती त्या स्टोअरमधील किमतींइतक्‍याच असतात. या वस्तू मग शॉपिंग कार्टमध्ये टाकायच्या. त्याचे पैसे आपोआपच गुगल वॉलेटमधून वजा केले जातात. गुगलची माणसे मग त्या स्टोअरमधून या सर्व वस्तू घेऊन आपल्याला त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी आणून देतात. ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना गुगलला महिना दहा डॉलर किंवा वर्षाला 95 डॉलर शुल्क (सदस्यत्व) द्यावे लागते. या सदस्यत्वात घरातील दोन माणसांचा समावेश असतो. म्हणजे एकाच घरातील दोन वेगवेगळी माणसे आपल्या मोबाइल ऍपवरून वस्तू ऑर्डर करू शकतात. ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांची प्रत्येक ऑर्डर किमान 15 डॉलरची हवी. गुगल सध्या लोकांना या संकल्पनेची सवय लावण्यासाठी तीन महिने मोफत सदस्यत्व देत आहे.

ऍमेझॉनची सेवा मात्र गुगलपेक्षा वेगळी आहे. एक मुख्य फरक म्हणजे ऍमेझॉन इतर दुकानातून वस्तू उचलून आणून तुमच्या घरी पोचत्या करत नाही, ऍमेझॉन स्वतः या गोष्टी विकते. त्यामुळे त्या वस्तूंची ऍमेझॉनवरील किंमत तुम्हाला द्यावी लागते. ऍमेझॉन या सेवेला "फ्रेश ऍडऑन' असे म्हणते. ऍमेझॉनची ही सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे ऍमेझॉनचे प्राइम सदस्यत्व असणे आवश्‍यक आहे. एका वृत्ताप्रमाणे अमेरिकेतील अर्ध्याअधिक घरांकडे आधीच हे सदस्यत्व असल्याने तो मोठा प्रश्‍न नाही. प्राइम सदस्यत्वात तुम्हाला ऍमेझॉनवरून मागवलेल्या इतर गोष्टी विनाशुल्क दोन दिवसात तुमच्या घरी येतात. प्राइम मेंबरशिप असणाऱ्यांना ऍमेझॉनची व्हिडीओ सर्व्हिसही विनाशुल्क मिळते. प्राइम सदस्यत्वाचा आणि किराणा माल मागवण्याचा तसा काहीच संबंध नाही, पण ज्यांच्याकडे प्राइम सदस्यत्व नाही त्यांना किराणा माल सेवा वापरता येत नाही. इथे किराणा माल म्हणजे दूध, फळे, भाज्या, पाव व इतर खाण्याच्या गोष्टी (बहुतेक नाशवंत गोष्टी) मला अपेक्षित आहेत. डिटर्जंट पावडर, बेबी डायपर अशा नाशवंत नसलेल्या गोष्टी तुम्हाला सर्वसाधारण प्राइम मेंबरशिपवर ऍमेझॉनकडून दोन दिवसांत मागवता येतात. किराणा माल सेवा वापरण्यासाठी प्राइम सदस्यांना दरमाही 15 डॉलर्स अधिक द्यावे लागतात. म्हणजेच ऍमेझॉनची ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला एकूण प्राइम मेंबरशिपचे वर्षाचे 99 डॉलर्स व फ्रेश सेवेचे 180 डॉलर्स खर्च येतो. ज्या वेळी या सेवेतून तुम्ही सामान मागवाल तेव्हा ते 40 डॉलर्सच्या वर नसेल तर मात्र तुम्हाला तब्बल दहा डॉलर्सचे शुल्क भरावे लागते! त्यामुळे एकंदरीतच ही सेवा गुगलपेक्षा बरीच महाग आहे. ही सेवा सध्या सिएटल, उत्तर व दक्षिण कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, फिलाडेल्फिया, बाल्टीमोर, बॉस्टन इत्यादी शहरात उपलब्ध आहे.

इन्स्टाकार्टची सेवा गुगलप्रमाणे आहे. इन्स्टाकार्ट स्वतः काहीही विकत नाही. गुगल एक्‍स्प्रेसप्रमाणे त्यांची माणसे दुकानातून माल खरेदी करून तो तुमच्यापर्यंत पोचवतात. इन्स्टाकार्ट एक्‍स्प्रेस या नावाने ते आपले सदस्यत्व वर्षाला 149 डॉलर्स भरून देतात. हे सदस्यत्व घेतल्यानंतर 35 डॉलर्सवरील खरेदी आपल्याला एक किंवा दोन तासांच्या आत मिळू शकते. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे हे सदस्यत्व घेतल्याशिवायही तुम्ही इन्स्टाकार्ट वापरू शकता. तुमच्याकडे सदस्यत्व नसेल तर एक तासात वस्तू मिळण्यासाठी तुम्हाला 8 डॉलर्स, तर दोन तासांत वस्तू मिळण्यासाठी 6 डॉलर्स मोजावे लागतात. इन्स्टाकार्टची सेवाही अमेरिकेतल्या जवळजवळ सर्वच प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे. लॉस एंजेलिसमध्ये आमच्या भागात यमी डॉट कॉम नावाची अजूनही एक अशीच सेवा उपलब्ध आहे. ही सेवा मात्र ऍमेझॉनसारखी आहे - यमी डॉट कॉम स्वतः किराणा माल विकते. एका डिलिव्हरीला ते 6 डॉलर्स शुल्क आकारतात व शंभर डॉलर्सवरील मालासाठी विनामूल्य डिलिव्हरी देतात.. आणि चक्क अर्ध्या तासात डिलिव्हरीची खात्री देतात! म्हणजे एखादी गोष्ट तातडीने हवी असेल, तर यमी डॉट कॉम नक्कीच चांगली सुविधा आहे.

भारतामध्ये जवळच्या वाण्यांऐवजी सुपर मार्केटमध्ये जाऊन घाऊक वस्तू घेण्याचा कल वाढत आहे. ज्या वस्तू लोकांना सुपर मार्केटमध्ये स्वस्त मिळतात, त्या वस्तू लोक जवळच्या वाण्यापेक्षा सुपर मार्केटमधूनच घेणार. हे सुपरमार्केट जर लांब असेल तर भारतातील मोठ्या शहरामधील ट्रॅफिकचा सामना करण्यापेक्षा कुणाला तरी थोडेसे पैसे देऊन सामान आणायला सांगणे सोयीस्कर पडू शकेल. अशा प्रकारची सेवा ज्येष्ठ नागरिकांनाही उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे अशा प्रकारची सेवा भविष्यात गुगल आणि ऍमेझॉनने भारतात सुरू केल्यास मला आश्‍चर्य वाटणार नाही. किंबहुना डी-मार्ट, फूड बाझार, स्पेन्सर, हायपरसिटी इत्यादी भारतीय स्टोअरनीही त्यांची डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
 

सौजन्य : साप्ताहिक सकाळ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online grocery