"ऍप'निंग  :  किराणा माल आपल्या दारी 

शरयू काकडे 
शनिवार, 25 एप्रिल 2020

लॉकडाउन जाहीर झाला अन्‌ टंचाई निर्माण होण्याच्या भीतीतून जीवनावश्‍यक वस्तूंना मागणी वाढली.ऑनलाईन किराणाला मोठ्या प्रमाणात मागणी असून,घरपोच सामान मिळविण्यासाठी 1-2 दिवसाचा वेळ लागत असल्याचा अनुभव आहे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सारे जग चिंतेत आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे आपले दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउन जाहीर करत लोकांना घरीच राहण्यास सांगितले आहे. लॉकडाउन जाहीर झाला अन्‌ टंचाई निर्माण होण्याच्या भीतीतून जीवनावश्‍यक वस्तूंना मागणी वाढली. लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून साठा कररण्यास सुरुवात केली. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होत असला, तरी स्थानिक दुकानांमध्ये काही जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. तसेच ठराविक वेळांसाठी ही दुकाने सुरू असल्यामुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून बराच वेळ रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे सध्या लोक ऑनलाईन किराणा विक्रेत्यांकडे वळत आहेत. त्यामुळे ऑनलाईन किराणा विक्रेत्यांकडे मागणी वाढली असून, त्यांच्याकडून जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होत असून, त्या घरापर्यंत पोहचविल्या जात आहेत. ऑनलाईन किराणाला मोठ्या प्रमाणात मागणी असून, घरपोच सामान मिळविण्यासाठी एक -दोन दिवसाचा वेळ लागत असल्याचा अनुभव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या लोकांना ऑनलाईन खरेदी हाच पर्याय सुरक्षित वाटत आहे. सध्या ऍन्ड्रोईड मोबाईल ऍप सर्वांकडे असतोच. त्यामुळे ऍपमार्फत घरबसल्या गरजेचे सामान मागवता येत आहे. सध्या झोमॅटो, अमेझॉन, डी-मार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, फ्लिपकार्ट यांच्यातर्फे घरपोच किराणा सामानाची डिलिव्हरी दिली जात आहे. लोकांच्या सोईसाठी सध्या फक्त जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीसाठीच ऑनलाईन विक्रेत्यांना सरकारने डिलिव्हरी सेवा देण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता याची काळजी घेऊनच या विक्रेत्यांतर्फे घरपोच सामान पुरविले जात आहे. 

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सरकारच्या सूचनेनुसार "झोमॅटो'ने त्यांची फूड डिलिव्हरी सेवा तत्काळ बंद ठेवली होती. त्यांनतर त्यांनी फूड डिलिव्हरी सेवा बंद ठेवून किराणा सामानाची "झोमॅटो ऍप'द्वारे ऑनलाईन विक्री सुरू केली. सध्या देशातील 80 शहरांमध्ये "झोमॅटो मार्केट' नावाने ही सेवा सुरू आहे. "झोमॅटो'ने स्थानिक किराणा दुकाने, जीवनावश्‍यक वस्तूंचे निर्माते आणि "स्टार्टअप'ची मदत घेऊन ही सेवा सुरू केली आहे. "झोमॅटो'चे ऍप ऍन्ड्रॉईड आणि आयओएस फोनमध्ये उपलब्ध आहे. 

लॉकडाउनपूर्वीच किराणा वस्तूंच्या विक्रीची सेवा "स्विगी'ने सुरू केलेली होती. लॉकडाउन जाहीर केल्यानंतर ही बंद केली. मात्र ही सेवा सध्या सुरू असून देशातील बऱ्याच ठिकाणी ती वाढवली आहे. "स्विगी ऍप' हे ऍन्ड्रॉईड आणि आयओएस फोनमध्ये उपलब्ध आहे. सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर "उबर'ने फूड डिलिव्हरी सेवा बंद केली. सध्या "फ्लिपकार्ट', "बिगबास्केट' या सारख्या कंपन्यांबरोबरच "उबेर'ची ऑनलाईन किराणा विक्रीची सेवा देशातील कित्येक शहरांमध्ये सुरू आहे. ऍन्ड्रॉईड आणि आयओएस फोनमध्ये "उबेर ऍप' उपलब्ध आहे. 

"बिगबास्केट', "ग्रोफर्स', "ऍमेझॉन' आणि "फ्लिपकार्ट' यांची देशभरात किराणा सामान पुरवठ्याची सेवा पूर्वीपासूनच सुरू आहे. सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर डिलिव्हरी सेवा तत्काळ बंद करण्यात आली होती. मात्र सध्या ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ऍन्ड्रॉईड आणि आयओएस फोनमध्ये हे ऍप उपलब्ध आहेत. सध्या ऑनलाईन डिलिव्हरी सेवांमुळे लोकांना घरपोच किराणा सामान मिळत आहे. साहजिकच कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात त्यांना घरी राहणे सुरक्षित आणि सुसह्य झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online grocery shopping