सिलिकॉन सोलर सेलला पर्याय पेर्वोस्काईट सेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

एक नजर

  • सिलिकॉन सोलर सेलला पर्याय म्हणून पेर्वोस्काईट सोलर सेल तयार करण्याच्या प्रयत्नास यश.
  • बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील संशोधक डॉ. सावंता माळी यांचे दक्षिण कोरियात संशोधन. 
  • पेर्वोस्काईट सौर घट २० टक्के जादा कार्यक्षम. 
  • चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठाचे प्रोफेसर चॅंग हुक हाँग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. माळी यांचे संशोधन.

सांगली - सध्या संपूर्ण जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात आहे. यासाठी विशेष करून सोलर ऊर्जेचा कसा वापर करून घेता येईल त्यावर संशोधन सुरू आहे. यातील सिलिकॉन सोलर सेलला पर्याय म्हणून पेर्वोस्काईट सोलर सेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश आले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील बागणीतून गेलेले संशोधक डॉ. सावंता माळी यांनी केली आहे. त्यांनी दक्षिण कोरियात हे संशोधन केले आहे. हा पेर्वोस्काईट सौर घट २० टक्के जादा कार्यक्षमतेचा आहे. 

दक्षिण कोरियाच्या चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी पेर्वोस्काइट सौर घटासाठी तुलनात्मक कार्यक्षमतेसह धन-आचरण स्तर (होल कंडक्‍टिंग लेयर) युक्त मेटल-ऑक्‍साइड तयार करण्यासाठी निकेल ऑक्‍साईडचा वापर करून रासायनिक प्रक्रिया विकसित केली. चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठाचे प्रोफेसर चॅंग हुक हाँग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. माळी यांनी रासायनिक अभिक्रिया विकसित करून या पेर्वोस्काईट सौर घटाची बांधणी केली. 

डॉ. माळी यांनी सांगितले, की सिलिकॉनच्या ऐवजी पेर्वोस्काईट मटेरियल वापरल्यास सौर घटाची कार्यक्षमता वाढू शकते. याच्या साहाय्याने कमी खर्चात ऊर्जेची निर्मिती व कार्यक्षमता वाढवता येते. पेर्वोस्काईट मटेरियल प्रकाश शोषून त्यापासून ऊर्जा तयार करते. मात्र ते हवेत अतिसंवेदनशील असल्याने स्थिर नसते. पी टाईप निकेल ऑक्‍साईड नॅनो पार्टिकल्स आणि एन टाईप झिंक ऑक्‍साईड नॅनो पार्टिकल्सचे थर पेर्वोस्काईट मटेरियलवर बसवण्यात आले. या थरामुळे पेर्वोस्काईट मटेरियलचे हवेपासून संरक्षण होते. हा सौरघट सिलिकॉन सौरघटापेक्षा २० टक्के जास्त कार्यक्षमतेचा आहे.

ते म्हणाले, ‘‘बाजारातील सिलिकॉन सोलरच्या किमतीच्या तुलनेत हे उपकरण दहापट कमी किमतीत उपलब्ध होईल. त्यामुळे सोलरवर चालणारी उपकरणे दहापट स्वस्त मिळतील. अति दुर्गम व ग्रामीण भागातही सोलर उपकरणे परवडतील. याच्या जास्त क्षमतेमुळे विजेची समस्या कमी होण्यास मदत होईल.’’

कोण आहेत डॉ. सावंता माळी?
सावंता माळी हे मूळचे बागणी (ता. वाळवा) येथील आहेत. आई, वडील दोघेही शेतकरी. घरी शिक्षणाची पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण बागणी, तर माध्यमिक शिक्षण आष्टा येथे पूर्ण केले. पदार्थविज्ञान शास्त्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सौर ऊर्जा विषयात पीएच.डी. केली. सन २०१२ मध्ये ते दक्षिण कोरियाच्या ग्वांगझू येथील चोन्नाम राष्ट्रीय विद्यापीठात युवा संशोधक म्हणून रुजू झाले. सध्या तेथेच प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pervosquite cell option for Silicon solar cell