समाज माध्यमांचा संयत वापर

मुंबईत बॅचलर असल्याने आणि मित्रांकडेही लॅपटॅाप असल्याने आम्ही सर्वच वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी एकमेकांशी चर्चा करायचो.
समाज माध्यमांचा संयत वापर

हल्ली समाज माध्यमांचा वापर बराच वाढला आहे. सुरुवातीच्या काळातही त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अनेक जण तासन् तास त्यामध्ये गुंतून राहत; मात्र त्यामुळे वास्तविक जीवनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अनेकांचे नुकसानच होते.

साधारण २००४ ते २००७ हा माझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करियरमधला महत्त्वाचा टप्पा होता. चकचकीत वातावरण, चांगल्या पगाराची नोकरी, खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बॅचलर असल्यामुळे जबाबदारीचं असं फार काही ओझं नव्हतं आणि म्हणून काही फिकीरही नसायची. डिजिटल कॅमेरा सर्वसामान्यांच्या आवाक्यात तसेच मोबाईलमध्येही कॅमेरा येण्याचा क्रांतिकारी काळ होता तो. तसेच लॅपटॅाप आणि त्याला इंटरनेट कनेक्शन ही अशी काही भट्टी होती, की तरुण वर्ग त्यात रमला नाही तर नवलच. त्या वेळी रिलायन्सचं क्रेडिट कार्डसारखं एक कार्ड मिळायचं, ते लॅपटॅापमध्ये टाकलं की इंटरनेट सुरू व्हायचं.

मुंबईत बॅचलर असल्याने आणि मित्रांकडेही लॅपटॅाप असल्याने आम्ही सर्वच वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी एकमेकांशी चर्चा करायचो. सुरुवातीला त्याचा चांगल्या कामासाठी वापर व्हायचा. अशातच साधारण २००५ च्या सुमारास आयुष्यात इंटरनेटचं महत्त्व वेगळ्या प्रकाराने अधोरेखित करणारी ‘ऑर्कुट’ नावाची एक सोशल नेटवर्किंग साईट आली. ते समाजमाध्यमं, नेटवर्किंग आणि इंटरनेटची मजा घ्यायचे नवे दिवस. शाळा-कॅालेजातील जुने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, गावाकडचे, शहरातले ओळखीपाळखीचे, देश-विदेशातले अनेक लोक त्या आभासी जगात भेटायचे. सोबतच प्रसिद्ध व्यक्ती, स्टार्स आणि बरीच आदर्श व्यक्तिमत्त्वंही त्यावर दिसायची... मग सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जसे सर्व टाकतात, तसे मी पण फोटो, पोस्ट टाकायचो. त्यावर मिळणारे रिप्लाय आणि एन्गेजमेंटची एक वेगळीच नशा होती. ऑर्कुट हा आयुष्यात वापरलेला पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. पुढे फेसबुक आलं आणि सर्वांचीच बोटं आणि डोळे तिकडे वळले.

पुढे यातून बरीच व्यसनं लागत गेली. त्यातलं पहिलं वाईट व्यसन म्हणजे जेवणाचं ताट आलं की खायच्या आधी त्याचे फोटो काढायचे... तसेच फिरायला निघायच्या आधी तयारीचे फोटो टाकायचे... हॅाटेलच्या रूममध्ये जाण्यापूर्वी बाहेरच फोटो घ्यायचे... नवे कपडे, वस्तू, मित्र भेटले, की त्यावर लिहायचे... सिनेमा पाहायला जाण्यापूर्वी तिकिटाचे फोटो काढायचे, कोणाच्या लग्नातले, साखरपुड्याचे, सेलिब्रिटीसोबतचे हे सर्व समाजमाध्यमांवर टाकले जायचे.

बरेचसे मित्र गावखेड्यांतून आलेले. तिथल्या आणि इथल्याही राजकारणाशी काही ना काही कारणांनी संबंधित होताच. ते सरकारच्या प्रत्येक घडामोडीबद्दल आपले ‘अमूल्य’ मत फेसबुकवर नोंदवायचे. कोणत्याही विषयावर मत मांडताना त्याबद्दल सखोल माहिती, ज्ञान किंवा बेसिक जबाबदारीचं भान असलंच पाहिजे असं काही बंधन नव्हतं. शैक्षणिक पात्रता चांगली असो वा यथातथा, आभासी जगात अमर्याद स्वातंत्र्य असते आणि स्वतःचे मत (मग ते चूक असो वा बरोबर) सरळ ठोकून मोकळे होऊन जायचे. त्यातही विकृत स्वातंत्र्यही भारी असते. मग जोरदार ‘वैचारिक’ चर्चा व्हायच्या. वाद आणि भांडणं... नुसता राडा आणि मज्जा!

वेळ कसा जायचा कळायचेच नाही. त्यातच यू-ट्युब, फेसबुक, ब्लॅकबेरी मेसेंजर या मायाजाळात अडकत चाललो होतो... सिनेमा, नाट्य, साहित्य, व्यवसायातले लोक, तसेच विज्ञान-तंत्रज्ञान तसेच आमच्या क्षेत्रातील दिग्गज लोकही समाजमाध्यमांद्वारे जोडले गेले. मी बऱ्यापैकी लिहायचो, त्यामुळे चांगले लोक जुळायला लागले होते. वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये जाण्यासाठी सगळेच जण धडपड करायचे. आपली स्वत:ची ओळख बनायला हवी, असं प्रकर्षाने जाणवायचं... मग तासन् तास तोच विचार करत या इंटरनेटच्या आभासी जगात माहिती आणि कामाच्या नावाखाली सर्फिंग करत राहायचो.

एक दिवस ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मिटिंगशी संबंधित चर्चा सुरू होती. समोर जनरल मॅनेजर साहेब एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल सर्वांना सूचना करत होते. मी अगदी त्यांच्या जवळच बसलो होतो. अचानक त्यांनी रागाने कॉन्फरन्स टेबलवर जोरात हात आपटला. तो इतक्या जोरात होता, की माझा लॅपटॅाप जवळपास पडायचाच बाकी होता. मला कळेना नक्की काय झालंय... ते माझ्याकडे रागाने लालबुंद होऊन पाहत होते. सर्व सहकारी माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहत होते. (त्यातील काही माझ्यासोबत तेच सर्फ करत होते, जे मी करत होतो)

साहेबांनी रागाने मला विचारले - मी आता शेवटचे वाक्य काय बोललो ते सांग? माझी बोबडी वळली. मला काहीच आठवत नव्हते... मी मान खाली केली आणि काय बोलावे तेच सुचेना... मला घाम फुटला. मी महत्त्वाच्या मिटिंगमध्येही या समाज माध्यमांच्या कमेंट्स वाचण्यात, स्क्रोलिंग करण्यात बिझी होतो आणि ते त्यांनी स्पष्ट पाहिले होते. मी लॅपटॅाप बंद केला. जागेवरच सर्वांसमक्ष हात जोडले आणि माफी मागितली... प्रकरण शांत झालं, पण मला या गोष्टीने खजिल केलं.

बाहेरील लोकांशी नेटवर्किंग करता करता जवळच्या, खऱ्याखुऱ्या मोठ्या लोकांकडून महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याऐवजी मी उगीचच मृगजळाच्या मागे लागलो होतो. ज्या कामामुळे मला ओळख आहे, अजून स्वतःची मोठी ओळख बनवू शकतो, ते सोडून मी फक्त फोटोंच्या दिखाव्यामागे का लागलोय? समाज माध्यमात ओळखी वाढवून माझे पोट भरणार आहे का? समाज माध्यमातील किती टक्के लिखाण मला आयुष्यात उपयोगी पडणार आहे, असे प्रश्न मला पडले. माझे बरेच मित्र राजकारणावर विकृत पद्धतीने लिखाण करणाऱ्यांवर रिॲक्ट व्हायचे. ते रिॲक्ट होता होता स्वतःही तसेच विकृत वागायला लागले होते. बरं जर माझ्या प्रोफेशनमध्ये यामुळे काही आर्थिक फायदा झाला असता, तर एक वेळ ठीक आहे. केवळ ‘टाइमपास’ म्हणून या पद्धतीने वेळेचा अपव्यय करणे हे किती चूक आहे ते मनोमन पटले.

काही गोष्टी मनोमन ठरवल्या, पुन्हा एकदा संध्याकाळी जाऊन साहेबांची माफी मागितली आणि या सर्वांतून बाहेर पडण्याचा निर्धार केला. पुढे साधारण एकदोन महिन्यांत मी सर्व समाज माध्यमातून हळूहळू बाहेर पडलो... जे माझ्यासाठी योग्य वाटले ते चालू ठेवले. टायमर लावले आणि त्यासाठी योग्य वेळ ठरवली. ते सोडल्यावर मला तसा काहीच तोटा झाला नाही; उलट मी माझ्या कामावर चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकलो. माझ्या त्या वेळच्या नोकरीसाठी किंवा आजच्या उद्योगासाठीही अशा प्रकारच्या समाजमाध्यमांची गरजच नव्हती. तो काही माझा उदरनिर्वाहाचा रस्ता नव्हता आणि बहुतांश जणांचा नसतोही... आपण तिथे किती वेळ आणि कोणत्या वेळी थांबायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न.

आजकाल बऱ्याच तरुण मुला-मुलींमध्ये आर्थिक प्रगतीतील सर्वांत महत्त्वाचा अडथळा म्हणजे ही समाजमाध्यमं ठरताहेत. हल्ली बरेच विशी ते तिशीतले तरुण यू-ट्युब, टेडटॉक्स, मोटिव्हेशनल व्हिडीओ तसेच अनेक सक्सेस स्टोरीज ऐकून त्यात वाहत जातात. ते पाहणे पूर्णतः चूक आहे असे मी म्हणत नाही; पण ते केवळ ऐकीव आणि बऱ्याचदा रंगवलेले असते. खरे तर असे व्हिडीओ पाहून यश मिळत नसते. उलट आपल्या पाहण्यामुळे जे लोक व्हिडीओ बनवतात, त्यांना लाखो रुपये मिळतात. ‘मला सगळा समाज श्रीमंत करायचाय...’, ‘व्यवसाय करणं फार सोप्पं आहे...’, ‘घरबसल्या पैसे कमवा...’, ‘अमूक एक जण करोडपती झाला, तमूक एक आता ही गाडी घेऊन फिरतो...’, ‘मग तुम्ही पण करू शकता..., गुंतवा इकडे पैसे...’ या सर्व गोष्टीतला फोलपणा आणि वास्तविकता समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा निश्चित असा आधार असावा लागतो. वेगवेगळी स्कील्स लागतात, ती विकसित करावी लागतात आणि विश्वास ठेवा, व्यावसायिक क्षेत्रातली प्रगती ही आभासी जगातील केवळ यशाच्या गोष्टी ऐकून मिळत नाही. आर्थिक प्रगतीसाठी योग्य वेळी, योग्य गोष्टी करणे हे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच त्यासाठी चुकीच्या गोष्टी सोडून देणे हेही गरजेचे आहे.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com