'टेक्‍स्ट नेक'चा विळखा (सायटेक)

सुरेंद्र पाटसकर 
शनिवार, 9 मार्च 2019

तुम्हाला मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, अपचन यापैकी एकाचा किंवा आलटून-पाटलून या सगळ्याच प्रकारचा त्रास होतोय का? याचे उत्तर हो असेल, तर तुमच्यावर "टेक्‍स्ट नेक'चा परिणाम होत असावा.

एकीकडे उपकरणांमुळे आपले जीवन सुकर होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अतिवापरामुळे नवे आजार उद्‌भवत आहेत. ही उपकरणे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत, हेही नाकारता येणार नाही. आपण "टेक्‍स्ट नेक'च्या प्रभावाखाली आहोत का? हे तपासण्यासाठी गुरुग्राममधील दहावीतील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने एक उपकरण तयार केले आहे. त्याच्या साह्याने आपण आपली बसण्याची आणि उपकरणे वापरण्याची पद्धत बदलू शकतो, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. 

"टेक्‍स्ट नेक' म्हणजे काय? हे आपण आधी पाहूया. अमेरिकी हाडवैद्य डीन धीवर यांनी हा शब्द पहिल्यांदा प्रचलित केला. स्मार्ट फोन, टॅब्लेट, ई-रीडर यासारख्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर केल्यामुळे आपल्या बसण्याच्या सवयीत बदल होतो. त्याचा परिणाम पाठीच्या कण्याचा आकार बदलण्यातही होऊ शकतो. पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ येऊ शकते. उपकरणाच्या अतिवापराने उद्‌भवणाऱ्या या समस्यांचे "टेक्‍स्ट नेक' असे नामकरण धीवर यांनी केले. लाखो लोकांना याचा त्रास होतो. परंतु, आपल्याला हा त्रास होऊ शकतो, ही कल्पनाच अनेकांना नसते आणि परिस्थिती गंभीर झाल्यानंतरच यावरील उपचार शोधण्यास सुरवात होते.

स्मार्ट फोनसारख्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांवर अधिकवेळ टेक्‍स्टिंग करत असल्याने शरीराची जी मुद्रा होते; त्यामुळे पाठीच्या कण्याचा आकार बदलतो. वास्तविक, मानवी डोक्‍याचे वजन 10 ते 12 पाउंड असते. त्यावर हवेचा दाबही असतो. डोके पुढे झुकवले जाते, तेव्हा पाठीच्या कण्यावरील ताण वाढतो. जर एखाद्या व्यक्तीने 15 अंश कोनात डोके पुढे झुकवले असेल, तर कण्यावर 27 पाउंड वजन पडते. 30 अंश कोनात डोके असेल, तर 40 पाउंड व 60 अंश कोनात असेल तर 60 पाउंड वजन कण्यावर पडते. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या सात-आठ वर्षांच्या मुलाला डोक्‍याला काही तास लटकविले तर जेवढे वजन पडते, तेवढे हे वजन असेल. "न्यूयॉर्क स्पाईन अँड रिहेब मेडिसिन' या नियतकालिकात पाठीच्या कण्यावर पडण्यात येणाऱ्या वजनाबाबतचे स्वतंत्र संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मणक्‍यावर प्रचंड ताण 

आपण सरासरी दोन ते चार तास स्मार्ट फोनवर घालवतो. याचाच अर्थ वर्षभरात 700 ते 1400 तास आपल्या पाठीच्या कण्यावर ताण येत असतो. तरुण तर तब्बल पाच हजार तास वर्षभरात मोबाईलवर घालवतात. यामुळे मान सुजणे, दुखणे; पाठीचा कणा वाकडा होणे, पाठ, हात, मनगट, बोटे, खांदे दुखणे असाही त्रास होतो. डोकेदुखी तसेच कंबर व मानेला मुंग्या येणे अशाही त्रासाला सामोरे जावे लागते. दीर्घकालीन आजारांमध्ये स्नायूंमध्ये तणाव, हर्नियेटेड डिस्क, मिसलिग्नमेंट असे प्रकार होऊ शकतात. 

विद्यार्थांनी शोधला उपाय

गुरुग्राममधील शिव नाडर विद्यालयातील तनिष्का सहाय, नाव्या सचदेव, आर्यन वर्मा आणि तेजस रस्तोगी या विद्यार्थ्यांनी "टेक्‍स्ट नेक'चा त्रास होऊ नये, यासाठी एका उपकरणाची निर्मिती केली. त्या उपकरणाच्या साह्याने आपली बसण्याची स्थिती योग्य आहे की नाही, हे तपासले जाते व योग्य स्थिती नसेल तर तसा संदेश पाठविला जातो. इतकेच नव्हे, तर दिवसभरात चुकीच्या पद्धतीने किती वेळा आपण बसलो, याचा एक छोटासा अहवालही तयार केला जातो.

स्मार्ट फोन किंवा टॅब्लेट वापरणारी व्यक्ती योग्य पद्धतीने बसली आहे की नाही, याचा संदेश प्रत्येक अर्ध्या तासाने स्मार्ट फोनवर पाठविला जातो. मान सरळ राहावी, यासाठी बाजारात दोन प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत. मानेसाठी "ब्रेसेस' आणि विशिष्ट प्रकारचे फर्निचर, यांचा यात समावेश आहे. परंतु, या दोन्ही गोष्टी सहज वापरण्याजोग्या नाहीत, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नव्या उपकरणाची निर्मिती केली.

या उपकरणात व्हिडिओ चित्रीकरणासाठी कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विश्‍लेषण करण्यासाठी संगणक यांचा समावेश आहे. कॅमेऱ्याद्वारे सतत चित्रीकरण केले जाते. आपल्या बसण्याच्या पद्धतीनुसार दर अर्ध्या तासाने विश्‍लेषण केले जाते व त्याची माहिती आपल्या स्मार्ट फोनवर पाठविली जाते.

लॅपटॉप किंवा संगणकावर जास्तवेळ बसून काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून या विद्यार्थ्यांनी हे उपकरण बनविले आहे. यासाठी साधारण 3,500 रुपये खर्च आला आहे. सध्या या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रयोगशाळेत दोन प्रोटोटाईप ठेवले आहेत. त्यावर अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बसण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला गेला. आपण चुकीच्या पद्धतीने उपकरणे हाताळतो आहोत, बसतो आहोत, याची माहिती बहुसंख्य लोकांना असते. परंतु, त्यात बदल करण्यासाठी कष्ट घेण्याची त्यांची फारशी इच्छा नसते, असे विद्यार्थ्यांना दिसून आले. 

काही उपाय

स्मार्ट फोन, टॅब, संगणक अशा उपकरणांवर जास्त वेळ काम न करणे हा सर्वांत सोपा उपाय आहे. परंतु, हे केले जात नसल्यानेच पुढील समस्या उद्‌भवतात. मानेचे, हाताचे, खांद्यांचे व्यायाम करणे यासाठी गरजेचे आहे. संगणकावर भरपूर वेळ काम करणाऱ्यांनी ठरावीक वेळेने डोळ्यांना विश्रांती देणे आणि मानेचा व्यायाम करणेही गरजेचे आहे. असे केले, तरच "टेक्‍स्ट नेक'ला आपण बळी पडणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Sci Tech on Text Neck