"हॅकिंग फ्री' क्वांटम कॉम्प्युटरसाठी... 

Quantum Computers Versus Hackers, Round One. Fight!
Quantum Computers Versus Hackers, Round One. Fight!

नवे तंत्रज्ञान बाजारात येण्याआधीच त्याबाबतीत होणाऱ्या गैरप्रकारांचा अंदाज घेऊन समांतर संशोधन करण्याची संशोधकांची मानसिकता बनली आहे. क्वांटम कॉम्प्युटरच्या निर्मितीचे प्रयत्न होत असतानाच त्याचे हॅकिंग रोखणारे तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले असून, हे कॉम्प्युटर सुरक्षित असतील, याची ग्वाही दिली आहे. 
 
तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच त्याच्या वापराने होणारे गैरप्रकार हा सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे. संशोधकांनी क्वांटम कॉम्प्युटर बनविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असतानाच, त्याचे हॅकिंग होऊ नये म्हणून आधीच प्रयत्न केले जात आहेत! त्यासाठी संशोधकांनी क्वांटम क्‍लोनिंग मशिनची निर्मिती केली असून, त्याद्वारे आधुनिक संगणक हॅकिंगपासून सुरक्षित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
संगणकांची सुरक्षा करणाऱ्या पारंपरिक पद्धतीमध्ये हॅकिंग रोखण्यासाठी "शून्य' आणि "एक'चा वापर केला जातो, तो पुरेसा नाही. क्वांटम कॉम्प्युटरमध्ये गणनाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीचे असते आणि त्यात "शून्य' आणि "एक'बरोबरच अनेक पायऱ्यांचा वापर केलेला असतो. त्यामुळे हॅकिंग होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यासाठीच ओटावा विद्यापीठातील संशोधक इब्राहिम कारिमी आणि त्यांच्या टीमने हाय डायमेन्शनल क्वांटम क्‍लोनिंग मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनने क्वांटम कॉम्प्युटरद्वारा प्रसारित सर्व संदेश हॅक करण्याचा प्रयत्न केला. या "हॅकिंग'चे निष्कर्ष समोर आल्यानंतर संशोधकांना क्वांटम कॉम्प्युटरला संभाव्य हॅकिंगपासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे धागे हाती लागले आहेत. पारंपरिक हॅकिंगमध्ये हॅकर्स संगणकाद्वारे प्रसारित माहिती कॉपी व पेस्ट करतात व त्याच्या अनेक प्रती काढतात. मात्र, क्वांटम कॉम्प्युटरद्वारे प्रसारित माहिती कॉपी करताना ती जशीच्या तशी कॉपी न होता, त्याची "बदललेली' प्रत कॉपी होते व हॅकरचा उद्देश सफल होत नाही! 

संशोधन नक्की काय? 
संशोधकांनी सर्वप्रथम माहितीचा साठा वाहून नेणाऱ्या फोटॉन्सचे "क्‍लोन' बनविण्यात यश मिळवले. या फोटॉन्सला "क्‍युबिट्‌स' म्हणूनही ओळखले जाते. या क्‍युबिट्‌सचे क्‍लोन मूळ माहितीची प्रतिमाच होत्या. त्यामुळे क्वांटम कॉम्प्युटरची माहिती हॅक होण्याची पूर्ण शक्‍यता असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यातूनच ही हॅकिंग रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले. ""एकाच फोटॉनवर मोठ्या प्रमाणावर क्वांटम इन्फॉर्मेशन साठविल्यास त्याची प्रत अतिशय निकृष्ट दर्जाची होते आणि हॅकिंग झाल्याचे ओळखणे सोपे जाते, हे आम्ही सिद्ध केले. क्‍लोनिंगद्वारे सायबर हल्ला झाल्यास मूळ सिस्टीममध्ये विशिष्ट व लक्षात येणारा "नॉइज' तयार होतो व त्यामुळे हल्ला लगेच ओळखता येतो,'' अशी माहिती संशोधक फेड्रिक बोचार्ड यांनी दिली. 
एकंदरीतच, भविष्यात तंत्रज्ञानात प्रगती होत असताना त्याच्या बाबतीत होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्याचे "संशोधन'ही आधीच करण्याची संशोधकांची मानसिकता तयार झाल्याचेच स्पष्ट होते... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com