पृथ्वीवरील सर्वांत शांत जागेवर... 

मंगळवार, 13 जून 2017

कर्णकर्कश आवाज, सततचा गोंगाट यांमुळे तुम्ही वैतागला आहात का? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तुमच्यासाठी पृथ्वीतलावरील सर्वांत शांत खोली तयार केली आहे. या खोलीवजा चेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या श्‍वासाचाच काय, हाडांच्या घर्षणाचा आणि शरीरातील रक्ताच्या वाहण्याचाही आवाज येईल! या खोलीचा उपयोग अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटचे ट्युनिंग करण्यासाठी केला जाणार आहे. 

कर्णकर्कश आवाज, सततचा गोंगाट यांमुळे तुम्ही वैतागला आहात का? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तुमच्यासाठी पृथ्वीतलावरील सर्वांत शांत खोली तयार केली आहे. या खोलीवजा चेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या श्‍वासाचाच काय, हाडांच्या घर्षणाचा आणि शरीरातील रक्ताच्या वाहण्याचाही आवाज येईल! या खोलीचा उपयोग अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटचे ट्युनिंग करण्यासाठी केला जाणार आहे. 

ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या शरीरातील रक्ताच्या वाहण्याचा आणि डोळे फिरवल्यानंतर कवटीवर त्याच्या घर्षणाचा आवाज ऐकल्यावर तुमची काय स्थिती होईल? मायक्रोसॉफ्ट या कंपनीतील लेस्ली म्युनोरे असा अनुभव रोज घेतात. कंपनीच्या वॉशिंग्टनमधील "बिल्डिंग 87' या मुख्यालयात एक पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली बनविण्यात आली असून, तेथे कंपनीचे सरफेस कॉम्प्युटर्स, एक्‍स-बॉक्‍स आणि हॉलो लेन्ससारखी उत्पादने विकसित करण्यात येत आहेत. या खोलीत मोजली गेलेली आवाजाची तीव्रता आहे उणे 20.6 डेसिबल! तुलना करायची झाल्यास, मनुष्याच्या पुटपुटण्याचा आवाज असतो 30 डेसिबल, तर श्‍वासोच्छावासाचा 10 डेसिबल. हवेचे दोन कण एकमेकांवर धडकल्यानंतर होणारा आवाज असतो उणे 24 डेसिबल. 

कशी आहे खोली? 
या खोलीमध्ये बाहेरून येणारे आवाज रोखण्यासाठी खोलीला कॉंक्रीटचे सहा थर देण्यात आले आहेत, म्हणजेच एकात एक अशा सहा खोल्या आहेत. प्रत्येक खोलीच्या भिंतीची जाडी 12 इंच असून, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या आवाजात तब्बल 110 डेसिबलची घट होते. या खोलीचा आराखडा तयार केलेले मुख्य अभियंता हुंदराज गोपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ""ही खोली 68 कंपने शोषून घेणाऱ्या स्प्रिंगवर उभी असून, ती मुख्य इमारतीला कोठेही थेट स्पर्श करीत नाही. प्रत्येक भिंतीला आवाज शोषून घेणारे चार फुटांचे स्पंजचे तुकडे लावण्यात आले असून, त्यामुळे खोलीतील आवाजाचे प्रतिध्वनी उमटत नाहीत. जमिनीवर स्टीलच्या वायर व फोम टाकण्यात आला आहे. खोली पूर्णपणे हवाबंद केल्याने बाहेरचा कोणताही आवाज आत येत नाही.'' गिनिज बुकने या खोलीची पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली म्हणून नुकतीच नोंद केली आहे. याआधी मिनियापोलिस येथील ऑरफिल्ड प्रयोगशाळेच्या नावावर हा विक्रम होता व तेथील आवाजाची पातळी उणे 9.4 डेसिबल मोजली गेली होती. गोपाळ कंपनीत आलेल्या पाहुण्यांना या खोलीची सफर घडवून आणतात. मात्र, पाहुणे या खोलीतून काही सेकंदांत बाहेर येणे पसंत करतात. आपल्याच शरीरातील आवाज ऐकून अनेकांना चक्करही येते. मात्र, काहींना येथे ध्यानधारणेचा अनुभव मिळतो, असे गोपाळ सांगतात. 
म्युनोरे यांच्यासाठी ही शांतता मोठ्या कामाची आहे. कॅपेसिटरमधून विजेचा प्रवाह वाहताना होणारी कंपने ते ऐकतात. हा आवाज नक्की कोठून येतो व तो कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठीचे प्रयोग येथे होतात. की-बोर्डचा आवाज कमी करण्यासाठीचे विशिष्ट प्लॅस्टिक आणि स्प्रिंगवरही येथे काम सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हर्च्युअल रिऍलिटीशी संबंधित उपकरणांच्या चाचण्याही येथे घेतल्या जात आहेत. बोयोमेडिकल संशोधनासाठीही रूमचा उपयोग होत असून, स्किझोफ्रेनियावर संशोधन सुरू आहे. 

एकंदरीतच, भविष्यात विविध क्षेत्रांतील संशोधन व इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा "आवाज' कमी करण्यासाठी या आवाजरहित खोलीचा उपयोग होणार आहे. या खोलीची सफर तुम्हाला "हॉंटेड रूम'पेक्षा अधिक घाबरवेल, यात शंका नाही... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the quietest place on earth ...