Verghese Kurien birthday : ‘धवलक्रांती’ घडविणारा ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Verghese Kurien : ‘धवलक्रांती’ घडविणारा ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’

Verghese Kurien : ‘धवलक्रांती’ घडविणारा ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’

sakal_logo
By
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

जेव्हा ज्ञानविज्ञान हे ‘पुस्तक-प्रबंध-व्याख्यानं’ या पलिकडं जाऊन सामान्य लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतं तेव्हा इतिहास घडतो. बहुतेक लोकांना माहित असेलच, तरीही आज अश्याच एका इतिहासाची गोष्ट सांगतो.

विज्ञानात पदवी-मेकॅनिकल क्षेत्रात बीई आणि अमेरिकेत जाऊन विज्ञानात मास्टर्स ऑफ सायन्स केलेला मनुष्य जेव्हा मायदेशी परतून दुग्धशास्त्रात काम करत ‘हा’ इतिहास रचतो तेव्हा खरं तर हे वाचून-ऐकून क्षणभर विश्वास पटत नाही. पण हे घडलं आणि अगदी इथंच घडलं. छोट्या गरीब शेतकरी मंडळींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी एक सुरूवात झाली.

घटना आहे १९४६ची जेव्हा इंग्रज अद्यापही इथून हलले नव्हते. गावखेड्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडचं दूध दलालांच्या मदतीनं बाजारात विकावं लागायचं अन् या सगळ्या प्रक्रियेत या व्यवहारातला जास्तीत जास्त नफ्याचा हिस्सा दलालच उडवायचे. शेवटी दुसरा काही तरणोपायही नव्हता उलटपक्षी इथल्या बाजारात काही विदेशी कंपन्यांनी बस्तान बसवलं होतं.शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा होता पण करायचं काय? शेवटी स्थानिक नेतृत्व त्रिभुवनदास पटेल थेट सरदार वल्लभभाई पटेलांना जाऊन भिडले.

वल्लभभाईंना शेतकऱ्यांचं म्हणणं पटलं-त्यांचं दुःखही जाणवलं. त्यांनी या शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं रहातं स्वत:चं मार्केट उभारण्याबद्दल मार्गदर्शन केलं. शेतकरी मंडळींनी पटेलांचा हा सल्ला अतिशय गांभिर्यानं घेतला आणि त्यातल्या काहींनी एकत्र येत थेट स्वत:ची सहकारी संस्था सुरू केली.

सुरवात फक्त काही ‘शे’ लीटर दुध जमा करत सुरू करून झाली. पुढच्या तीन वर्षातच म्हणजे १९४९ साली त्रिभुवनदास यांच्या सांगण्यावरून एक मल्याळी अभियंता त्यांच्यासोबत जाॅईन झाला.

मनात पहिला प्रश्न असा येतो की,अमेरिकेत मास्टर्स केलेला-आयुष्यात अनेक चांगल्या शक्यता असणारा हा ख्रिश्चन तरुण जातधर्माच्या बारा भानगडी असलेल्या देशात आणि ते देखील फाटक्या शेतकऱ्यांसोबत का आला असावा? तो पक्का भारतीय होता आणि त्याला आपल्या देशातल्या गरीब शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा होता..

‘विचार किंवा तत्व’ यांचं एक असतं ते मांडणीच्या पातळीवर छानछान आणि सोपे वाटतात पण व्यावहारिक जीवनात कधी गळून पडतील यांचा नेम नसतो. त्यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं पोल्सन कंपनी.

या विदेशी कंपनीनं भारतीय दुग्ध बाजार संपुर्ण व्यापला होता. या क्षेत्रातले ते अनभिषिक्त राजे होते यामुळंच शेतकऱ्यांना दलालामार्फत यांनाच दुध विकावं लागत असे ते ही अत्यल्प दरात.नवनिर्वाचित तरुणानं शेतकऱ्यांना दलालांचा नाद सोडत निडरपणे घाऊक दुग्धविक्री बंद करण्याचं सुचवत एकत्र येण्यासाठी प्रेरित केलं.

शेतकऱ्यांना या सगळ्या चक्रव्यूहातून सुटका हवीच होती ते एकत्र येत गेले आणि उदयास आली ‘अमुल’ अर्थात आनंद मिल्क युनियन लिमिटेड. एकीचं फळ म्हणजे पोल्सनला आपलं चंबुगबाळं आवरावं लागलं.. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफ्याचं माॅडेल तयार झालं. दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी समूह बनवले त्यांना अनेक पातळीवर विभाजित केलं.प्लांट तयार झाला.

गावोगावी जिथल्या तिथं दुधाचं कलेक्शन करून त्याची गुणवत्ता तपासली जाऊ लागली आणि हे सगळं कलेक्शन जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र केलं गेलं आणि नंतर ते इतरत्र वितरित होईल अशी व्यवस्था केली.

काही ‘शे’लीटर वर सुरूवात तर झाली पण आवक वाढतच गेली तेव्हा आतापर्यंतच्या डेअरी व्यवसायात कधीच जे झालं नव्हतं ते झालं. प्रचंड संशोधन करत पहिल्यांदा म्हशीच्या दुधाची पावडर बनवली गेली आणि यानंतर ‘अमुल’नं मागं वळून पाहिलच नाही.पनीर-दही-आईस्क्रीम..एक ना अनेक उत्पादनं..

आज ‘अमुल’ या क्षेत्रातला ध्रुवतारा झालंय. बत्तीस लाखांहून अधिक लोक त्यांच्याशी थेट जोडलेले आहेत जे आपल्यापर्यंत त्यांचं उत्पादन पोहोचवतात.

शेतकऱ्यांच्या या कंपनीनं जाहिरात क्षेत्रातही Utterly Butterly campaign खोलून धुमाकूळ घातला आणि जागतिक जायंट ब्रॅंड नेस्लेलाही टक्कर देत गिनेस रेकाॅर्ड केलं.सोबत ना कुणी अभिनेत्री ना कुणी माॅडेल.

‘अमुल’ द टेस्ट ऑफ इंडिया झालं..

आज संपुर्ण देशात कंपनीची कार्यालयं आहेत-तीन हजाराहून अधिक डिलर्स आणि पाच हजाराहून अधिक ठोक विक्रेते. तुमच्या फ्रिजमध्ये डोकवून बघा काही नाही तर अमुलचा रिकामा डबा तरी दिसेल.

ही सगळी ‘धवलक्रांती’ करणारा तो अभियंता पद्मश्री-पद्मभूषण-कृषिरत्न-रॅमन मॅगसेसे मिळवणारा ठरला तरी ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ ही उपाधी त्याला नेहमीच सर्वाधिक जवळची राहिली.

अर्थात नंतरच्या काळात या देशांच्या परंपरेप्रमाणं काही वादविवाद-आरोप प्रत्यारोप झाले तरी त्यामुळं या अभियंत्याचं कर्तृत्व आणि योगदान नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या पांरपारिक जोडव्यवसायाला विज्ञानाची जोड मिळाल्यानं हा सगळा चमत्कार घडला होता. त्यामागं असणारे संशोधक अभियंता वर्गिस कुरीयन यांचा जन्मदिन..विनम्र अभिवादन !!!

loading image
go to top