साखर कारखान्यांच्या धुरांड्याची काजळी कमी करण्यावर होणार संशोधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - साखर कारखान्यांच्या बाॅयलरच्या पृष्ठभागावरील काजळी कमी करणे, इंधनाची ज्वलनक्षमता वाढविणे तसेच मायक्राॅबियल पेंट्सची निर्मिती बाबत शिवाजी विद्यापीठात संशोधन होणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने फाॅर्चुनकोट आणि कझान कॅटसाॅल या कंपन्यांसमवेत दोन सामंजस्य करार केले आहेत. प्र-कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत हे करार झाले.

कोल्हापूर - साखर कारखान्यांच्या बाॅयलरच्या पृष्ठभागावरील काजळी कमी करणे, इंधनाची ज्वलनक्षमता वाढविणे तसेच मायक्राॅबियल पेंट्सची निर्मिती बाबत शिवाजी विद्यापीठात संशोधन होणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने फाॅर्चुनकोट आणि कझान कॅटसाॅल या कंपन्यांसमवेत दोन सामंजस्य करार केले आहेत. प्र-कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत हे करार झाले.

साखर कारखान्यांतील बाॅयलरच्या पृष्ठभागावर अर्धवट जळालेल्या इंधनामुळे काजळीचा थर जमा होतो. कालांतराने हा थर वाढत जातो..त्यामुळे बाॅयलरची कार्यकार्यक्षमता कमी होते. सध्यस्थितीत बाॅयलरची कार्यकार्यक्षमता वाढविण्यासाठी बाॅयलर वेळोवेळी बंद करून काजळीचा थर काढून टाकावा लागतो. यासाठी काजळीचे प्रमाण कमी करण्यासोबत इंधनाची ज्वलनक्षमता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी कझान कॅटसाॅल समवेत शिवाजी विद्यापीठाने करार केला आहे. या सामंजस्य करारानुसार इंधनामध्ये मिसळण्यासाठी असे उत्प्रेरक तयार करण्यात येणार आहेत जेणेकरून बाॅयलर मधील इंधनाच्या ज्वलनावेळी तयार होणाऱ्या नायट्रोजन व सल्फर युक्त वायु प्रदुषकांच्या निर्मितीस अटकाव होईल आणि काजळी तयार करणाऱ्या इंधनातील घटकांना अटकाव करतील.

हे तंत्रज्ञान विकसित करुन कझान कॅटसाॅल कंपनी मार्फत साखर कारखान्यांपर्यंत पोहचवण्यात येईल,अशी माहिती संशोधक डाॅ. डी. एस. भांगे यांनी दिली.

अॅटी मायक्राॅबियल पेंट्सची निर्मिती

फाॅर्चुनकोट कंपनीसोबत झालेल्या करारानुसार विद्यापीठात नॅनो पदार्थांवर आधारीत अॅटी मायक्राॅबियल पेंट्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. अॅंटी मायक्राॅबियल पेंट्स हे नवीन तंत्रज्ञान आहे. त्यांचा मुख्य उद्देश पेंट्सच्या इतर गुणधर्मासोबत सूक्ष्मजीव प्रतिबंध वा नष्ट करण्याची प्रक्रिया सूसूक्ष्मजीवजंतू सदर पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे होतो. त्यामुळे जंतुनाशकांस न जुमानणाऱ्या सुपरबग्जच्या निर्मितीस अटकाव होतो. त्यासंदर्भातील संशोधन करण्यात येत आहे,अशी माहिती संशोधक डॉ. एस. डी. डेळेकर यांनी दिली.

दोन्ही करारांमधून बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळवण्याइतक्या महत्वाच्या संशोधनाची निर्मिती होईल,असा विश्वास प्र-कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला. 

कुलसचिव डाॅ. विलास नांदवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. एस.एम. गुरव, ‘इनाॅवेशन‘ चे संचालक डाॅ. आर. के. कामत आदी उपस्थित होते. करारांवर डॉ. नांदवडेकर आणि कझान कॅटसाॅलचे पंकज देशपांडे आणि फाॅर्चुनकोटचे संदेश काणेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कझान कॅटसाॅलचे मकरंद पंडित उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research to reduce the smoke discharge in the sugar factories