
अवकाश कचऱ्यामुळे मानवी जीवाला धोका
टोरांटो : आगामी दशकात उपग्रह अवकाशात सोडताना अवकाशात सोडले जाणारे प्रक्षेपकाचे तुकडे पृथ्वीवर कोसळून व्यक्तीला गंभीर इजा होण्याची किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची सहा ते दहा टक्के शक्यता असेल, असा इशारा एका अभ्यास अहवालात देण्यात आला आहे. हे टाळण्यासाठी प्रक्षेपण करतानाच संबंधित देशाने प्रक्षेपकाचे विलग झालेले भाग सुरक्षित ठिकाणी कोसळविण्याची सोय करावी; यासाठी त्यांना अधिक खर्च आला तरी चालेल, पण जीव वाचू शकतो, असा सल्लाही अहवालाद्वारे देण्यात आला आहे.
उपग्रह अवकाशातील कक्षेत सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रक्षेपकाचे काही भाग टप्प्याटप्प्याने विलग केले जातात. ते अवकाशात पृथ्वीच्या कक्षेजवळ तसेच फिरत राहतात. प्रक्षेपकाचे काही तुकडे पृथ्वीच्या कक्षेत शिरताच वेगाने खाली येतात. यातील बहुतेक तुकडे आकाशातच जळून खाक होतात, मात्र काही मोठे तुकडे जमिनीपर्यंत पोहोचतात. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया या विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या तीस वर्षांत अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची माहिती संकलित करून त्याचा अभ्यास केला आणि पुढील दहा वर्षांत अवकाशातील या कचऱ्यापासून उत्पन्न होणाऱ्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. त्यांचा हा अभ्यास अहवाल ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
...तर अधिक हानी शक्य
अवकाश कचऱ्याचा किती भाग पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून जमिनीवर येण्याचे प्रमाण किती, पृथ्वीजवळच्या कक्षेत किती अंतरावर किती कचरा आहे आणि पृथ्वीवरील लोकसंख्या यांचा एकत्रित अभ्यास संशोधकांनी केला. पृथ्वीची कक्षा आणि उपग्रहांची स्थिती पाहता जकार्ता, ढाका आणि लागोस येथे अवकाशातील कचरा पडण्याची शक्यता अधिक आहे. प्रक्षेपकापासून विलग झालेले तुकडे बहुतांशी अनियंत्रित असतात. हे तुकडे पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आल्यास पुढील दहा वर्षांत त्यामुळे एक किंवा अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे तुकडे थेट जमिनीवर कोसळले तर तुलनेत हानी कमी होईल; मात्र ते विमानावर कोसळले तर मोठी जिवीत हानी होऊ शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. २०२० मध्ये एका प्रक्षेपकाचा बारा मीटर लांबीचा पाइपचा तुकडा आयव्हरी कोस्ट येथील इमारतीवर कोसळला होता.
व्यवसायाच्या नावाखाली मानवी जीवाची हानी होऊ देणे योग्य आहे का? आपण हा प्रकार थांबवू शकतो का? आपण नक्कीच तसे करू शकतो. यासाठी योग्य पाऊले उचलण्याची गरज आहे.
- मायकेल बायर्स, संशोधक