esakal | टेक्नोहंट : तुमचा लॅपटॉप ओव्हरहिट होतोय?
sakal

बोलून बातमी शोधा

Laptop

टेक्नोहंट : तुमचा लॅपटॉप ओव्हरहिट होतोय?

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

लॉकडाउनमुळे बहुतांश कार्यालये वर्क फ्रॉम होम प्रकारे सुरू आहे. शाळा-महाविद्यालयेही ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने मोबाईल, लॅपटॉपसारख्या गॅजेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याशिवाय अनेक जण घरीच असल्याने लॅपटॉपवर काम करणे, गेम्स खेळणे, चित्रपट-वेबसिरीज पाहणे, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकजण दिवसभर लॅपटॉपपुढे बसलेले असतात, परिणामी लॅपटॉप ओव्हरहिट होत असल्याचे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. सध्या बाजारात आलेल्या नव्या लॅपटॉपच्या तुलनेत जुन्या लॅपटॉपमध्ये ही अडचण जास्त असते. तरीसुद्धा लॅपटॉप वापरण्याच्या सवयी बदलल्या तर लॅपटॉप ओव्हरहिट होण्याचा त्रास कमी करू शकतो...

नियमित स्वच्छता

कोणतीही वस्तू म्हटली, तरी त्यावर धूळ, घाण ही बसतेच. नियमित स्वच्छता न केल्यास लॅपटॉपचा फॅन, यूएसबी पोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ, जाळे जमल्याचे दिसते. परिणामी हवा खेळती न राहिल्याने लॅपटॉप लवकर गरम होतो, शिवाय लॅपटॉपच्या परफॉर्मन्सवर देखील परिणाम होतो. त्यामुळे लॅपटॉपची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे.

सपाट पृष्ठभागाचा वापर

बहुतांश जणांना गादीवर बसून लॅपटॉप वापरण्याची सवय असते. गादीवर लॅपटॉप ठेवल्याने लॅपटॉपच्या खालील बाजूला असलेल्या व्हेंटिलेशनमधून उष्ण हवा बाहेर पडण्यास अडचण जाते. हवा खेळती राहावी यासाठी लॅपटॉप हा नेहमी टेबलसारख्या सपाट पृष्ठभागावर ठेवावा.

कुलिंग फॅनची दुरुस्ती

लॅपटॉपमध्ये ओव्हरहिटिंगची समस्या ही शक्यतो कुलिंग फॅन खराब झाल्यामुळे उद्भवते. विशेषतः जुन्या लॅपटॉपमध्ये ही समस्या अधिक जाणवते. त्यामुळे कुलिंग फॅन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. कुलिंग फॅन नीट असल्यास आतील उष्णता बाहेर टाकल्याने लॅपटॉप ओव्हरहिट होत नाही.

कुलिंग पॅडचा वापर

लॅपटॉप अधिक काळ सुस्थितीत चालवा, यासाठी कुलिंग पॅडचा वापर करणे महत्त्वाचे असते. हल्ली नव्या लॅपटॉपसोबत दिल्या जाणाऱ्या किटमध्ये कुलिंग पॅडचा समावेश असतोच. शिवाय ज्यांच्याकडे कुलिंग पॅड नाही, त्यांनी तो घ्यायलाच हवा. त्यामुळे लॅपटॉप फार गरम होत नाही. कुलिंग पॅड यूएसबी सपोर्टवर चालत असल्याने त्याला फारशी वीज खर्च होत नाही.

लॅपटॉपचा गोदाम करू नका

आपल्यापैकी अनेकांना लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा साठवून ठेवण्याची सवय असते. आजकाल अधिक मेगापिक्सल असलेले मोबाईल आल्याने फोटो आणि व्हिडिओची मेमरी साईजही वाढली आहे, तसेच अन्य डेटाही लॅपटॉपमध्ये असतो. हा सर्व डेटा लॅपटॉपमध्ये साठवून ठेवल्यास तो हाताळण्यासाठी लॅपटॉपला ऊर्जा खर्ची घालावी लागते. हल्ली अनेकांना गेमिंगचे वेड लागल्याने, त्यातील उच्चक्षमतेच्या ग्राफिक्समुळे ओव्हरहिटिंगची समस्याही जाणवते. त्यामुळे लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा साठवून ठेऊ नये.

काम झाल्यानंतर लॅपटॉप बंद करा

सध्या वर्क फ्रॉम होममुळे अनेकांचा लॅपटॉप दिवसभर सुरू राहतो. त्यामुळे लॅपटॉप ओव्हरहिट होणे साहजिक आहे. त्यामुळे दिवसातून एकदा किंवा काम झाल्यावर लगेच लॅपटॉप बंद करावा. त्यामुळे लॅपटॉपमधील यंत्रणेला विश्रांती मिळून लॅपटॉप ओव्हरहिट होण्यापासून वाचवू शकतो.

loading image