
टेक्नोहंट : कॉल रेकॉर्डिंगवर आल्या मर्यादा!
कधी महत्त्वाचं काम म्हणून किंवा कुणी बोललेलं लक्षात राहावं, म्हणून अनेक जणांना आपला कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. मात्र, समोरील व्यक्तीच्या परवानगीविना कॉल रेकॉर्ड करणे, चुकीचे आहे. आता अॅण्ड्रॉईड युजर्सना त्यांच्या स्मार्ट फोनवर कॉल रेकॉर्डिंग करण्यात काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कोणत्या त्या पाहू.
जगभरातील अॅण्ड्रॉईड स्मार्ट फोनवर सेवा-सुविधा पुरवणाऱ्या गुगलने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली. येत्या ११ मेपासून कॉल रेकॉर्डिंग करणारे गुगल प्ले-स्टोअरवरील थर्ड पार्टी अॅप्स बंद करणार असल्याची नुकतेच गुगलने जाहीर केले. त्यामुळे थर्ड पार्टी अॅप वापरून कॉल रेकॉर्डिंग करणाऱ्या युजर्सची मोठी गैरसोय होणार आहे. गुगलने नुकतेच याबाबत निवेदन जारी केले. त्यानुसार अनेक थर्ड पार्टी अॅप्स कॉल रेकॉर्डिंगसाठी अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनमधील अॅक्सेसिबिलीटी एपीआयचा वापर करतात. अॅक्सेसिबिलीटी एपीआय म्हणजे थर्ड पार्टी अॅपला संबंधित स्मार्ट फोनमधील युजर्सची माहिती विनापरवानगी हाताळता येते. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून डेटाचोरी, संबंधित व्यक्तीला ट्रॅक करणे आदी गैरप्रकार केले जातात. त्यामुळे गुगलने पुढाकार घेत कॉल रेकॉर्डिंग करणाऱ्या थर्ड पार्टी अॅप्सला अॅक्सेसिबिलीटी एपीआय अॅक्सेसच बंद केला जाणार आहे. पर्यायाने या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंग करणे अशक्य होणार आहे. अर्थात, ज्या स्मार्ट फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग अॅप्स प्री-इन्स्टॉल असतील, त्यांना कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही.
गुगलने हा निर्णय का घेतला?
विनापरवानगी एखाद्या व्यक्तीचा कॉल रेकॉर्ड करण्याबाबत जगभरात फारसे कायदे अस्तित्वात नाही. त्यामुळे थर्ड पार्टी अॅप्सकडून युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा अनेकदा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी गुगलकडे करण्यात आल्या. त्या अनुषंगाने गुगलने युजर्सची गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला. अॅण्ड्रॉईड प्रणालीतील अॅक्सेसिबिलीटी एपीआयचा वापर यापुढे थर्ड पार्टी अॅप्सला करता येणार नाही, असे गुगलने त्यांच्या नव्या पॉलिसीत स्पष्टपणे नमूद केले आहे.
प्री-इन्स्टॉल स्मार्टफोनना चिंता नाही
काही स्मार्ट फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा प्री-इन्स्टॉल असते, म्हणजेच पूर्वीपासून उपलब्ध असते. त्यामुळे अशा स्मार्टफोनधारकांना गुगलच्या या नव्या पॉलिसीमुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. उदा. सॅमसंग, शाओमी, गुगल पिक्सल आदी कंपन्यांच्या स्मार्ट फोनमध्ये डायल पॅडवरच कॉल रेकॉर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांना ही सुविधा पूर्वीप्रमाणेच वापरता येणार आहे.
Web Title: Rushiraj Tayade Writes Limitations On Call Recording
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..