टेक्नोहंट : वन नेशन, वन चार्जर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Charger

जगभरात ई-कचऱ्याची वाढती समस्या लक्षात घेता गरजेपुरतेच गॅजेट्स वापर करण्यासह त्याच्या पुनर्वापर वा पुनर्प्रक्रियेसारख्या उपायांवर भर दिला जात आहे.

टेक्नोहंट : वन नेशन, वन चार्जर

जगभरात ई-कचऱ्याची वाढती समस्या लक्षात घेता गरजेपुरतेच गॅजेट्स वापर करण्यासह त्याच्या पुनर्वापर वा पुनर्प्रक्रियेसारख्या उपायांवर भर दिला जात आहे. ई-कचऱ्यावर आणखी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सर्व गॅजेट्सला एकच प्रकारचा चार्जर वापरता येईल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच ‘वन नेशन, वन चार्जर’ ही संकल्पना रुजली जात आहे.

हल्लीच्या डिजिटल युगात प्रत्येकाला टेक्निकल अपग्रेड व्हायचे असते, नवनवीन गॅजेट्स वापरायचे असतात. त्यातून अनेकजण नानाविध गॅजेट्स खरेदी करतात. त्यातच जितके गॅजेट्स तितके चार्जर हे आलेच. विशेष म्हणजे, अनेकजण साधारणतः वर्ष-दोन वर्षानंतर जुने गॅजेट टाकून नवीन खरेदी करण्यावर भर देतो. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे नव्या गॅजेटच्या तुलनेत जुने गॅजेट आऊटडेटेड झालेले असतात, लोकांनाही नवे खरेदी करण्याची इच्छा असते. त्यामुळे जुने गॅजेट्स एकतर कुणी गरजू विकत घेतो किंवा बहुतेक गॅजेट्स तसेच पडलेले असतात.

गॅजेट्सची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा ई-कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यावर जगभरात प्रयत्न केले जात आहे. अनेक उत्पादक कंपन्यांनी जुने गॅजेट्स खरेदी करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. कमीत कमी ई-कचरा निर्माण व्हावा, या उद्देशाने प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या ऑक्टोबर महिन्यात युरोपियन युनियनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. युरोपियन युनियनमधील सर्व देशांमध्ये २०२४पासून सर्व गॅजेट्सला एकच प्रकारचा, म्हणजे यूएसबी टाइप-सी यूएसबी चार्जर सक्तीचे करण्यात येत असल्याचे जाहीर केले, परंतु लगेच दोन वर्षांमध्ये लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जरच्या दृष्टीने बदल करणे शक्य नसल्याने लॅपटॉपसाठी २०२६ची मुदत देण्यात आली.

युरोपियन युनियनने हा निर्णय जाहीर केला, त्यावेळी यूएसबी टाइप-सी चार्जर संदर्भातील नियमावली भारतात कधी येईल, याबाबत चर्चा सुरू झाली होती. केंद्र सरकारच्या पातळीवरही याबाबत बरेच विचारविनिमय सुरू आहे. भारतातही ‘वन नेशन, वन चार्जर’ची अंमलबजावणी करण्यासाठी इंटरमिनिस्ट्रियल टास्कफोर्सची स्थापना केली आहे. हा टास्कफोर्स देशभरातील विविध गॅजेट्स उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून सर्व गॅजेट्ससाठी यूएसबी टाइप-सी चार्जर वापरण्यासंदर्भात आराखडा तयार करणार आहे. दरम्यान, त्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय बदल करावे लागतील?

  • सध्या बहुतांश अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट असल्याने त्यांना या निर्णयाचा फारसा फटका बसणार नाही.

  • अनेक फीचर फोन, तसेच वायरलेस हेडफोन्समध्ये यूएसबी टाइप-बी चार्जर दिला जातो. त्यांनाही यूएसबी-टाइप सी चार्जिंग पोर्टसाठी उत्पादन प्रक्रियेत बदल करावा लागणार आहे.

  • विशेष म्हणजे, आतापर्यंत लाईटनिंग चार्जर वापरण्यावर ठाम असलेल्या अॅपल त्यांच्या पुढील उत्पादनांमध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट आणण्यासाठी मोठे फेरबदल करावे लागणार आहे.