टेक्नोहंट : कॉल स्पूफिंगचा धोका |Call Spoofing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spoofing
टेक्नोहंट : कॉल स्पूफिंगचा धोका

टेक्नोहंट : कॉल स्पूफिंगचा धोका

गेल्या काही दिवसांमध्ये जॅकलिन फर्नांडिस, सुकेश चंद्रशेखर ही नावं बरीच चर्चेत होती. सुकेशनं जॅकलिनला कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट्स दिल्यानं तिला ईडीकडून नोटीसही बजावण्यात आली होती. मनी लॉण्डरिंगसाठी सुकेश चंद्रशेखरनं केवळ जॅकलिनच नव्हे, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना आपल्या जाळ्यात ओढलं. त्यासाठी सुकेशनं ‘कॉल स्पूफिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केल्याचं तपासात समोर आलं. कॉल स्फूफिंग ही टेक्नोलॉजी नेमकी काय आहे, त्यातून लोकांची कशी फसवणूक केली जाते, त्याबाबत...

कॉल स्फूफिंग म्हणजे सोप्या भाषेत फेक कॉल करून मी अमुक मंत्र्याच्या किंवा अमुक कलाकाराच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितलं जातं. पुढील व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्याशी ओळख निर्माण केली जाते आणि वेळ येताच मदतीच्या नावानं किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी समोरच्या व्यक्तीकडून पैसे उकळले जातात. जॅकलिनच्या प्रकरणातही नेमकं हेच झालं. सुकेश चंद्रशेखरनं कॉल स्पूफिंगच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगत जॅकलिनशी ओळख निर्माण केली. हळूहळू त्यांच्यात संवाद वाढत ओळख बरीच वाढली आणि त्याचाच फायदा सुकेशनं जॅकलिनला कोट्यवधी रुपयांचं गिफ्ट्स देऊन तिचा वापर मनी लॉण्डरिंगसाठी केला.

कसं होतं स्पूफिंग?

खरंतर कॉल स्पूफिंगची सुरुवात २००४पासून झाली. आताच्या काळात कॉल स्पूफिंगसाठी सर्वाधिक वापर होतो तो VoIP म्हणजेच व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’चा. कॉल स्पूफिंगसाठी इंटरनेटच्या मायाजालात अनेक सॉफ्टवेअर्स, तसेच ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. कॉल स्पूफिंगमध्ये तुमचा कॉलर आयडी बदलून वेगळ्याच फोन नंबरनं पुढील व्यक्तीला कॉल केला जातो. समजा रमेशनं त्याच्या मोबाईलवरून सुरेशला कॉल केल्यास सुरेशला रमेशच्या नंबरवरून फोन न येता एखाद्या दुसऱ्याच नंबरवरून फोन आलेला असतो. मात्र, फोन करणारा मूळात रमेशच असतो. एवढंच नाही, तर परदेशातून आलेला फोन देखील आपल्याच भागातील असल्याचा विश्वास व्हावा म्हणून लोकल एसटीडी कोड असलेल्या फोन नंबरचा वापर केला जातो. काही महागड्या कॉल स्पूफिंगमध्ये तर चक्क आवाजही बदलता येतो. त्याचा वापर करून प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू किंवा राजकीय नेता बोलत असल्याचं भासवलं जातं. अनेकजण तर प्रॅंक कॉलसाठीही (गंमत म्हणून) कॉल स्पूफिंगचा वापर करतात.

ऑरेंज बॉक्सिंगचाही वापर

कॉल स्पूफिंगसाठी वापरले जाणारी आणखी एक तंत्रज्ञान म्हणजे ऑरेंज बॉक्सिंग. ऑरेंज बॉक्सिंगमध्ये एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं ऑडिओ सिग्नल तयार करून तो फोन कॉलसोबत जोडला जातो. ज्या व्यक्तीला तो फोन आलेला असतो, त्याला असा भास होतो, की दुसरा व्यक्ती फोन करतोय, परंतु फोन करणाारा व्यक्ती दुसरा-तिसरा कुणीही नसतो, तर स्पूफ करणारी व्यक्तीच असते.

कॉल स्पूफिंगपासून वाचायचं कसं ?

सध्यातरी स्पूफिंगवर उपाय म्हणून कोणतंही अँटी-व्हायरस किंवा तांत्रिक उपाय उपलब्ध नाही. केवळ काळजी किंवा खबरदारी घेणं हाच स्पूफिंगपासून वाचण्याचा साधा आणि सोप्पा मार्ग आहे. अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून फोन आल्यास शक्यतो तो न उचललेला बरा.. त्यासाठी कॉलर आयडी अॅपचा वापर करता येईल. अनोळखी नंबरवरून आलेला कॉलवर समोरचा व्यक्ती अमूक कार्यालयातून बोलत असल्याचं सांगत असेल आणि त्या कार्यालयाशी तुमचा संबंध नसेल, तर फोन लगेच ठेऊन दिलेला बरा.. किंवा बँकेच्या नावानं किंवा टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअर विभागातून बोलत असल्याचं भासवत चालू कॉलमध्ये समोरील व्यक्ती एखादं बटन प्रेस करायला सांगत असेल, तर लगेच सावध व्हावा.. अन्यथा तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mobile
loading image
go to top