
टेक्नोहंट : स्टारलिंक लवकरच भारतातही
सध्या जगभरात चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे एलॉन मस्क. टेस्ला, स्पेसएक्स, ओपनएआय, दी सोलार सिटी, दी बोरिंग कंपनी, न्यूरालिंक आदी कंपन्यांमधून कोट्यवधीची उलाढाल करणारे एलॉन मस्क लवकरच ट्विटरही खरेदी करणार आहेत. दरम्यान, जगभरात सॅटेलाइट इंटरनेट पुरवणारी मस्क यांची स्पेसएक्स कंपनी लवकरच भारतातही स्टारलिंकच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवणार आहे.
जगातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदीमुळे गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्क बरेच चर्चेत आहे. विविध क्षेत्रात नानाविध कंपन्यांच्या माध्यमातून जगभरात त्यांनी आपला व्यवसायविस्तार केला आहे. स्पेसएक्स या खासगी अंतराळ संशोधन संस्थेद्वारे मस्क यांच्याकडून अवकाशविज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. नुकतेच काही वर्षांपूर्वी स्पेसएक्सच्या माध्यमातून खासगी अंतराळ पर्यटनाचे दरवाजेही खुले झाले होते. केवळ अवकाशविज्ञानच नव्हे, तर स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवाप्रणालीमार्फत जगभरात वेगवान इंटरनेट सुविधाही स्पेसएक्स कंपनीकडून पुरवली जाते.
सध्या जगातील ३२ देशांमध्ये उपलब्ध असलेली स्टारलिंकची इंटरनेट सुविधा लवकरच इतरही अनेक देशांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती ‘स्पेसएक्स’कडून देण्यात आली. स्टारलिंकची जगभरात कोणकोणत्या देशात उपलब्ध आहे, त्याबाबतचा एक नकाशा स्पेसएक्सने नुकताच ट्विट केला. त्यात सेवा उपलब्ध असलेले देश, तसेच लवकरच सेवा सुरू करणार असलेल्या देशांची माहिती दिली आहे. त्यानुसार भारताचाही समावेश लवकरच सेवा सुरू होणाऱ्या देशांच्या यादीत आहे. त्यामुळे भारतात लवकरच वेगवान इंटरनेटसेवा उपलब्ध तर होईलच, पण त्याचबरोबर इंटरनेट पुरवठादार कंपन्यांपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
कशी मिळणार स्टारलिंकची सुविधा?
स्टारलिंकची इंटरनेट सुविधा थेट सॅटेलाइटद्वारे मिळत असल्याने स्पेसएक्सने आतापर्यंत हजारो सॅटेलाइट पृथ्वीभोवतीच्या ऑरबिटमध्ये प्रक्षेपित करण्यात आली आहे. पारंपरिक सॅटेलाईट पृथ्वीपासून ३५ हजार किलोमीटरवर असतात, मात्र स्टारलिंकचे सॅटेलाईट अवघ्या ५५० किलोमीटरवरून पृथ्वीभोवती फिरत असल्याने पर्यायाने वेगवान इंटरनेट सुविधा मिळते. स्टारलिंकच्या इंटरनेटसुविधेसाठी ग्राहकांना डिश-टीव्हीप्रमाणे घरावर एक छोटी डिश घराच्या छतावर बसवावी लागेल. त्याद्वारे मिळणारे बॅण्डविड्थ राऊटरच्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेट उपलब्ध करेल. स्टारलिंकच्या अॅण्ड्रॉईड वा आयओएस अॅपद्वारे तुम्हाला स्टारलिंकच्या पर्सनलाईज सेवा-सुविधा वापरता येईल.
स्टारलिंकमुळे काय फरक पडेल?
स्टारलिंकच्या इंटरनेट सुविधेसाठी ग्राहकांना ठराविक अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतर ग्राहकांना मासिक, वार्षिक पॅकेजनुसार इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. सध्या भारतातील अनेक भागात नेटवर्कअभावी इंटरनेटच पोहोचले नाही; मात्र स्टारलिंकची सुविधा थेट उपग्रहाद्वारे असल्याने दुर्गम भागातही सहजगत्या इंटरनेट उपलब्ध होईल. त्यामुळे वेगवान दूरसंचार प्रणालीसोबतच देशभरात शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रात नवनव्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लागेल.
Web Title: Rushiraj Tayade Writes Starlink Soon In India Too
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..