७५ पेटंट मिळवणारा मिरजेचा ‘फुंगसूक वॅंगडू’

बलराज पवार
सोमवार, 17 जून 2019

सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद आहेत. ‘लिम्का आणि इंडिया बुक रेकॉर्ड’मध्येही याची नोंद झाली आहे. 

सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद आहेत. ‘लिम्का आणि इंडिया बुक रेकॉर्ड’मध्येही याची नोंद झाली आहे. 

मूळचे मिरजेचे असलेले सचिन गंगाधर लोकापुरे अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहायक प्राध्यापक आहेत. त्यांचे एम. फार्मसीचे शिक्षण झाले आहे. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी पहिले पेटंट दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आजवर भारतीय पाच युटिलिटी आणि ७० इंडस्ट्रियल डिझाईनिंग पेटंट मिळवले आहेत. हे सर्व व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आणले आहेत. 

वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मायक्रोस्कोपीद्वारे अशा प्रकारचे सूक्ष्म निदान केले जाते. मात्र, अशी मायक्रोस्कोप्स जपान आणि चीनमध्ये तयार केलेली वापरली जातात. अर्थातच ती महागडी असतात. भारतीय मायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वत: संशोधन करुन आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मायक्रोस्कोपी निदानाला नवी दिशा मिळाली आहे. सर्वात जास्त पेंटट स्वत:च्या नावे मिळवण्याचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या संशोधनामुळे मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आली आहे. त्याचा फायदा आधुनिक वैद्यकीय क्षेत्राला मिळत आहे.

सचिन लोकापुरे यांची स्वत:ची कंपनी आहे आहे. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी संशोधनाला सुरुवात केली होती. फार्मसीचे शिक्षण घेत असताना त्यांनी १५ पेटंट फाईल केले होते. एम फार्म पूर्ण होईपर्यंत पाच पेटंटला मान्यता मिळाली होती. गेल्या दहा वर्षात लोकापुरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. भारतीय पेटंट कार्यालयाकडे त्यांची नोंद केली. त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. त्यांनी आतापर्यंत १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. त्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

सर्वाधिक ७५ पेटंट, वैद्यकीय क्षेत्रातल्या रोग निदानमधील मायक्रोस्कोपीमधील असल्याचे कोरले आहे. लोकापुरे यांच्या कंपनीत तयार होणारे डिजिटल मायक्रोस्कोप हे जपान, चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मशिन्सपेक्षा ॲडव्हान्स आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची असल्याने ती स्वस्त पडतात. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये त्यांची डिजिटल मायक्रोस्कोप वापरली जातात. बहुतांश पॅथालॉजी लॅब, फार्मास्युटिकल्स कॉलेज, मायक्रोपॅथॉलॉजी आदी ठिकाणी त्यांची उत्पादने वापरली जातात.

भारतीय रोगनिदानपध्दती ॲडव्हान्स डिजिटल मायक्रोस्कोपद्वारे करण्याच्या उद्देशाने संशोधन केले. त्याचा फायदा रोगाचे सूक्ष्म निदान करण्यासाठी होत आहे. यामध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरमुळे मायक्रोस्कोपिक इमेजही स्वतंत्र काढून त्याचा स्टडी करण्यास उपयोग होतो.
- प्रा. सचिन लोकापुरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Lokapure gains 75 Patents