फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

इंटरनेट जगतातील दिग्गज फेसबुकच्या या प्रगतीमध्ये अनेक छोट्या छोट्या कम्युनिटींनी हातभार लावल्याचे उपाध्यक्ष नाओमी ग्लीट यांनी सांगितले. 

पालो ऑल्टो (कॅलिफोर्निया) : सोशल नेटवर्किंगमध्ये जगात अग्रभागी असणाऱ्या फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या तब्बल 200 कोटींवर पोचली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही संख्या आहे. 

फेसबुकचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी फेसबुकवरून ही माहिती जाहीर केली. "मंगळवारी सकाळपर्यंत फेसबुक समुदाय हा आता अधिकृतपणे 200 कोटी लोकांचा झाला आहे. जगाला जोडण्यात आम्ही प्रगती करत आहोत," असे त्यांनी सांगितले.

फेसबुक युजर्सची संख्या 100 कोटींवरून 200 कोटी होण्यास 5 वर्षे लागली. आम्ही ऑक्टोबर 2012 मध्ये 100 कोटींचा टप्पा गाठला होता, असे झुकेरबर्ग यांनी सांगितले. आम्हाला जगातील प्रत्येकाला जोडण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु, लोकांना केवळ एकमेकांशी जोडण्याव्यतिरिक्त खूप काही करायला हवं. आपण त्यांना एकमेकांच्या जवळ आणायला हवं, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. 

इंटरनेट जगतातील दिग्गज फेसबुकच्या या प्रगतीमध्ये अनेक छोट्या छोट्या कम्युनिटींनी हातभार लावल्याचे उपाध्यक्ष नाओमी ग्लीट यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sci tech news facebook reaches 2 billion mark social media