फेसबुक वापरातील स्मार्टनेस

Smartness in Facebook use
Smartness in Facebook use

फेसबुक वापरताना काही वेळा मैत्री विनंती आली की स्वीकारली जाते. काही वेळा या व्यक्तींबाबत काहीही माहिती नसते. अशा वेळी या मित्रांचे करायचे काय, असा प्रश्‍न पडणेही साहजिकच आहे. प्रोफाइलला स्वच्छ ठेवण्यासाठी या मित्रांना हटविण्याचा विचार करता येईल.

फेसबुकवर आपल्या खात्याची सुरक्षितता आणि वैयक्तिकीकरण म्हणजे सिक्‍युरिटी आणि प्रायव्हसी सेटिंग्ज अपडेट ठेवले पाहिजेत. त्यासाठी ऍपच्या सर्व प्रकारच्या सेटिंग्जची माहिती असणेही गरजेचे आहे. आपल्या फेसबुक खात्यावरून नको असलेली ऍप्स आणि गेम्स काढून टाकावेत. फेसबुकवरून सुरक्षित पद्धतीने काम कसे करता येईल ते पाहूया.

आपली माहिती नियंत्रित ठेवा 
कोणाच्या पोस्ट अधिकवेळा पाहायच्या आणि कोणाच्या पोस्ट पाहिल्या नाही तरी चालतील हे ठरवण्यासाठी न्यूड फीड प्रेफरन्समध्ये जाऊन सेटिंग्ज करता येतात. ब्राऊझर किंवा अँड्रॉईड ऍपमध्ये उजव्या बाजूला सर्वांत वरती, तर आयफोनमध्ये सर्वांत खालच्या बाजूला ही सेटिंग्ज असतात. त्यात जे सर्वांत वर असावेत अशा मित्रांची निवड करू शकतो. काही मित्रांच्या पोस्ट आपण हाइडही करू शकता. फेसबुकवर येणारे व्हिडिओ आपोआप चालू होत असल्याने डेटा संपण्याची चिंता वाटत असेल, तर अँड्रॉइडच्या ऍप सेटिंग्जमध्ये जाऊन ते ऑटो प्ले बंद करता येते.

प्रायव्हसी सेटिंग्ज
फेसबुकच्या मेन्यूत हू कॅन सी माय स्टफ, असा एक शॉर्टकट आहे. त्यातून आपल्या पोस्ट कोणाकोणाला पाहता येत आहेत ते कळते. इथून सेटिंग्जमध्ये बदल करून ते कोणाकोणाला पाहता येतील ते नियंत्रित करता येते. आपण जे काही पोस्ट करणार आहोत ते फक्त मित्रांनीच पाहावे असे वाटत असेल तर पब्लिक असे सेटिंग्ज बदलून ते फ्रेंड्‌स करावे. आपल्याला टाइमलाइन आणि टॅगिंगमध्ये जाऊनही एखाद्या फोटोत किंवा पोस्टमध्ये आपल्याला टॅग केले असेल तर आपल्या परवानगीशिवाय ते टाइमलाइनवर दिसू शकणार नाही असेही सेटिंग करता येते. अशा प्रकारे सेटिंग्ज करून खाते सुरक्षित करता येते.

खाते सुरक्षित करा
आपल्याला फेसबुकसाठी अवघड संकेतशब्द अर्थात पासवर्ड तयार करावा लागेल, त्यासाठी सिक्‍युरिटी सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट सेटिंग्जमध्ये जावे. तिथे "लॉगइन अप्रूव्हल'चा पर्याय असतो. तो ऑन केल्यावर इतर कोणत्याही नव्या डिव्हाइसवरून लॉग इन केल्यावर मोबाईल क्रमांकावर पाठवलेला कोड टाकावा लागेल. त्याशिवाय कोणत्याही नव्या डिव्हाइसवर फेसबुक उघडता येणार नाही. अशाच प्रकारे दुसरी कोणतीही व्यक्ती फेसबुकवर लॉगइन करू शकणार नाही.

अनफ्रेंडचा पर्याय
अनोळखी लोकांना अनफ्रेंड करा. त्यांना अनफ्रेंड नसेल करायचे तर अक्वटन्सेस किंवा रिस्ट्रिक्‍टेड लिस्टमध्ये टाका. ऍक्वाटन्सेसचा अर्थ असा की त्यांच्या पोस्ट न्यूज फीडमध्ये दिसणार नाहीतर; पण आपण मित्रांसाठी टाकलेल्या पोस्ट ते पाहू शकतात. रिस्ट्रिक्‍टेडचा अर्थ फक्त पब्लिक असलेल्या पोस्ट ते पाहू शकतील.

निरुपयोगी ऍप्स हटवा
फेसबुकवरून गेम्सच्या विनंत्या येतात किंवा आपणही काही गेम्स फेसबुकवरून खेळत असू. आता खेळत नसलो तरीही हे गेम्स जास्तीचा डेटा वापरत असतील, असे ऍप्स काढून टाका. त्यासाठी डेस्कटॉप ब्राऊझरवर प्रायव्हसी चेकअप टूलमध्ये जाऊन बिनकामाचे ऍप्स काढून टाकावेत.

भविष्यासाठी योजना
दोन सेटिंग्जच्या मदतीने आपण भविष्यातील नियोजन फेसबुकमध्येही करू शकतो. सिक्‍युरिटी सेटिंग्जमध्ये काही मित्रांना ट्रस्टेड कॉन्टॅक्‍टसमध्ये जोडा. अकाउंट लॉक झाले तर हे लोक आपल्याला मदत करतील. लीगसी कॉन्टॅक्‍टही जोडले जाऊ शकतात. आपल्याला हवे तर मित्राला ऍडमिन बनवू शकतो, जो आपले स्टेटस अपडेट टाकू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com