
Smartphone Tips : वारंवार फोन होतोय ओव्हरहीट? या टिप्स वापरून लगेच करा कूल
उन्हाळ्यामध्ये आपला फोन वारंवार ओव्हरहीट होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अगदी नॉर्मल यूज असला, तरीही फोन भरपूर गरम होत असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. अती गरम झालेला फोन खराब होण्याचा किंवा अगदी ब्लास्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे तातडीने असा फोन थंड करणं गरजेचं असतं.
उन्हाळ्यात आपला गरम झालेला फोन लवकरात लवकर कसा थंड करता येईल, याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचं आयुष्य वाढवू शकाल.
उन्हापासून ठेवा दूर
स्मार्टफोन गरम होण्याची कित्येक कारणं असू शकतात. उन्हाळ्यामध्ये थेट पडणारा सूर्यप्रकाश हेदेखील याचं मुख्य कारण असू शकतं. त्यामुळे शक्यतो आपला स्मार्टफोन थेट सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा.
चार्जिंग
तुमचा फोन जर चार्जिंगला लावलेला असताना गरम झाला असेल, तर त्वरीत स्विच बंद करून, तो चार्जिंगवरून काढा. असं वारंवार होत असेल, तर दुकानात जाऊन मोबाईलची बॅटरी तपासून घ्या.
फोनचं कव्हर
तुमच्या फोनचं कव्हर देखील त्याला ओव्हरहीट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. कव्हर घातल्यामुळे एअरफ्लो आणि टेम्परेचर कंट्रोल अशा गोष्टी नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळे शक्यतो कव्हर वापरू नका, किंवा फोन ओव्हरहीट झाल्यास कव्हर काढून ठेवा.
अॅप्स करा बंद
फोनमध्ये एकाहून अधिक अॅप्स सुरू असतील, आणि प्रोसेसर क्षमतेपेक्षा जास्त काम करत असेल तर अशा वेळी फोन ओव्हरहीट होऊ शकतो. त्यामुळे सुरू असलेले सर्व अॅप्स बंद करणे हा देखील फोन लवकर थंड करण्याचा एक मार्ग आहे.
फोन करा ऑफ
स्मार्टफोन स्विच ऑफ केल्यामुळे तो वेगाने थंड होऊ शकतो. फोनमधील सर्वच प्रक्रिया बंद झाल्यामुळे तो लवकर कूल-डाऊन होतो. याव्यतिरिक्त, गरम झालेला फोन फॅनजवळ ठेवल्याने, किंवा एसी रूममध्ये नेल्याने देखील तो लवकर थंड होऊ शकतो.