फेसबुकीय 'विचारवंतां'ची झुंज

Social-Media
Social-Media

'दोघांची झुंज लावून मजा पाहणे' ही मानवजातीची जुनी परंपरा. कोंबड्यांच्या झुंजीपासून ग्लॅडिएटरपर्यँत इतिहासाने झुंजीचे अनेक प्रकार व रक्तपात पाहिले आहेत. आता नवीनच 'वैचारिक झुंज' लावणाऱ्या लोकांचा पंथ फेसबुकवर उदयास आला आहे. भारतात प्रत्येक जाती-धर्मात महापुरुषांची कमतरता नाही. त्यामुळे फेसबुक - व्हॉट्सऍपवर 'तुमचा महापुरुष श्रेष्ठ की आमचा?' अशी वर्गवारी करून पोस्ट करायची आणि त्या त्या महापुरुषाच्या आयुष्यातल्या कर्तृत्वाचा किंवा चुकांचा पंचनामा करायचा याचे पेव फूटले आहे. यावर समोरचा डिवचला गेला की तो आणखी काही लोकांना टॅग किंवा ऍड करून मदतीला बोलवतो. मग बाबा आदमच्या जमान्यात घडलेल्या कोणत्या तरी घटनेचा किंवा वक्तव्याचा पुरावा अथवा स्क्रीनशॉट म्हणून फोटो टाकला जातो. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे व्हॉट्सऍप इतिहासकार मग दोन-चार फॉरवर्ड झालेल्या मेसेजच्या जीवावर समोरच्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात. कारण अशा लोकांनी वाचनालयात जाऊन कधी पुस्तके चाळली असतील याची सुतराम शक्यता नसते. 

अमक्या महापुरुषाने 40 लढाया जिंकल्या म्हटले की आपल्या जातीच्या महापुरुषाच्या नावावर 200 लढाया जिंकल्याची थाप मारली जाते. त्या महापुरुषाने आयुष्यात कधीही न जिंकलेल्या लढाया त्याच्या नावावर खपवल्या जातात कारण आम्हाला वाद जिंकायचा असतो म्हणून आम्ही या महापुरुषांच्या खांद्यांचा सोयीस्कर वापर करतो. चुकून तुम्ही या आणि अशा 'फेक मेसेजेस'ना विरोध केलाच, तर तुमची खैर नाही समझा. कारण लोक तुमचं आडनाव वाचून तुमच्यावर कोणत्या तरी पक्ष- संघटनेचा शिक्का मारून मोकळे होतात. हा वाद भलेही राजकीय हेतूने प्रेरित नसेल. परंतु, कळत नकळत आपण आपल्याच पूर्वजांचा अवमान करत आहोत याचे भानही त्या पोस्टकर्त्यांना नसते.

व्हॉट्सऍप आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांनी विचार मांडण्यासाठी आपल्याला एक चांगले व व्यापक व्यासपीठ दिले आहे. परंतु, कोणावरही भाष्य करण्याआधी आपण त्यासाठी लायक आहोत का ..? ही जाण फार कमी जणांना आहे. सोशल नेटवर्किंगमुळे कोणत्याही विषयाची माहिती मिळविणे सोपे झाले आहे. पण 'माहिती' आणि 'ज्ञान' यामध्ये फरक आहे हे कोण शिकविणार..?

आजही '२५ जणांना मेसेज फॉरवर्ड करा अन्यथा देवीचा कोप होईल' असे मेसेज सर्रास पाठवले जातात, तेव्हा मेसेज पाठविणाऱ्याच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. प्रतिस्पर्धी कंपन्या एकमेकांना बदनाम करण्यासाठी विरोधी कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल खोडसाळ मेसेज पाठवण्याची शक्यता असते किंवा फोटोशॉप व तत्सम सॉफ्टवेअर वापरून एखाद्याला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु, आपण कोणतीही शहानिशा न करता तो मेसेज फॉरवर्ड करतो. 

ज्यांना बँकेत गेल्यावर स्वतःच्या हाताने सेव्हिंगचा फॉर्मही भरता येत नाही ते लोक सोशल मीडियावर नोटाबंदीचे फायदे शिकवतात. टिळक, नेहरू, सावरकर, गांधी वैगेरे थोर लोक म्हणजे आपले वर्गमित्र होते अशा अविर्भावात त्यांचे कुठे चुकले, कसे चुकले हे सांगितले जाते. या फेसबुकीय विचारवंतांनी सावरकरांप्रमाणे कधी अंदमानात कोलू फिरवलेला नसतो, महात्मा गांधींप्रमाणे मूठभर मीठ उचलताना त्यांच्या पाठीशी हजारोच्या संख्येने लोक उभे राहिलेले नसतात. एकाच वेळी फाळणी, काश्मीर, विलीनीकरण, नियोजन, चीनच युद्ध सांभाळताना पंडित नेहरूंनी दाखवलेले मानसिक स्थैर्य या लोकांत नसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपाशीपोटी राहून केलेला पुस्तकांचा अफाट संग्रह या फेसबुकवाल्याना झेपणारा नसतो. बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचे तर 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' या संदेशाचा सोयीस्कर अर्थ त्यांनी काढलेला असतो. 'चार-पाच मेसेजेसमध्ये इतिहास शिकायचा,  टॅग करून संघटित व्हायचं. आणि वैचारिक संघर्ष नंतर ठरलेलाच असतो.'

कधी कधी असं वाटत अज्ञानात खूप सुख असत, बालपणी शाळेत वाचलेल्या मुला-फुलांच्या, चाचा नेहरुंच्या गोष्टी, इयत्ता चौथीचा शिवरायांचा इतिहास, अभिनव भारताच्या क्रांतिकथा यापुरताच आपले वाचन राहिले असते तर बरे झाले असते असे वाटते, निदान अशा झुंजीत भाग घेतलयाचे पाप अंगी लागले नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com