ISRO : ‘इस्रो’ उभारणार अवकाश स्थानक; सोमनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Somnath staement ISRO set up space station develop new NGLV launcher

ISRO : ‘इस्रो’ उभारणार अवकाश स्थानक; सोमनाथ

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संस्था अर्थात ‘इस्रो’चा २०३५पर्यंत स्वतःचे अवकाश स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी अधिक वजन वाहून नेणारा व फेरवापर करता येणारा प्रक्षेपक विकसित करण्यात येणार आहे. उद्योगांनाही या प्रकल्पात साह्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. ‘‘नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेइकलच्या (एनजीएलव्ही) आराखड्यावर ‘इस्रो’मार्फत काम सुरू आहे. या प्रकल्पात उद्योगांनी सहभागी व्हावे,’’ असे आवाहन इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ यांनी आज केले.‘‘विकास प्रक्रियेत उद्योगांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पांसाठी केवळ आम्हीच गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता नाही. नवा प्रक्षेपक उभारण्यात उद्योगांनीही गुंतवणूक करावी,’’ असे सोमनाथ यांनी सांगितले.

‘एनजीएलव्ही’मार्फत १० टन एवढे ‘पेलोड’ ‘जिओस्टेशनरी ट्रान्स्फर ऑर्बिट’मध्ये किंवा लो अर्थ ऑर्बिटमध्ये २० टन ‘पेलोड’ घेऊन जाण्याची योजना आहे. ‘एनजीएलव्ही’ या प्रक्षेपकामुळे भारताच्या अवकाश स्थानक बनविण्याच्या प्रयत्नांना मदतच होणार आहे. त्याचबरोबर दूरवरील अंतराळ मोहिमा, मानवी अवकाश मोहिमा, मालवाहू मोहिमा आणि एकाचवेळी अनेक उपग्रह अवकाशात सोडण्याच्या मोहिमांमध्ये या हा प्रक्षेपक वापरता येऊ शकणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’च्या एका अधिकाऱ्याने दिली. अंतराळात मोहिमा अधिक किफायतशीर करण्याच्या दृष्टिकोनातून ‘एनजीएलव्ही’ विकसित करण्यात येणार आहे.

पहिले उड्डाण २०३०मध्ये

भारताचा सर्वांत यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) १९८०मधील तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित करण्यात आला होता. भविष्यातील मोहिमांसाठी तो उपयुक्त ठरणार नाही. ‘एनजीएलव्ही’चा आराखडा वर्षभरात तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो आराखडा उद्योगांना उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. याचे पहिले उड्डाण २०३०मध्ये प्रस्तावित आहे. नव्या प्रक्षेपकात मिथेन आणि द्रवरूप ऑक्सिजन किंवा केरोसीन आणि द्रवरूप ऑक्सिजनचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात मोहिमेसाठी १९०० डॉलर प्रतिकिलो खर्च अपेक्षित आहे.