प्लास्टिकपासून डिझेल तयार करण्याचा प्रकल्प यशस्वी

प्लास्टिकपासून डिझेल तयार करण्याचा प्रकल्प यशस्वी

रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसी येथे प्लास्टिक पायरोलिसीस म्हणजे प्लास्टिकवर प्रक्रिया करून डिझेल बनवण्याचा प्रकल्प उद्योजक दीपक गद्रे यांनी यशस्वी केला आहे. एक हजार किलो प्लास्टिकपासून ८०० लिटर डिझेल बनवले जाते. त्यातून तयार होणाऱ्या १० टक्के कार्बन व १० टक्के वायूचा उपयोग पुन्हा डिझेलनिर्मितीसाठी वापरला जातो. डिझेलचा उपयोग कंपनीतील पॉवर जनरेटरसाठी केला जातो. त्यामुळे या प्रकल्पात कोणतीही गोष्ट वाया जात नाही. जागतिक दर्जाचे डिझेल बनवणारा हा कोकणातील पहिलाच प्रकल्प आहे.

गद्रे मरीन्स ही माशांवर प्रक्रिया व मत्स्यपदार्थ बनवणारी कंपनी. या कंपनीतील वाया जाणाऱ्या गोष्टींचा पुनर्वापर केला जातो. कारखान्यात दररोज वापरून वाया जाणारे प्लास्टिक तयार होते. यावर काही प्रक्रिया करावी, असा विचार गद्रे यांच्या मनात आला. पायरो म्हणजे हीट व लिसीस म्हणजे ब्रेकिंग म्हणजे उच्च तापमानातील प्रक्रिया. यातूनच डिझेलनिर्मितीकडे वळण्याचे ठरवले व त्यानंतर एमआयडीसी येथे प्रकल्प सुरू केला.

कंपनीत प्लास्टिकवर प्रक्रियेसाठी रिॲक्‍टर, फिल्टरेशनसाठी कॉलम, प्रेशर कंट्रोलसाठी सेफ्टी व्हॉल्व्ह आहेत. एका वेळी रिॲक्‍टरमध्ये हजार किलो प्लास्टिक भरले जाते. त्यानंतर जॅकेटमधून गरम हवा (थर्मल ब्रेकिंग सिस्टीम) सोडली जाते. डिझेल तयार होण्याकरिता २४ तास मशीन चालू ठेवावे लागते. प्रक्रियेदरम्यान तयार होणारा गॅस (वायू) सिलिंडरमध्ये साठवला जातो व त्याचा पुनर्वापर मशीन चालू ठेवण्याकरिता केला जातो. तसेच १० टक्के काजळी धरते ती मशीन सुरू करण्याकरिता कोळशासोबत एकत्र करून वापरली जाते. मशीन थंड होण्याकरिता १४ तास लागतात. त्यानंतर पुन्हा डिझेल निर्मिती सुरू केली जाते.

आमच्या कारखान्यामध्ये दररोज सुमारे ३०० किलो प्लास्टिक निघते. ते सुरवातीला भंगारवाल्यांना विकायचो, पण या प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल, याबाबत माहिती घेऊन हे डिझेल बनवण्याचे ठरवले आणि २०१७ मध्ये प्लांट सुरू केला. सध्या उत्तम प्रतीचे डिझेल फक्त २८ रुपयांत मिळते. सध्या याचा वापर कंपनीतील पॉवर जनरेटर चालविण्यासाठी करतो. भविष्यात वाहनातही हे डिझेल वापरण्याचा मानस आहे.’’
- दीपक गद्रे, 

गद्रे मरीन्स, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com