Salim Ali | पिवळ्या मानेच्या चिमणीने बदलले ज्येष्ठ पक्षी निरीक्षक 'सलीम अली' यांचे आयुष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

senior bird watcher salim ali

‘हौशी पक्षीप्रेमी ते देशातले दिग्गज पक्षी तज्ज्ञ’ असलेल्या सलीम अलींना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

पिवळ्या मानेच्या चिमणीने बदलले 'सलीम अली' यांचे आयुष्य

ब्रिटिश शासित मुंबई प्रांतातील एका सुलेमानी बोहरा कुटुंबात त्यांचा जन्‍म झाला. जन्‍मानंतर वर्षभरातच पितृछत्र हरपलं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी आईही देवाघरी गेली. त्यांचा मुक्काम कधी मामाकडं तर कधी काकीकडं हलला. बालपणच ते, दु:ख जाणवत असलं तरी नातलग आपल्या परिनं त्यांची भूमिका पार पाडत होते. बालवयातच त्यांना खेळता खेळता छर्‍याच्या बंदूकीनं लहान लहान पक्ष्यांना टिपायचा छंद जडला.

असंच नेहमीप्रमाणं खेळतांना त्यांनी बरोबर नेम साधत तारेवर बसलेली एक चिमणी छर्‍यानं उडवली. चिमणी खाली पडली, ते सवयीप्रमाणं धावत धावत चिमणीपाशी गेले. ती नेहमीची चिमणी नव्हती, तिच्या गळ्यावर तांबूस पिवळसर पट्टा होता. त्यांच्या मनात कुतूहल दाटलं. चिमणीला घेऊन ते मामाकडं गेले. हे मामा वाईल्‍ड लाईफ सोसायटी अन् बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटीचे सदस्य होते. मामा आपल्या या भाच्याला घेऊन सोसायटीच्या संचालकांकडे घेऊन गेले. तिथल्या संचालकांनी या छोट्या दोस्ताला त्या पक्ष्याबद्दल भरपूर माहिती दिली. भुसा भरलेले इतर अनेक पक्षीही दाखवले.

हेही वाचा: जेनेटिक कोडवर विशेष संशोधन करणाऱ्या 'डॉ. हरगोविंद खुराणा' यांची कहाणी

तो एक क्षण होता ज्यानं त्यांचं अख्खं आयुष्यच बदलवून टाकलं. त्यांना पक्ष्यांचा नादच लागला. इतका की त्यांनी आपलं सर्व आयुष्य पक्ष्यांसाठी वाहिलं. ते देशभरातील विविध जंगलं-डोंगर दऱ्या-रानोमाळ भटकले-भटकत राहिले. त्यांनी पक्ष्यांच्या विविध प्रजाती, त्यांच्या सवयी, वैशिष्ट्ये, वैविध्य, निसर्गचक्र याबद्दल टिपणं काढली, नोंदी केल्या, अभ्यास केला अन् हळूहळू आपलं अख्खं आयुष्यच पक्ष्यांसाठी वाहून घेतलं. अर्थात हे सगळं अगदी सहजसोपं नव्हतं. एखाद्या गोष्टीसाठी तहानभूक हरपून स्वत:ला पुर्णवेळ वाहून घेणं म्हणजे एक तपश्चर्याच असते. अनेक संकटांवर मात करत त्यांनी या छंदाला जवळजवळ एक मोठी परंपराच बनवलं आणि संपूर्ण देशाला पक्ष्यांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनही दिला.

हेही वाचा: सॅक्सोफोनची निर्मिती करणाऱ्या 'अडॉल्फ सॅक्स' यांची कहाणी

या सगळ्या खटाटोपातून त्यांनी पक्ष्यांच्या जवळपास १२०० प्रजाती आणि २१०० उपजातींची चित्रांसह शास्‍त्रशुद्ध माहिती देणारा मार्गदर्शक असा ग्रंथ लिहीला.

हा अभ्यास म्हणजे केवळ ‘चिऊकाऊचा खेळ’ नव्हता यामागं त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी मोठा लढा दिला होता. “ताजमहाल नष्ट झाला तर पुन्‍हा बांधता येईल पण सायलंट व्‍हॅलीसारखं जंगल संपल्यास पुन्‍हा उभारता येणार नाही” अशी भूमिका घेत त्यांनी प्रसंगी सरकार विरुध्द कठोर भूमिका आणि यंत्रणेविरुद्ध थेट लढाही दिला. पक्षी निरिक्षक मग तरुण बंडखोर पर्यावरणवादी असलेले ते एव्हाना ‘अभ्यासक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. संपूर्ण जग त्यांच्याकडं आदरानं बघू लागलं. ‘पक्षी’ म्हटलं की त्याचं नाव जणू समानार्थी असावं इतकं एकरूप झालं. भारत सरकारच्या पद्मभूषण-पद्मविभूषण नंतर ब्रिटन-हॉलंड सरकारनंही त्यांच्या नावाचा गौरव केला.

हे नाव म्हणजे ‘सलीम मोईजुद्दीन अब्दुल अली’ अर्थात ज्येष्ठ पक्षी निरीक्षक-अभ्यासक-पर्यावरणतज्ज्ञ सलीम अली. ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस्’ या त्यांनी लिहिलेल्या रसाळ-रंजक-तितकंच उद्बोधक असलेल्या पुस्तकानं अनेकांच्या प्राणी-पक्षी-पर्यावरण यासंबंधींच्या व्याख्याच बदलवून टाकल्या. पक्षी निरिक्षण-त्यांचा अभ्यास अर्थात ‘ऑर्निथॉलॉजी’ या विज्ञानशाखेला भारतातही मानाचं स्थान मिळवून दिलं.

loading image
go to top