टेक्नोहंट : जिनियस चॅट-जीपीटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GPT Chat

नोकरीसाठी ‘सीव्ही’ लिहायचाय? रजेसाठी अर्ज करायचाय? निबंध लिहायचाय? ई-मेल टाइप करायचाय?...‘चॅट-जीपीटी’ला सांगा.

टेक्नोहंट : जिनियस चॅट-जीपीटी

- वैभव गाटे

नोकरीसाठी ‘सीव्ही’ लिहायचाय? रजेसाठी अर्ज करायचाय? निबंध लिहायचाय? ई-मेल टाइप करायचाय?...‘चॅट-जीपीटी’ला सांगा. फक्त काही सेकंदात सर्व काही तयार... हो, हे शक्य आहे! ‘ओपन एआय’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) संशोधन करणाऱ्या कंपनीने नुकताच आपला चॅट-जीपीटी हा नवा चॅटबुट लॉन्च केला आहे. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधल्याप्रमाणे वापरकर्ते या चॅटबुटशी चॅट करू शकतात आणि आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवू शकतात, असा कंपनीचा दावा आहे.

चॅट-जीपीटी आहे तरी काय?

‘जीपीटी’चा अर्थ जनरेटिव्ह प्री-ट्रेन ट्रान्सफॉर्मर. हे एक कॉम्प्युटर लॅग्वेज मॉडेल असून, ते डीप लर्निंग’वर आधारित आहे. त्यामुळे हा चॅट-जीपीटी एखाद्या मनुष्याप्रमाणे वापरकर्त्यांशी संवाद साधू शकतो. तसेच, तो पुढील प्रश्नाचा अंदाज बांधून उत्तरे तयार करतो. लिखाणासंबंधित अनेक कामे हा चॅटबुट सहज करू शकतो.

असा होईल चॅट-जीपीटीचा वापर

 • ई-मेल टाइप करणे

 • कोडिंग जनरेट करणे (उदा. वेबसाईटसाठी कोडिंग)

 • गणिते सोडवणे

 • विविध अर्ज टाइप करणे

 • सीव्ही, बायोडेटा तयार करणे

 • विविध विषयांवर निबंध लिहिणे

 • कामांच्या नियोजनाबाबत टिप्स मिळवणे (उदा. पार्टीचे नियोजन)

 • एखाद्या विषयाची माहिती जाणून घेणे (उदा. भारतीय राज्यघटना, पदार्थांची रेसिपी)

असा शोधा चॅट-जीपीटी

 • गुगलवर ‘ओपन एआय’ सर्च करा

 • ओपन एआयचे संकेतस्थळ सुरू होईल

 • चॅट-जीपीटी ऑप्शनवर क्लिक करून लॉगइन करा

 • चॅटबुटमध्ये आपल्याला हवी असलेली माहिती टाइप करा किंवा माइकद्वारे विचारा

काय आहे ‘ओपन एआय’?

एआय या विषयावर जगभरातील अनेक संशोधक, कंपन्या मेहनत घेत आहे. त्यातीलच एक कंपनी आहे ‘ओपन एआय’. ती वापरकर्त्यांना गुगलवर सर्च केल्यास सहज उपलब्ध होईल. या कंपनीने आपला चॅट-जीपीटी नावाचा चॅटबुट तयार केला आहे. या कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्ट, रिड हॉफमन अशा मोठमोठ्या कंपन्यांची गुंतवणूक आहे. ओपन एआय डेटा सर्च करण्यासाठी मायक्रोसॉफ्टची क्लाउड सिस्टम ‘अॅझ्युअर’चा वापर करते.

मोफत सेवा

कंपनी चॅट-जीपीटीची सेवा सध्या सर्वांसाठी मोफत देत आहे. मात्र, चॅट-जीपीटीची माहिती मिळाल्यानंतर त्याचा वापर वापरकर्त्यांकडून वाढला आहे. आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी चॅट-जीपीटीचा वापर केला. वापर वाढल्याने कंपनी या सेवेवर भविष्यात शुल्क आकारण्याचाही विचार करत आहे.

अधिक संशोधन सुरू

चॅट-जीपीटीला काही अयोग्य प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नाकारण्याची प्रणालीही यामध्ये विकसित करण्यात आली आहे. जेणेकरून चुकीच्या कारणांसाठी या चॅटबुटचा वापर टाळता येईल. (उदा. समाजविघातक बाबी). मात्र, अद्याप यावर अधिक संशोधन सुरू आहे. त्यामुळे यातून कदाचित वापरकर्त्यांना एकांगी उत्तरे मिळू शकतात. परंतु, यावर अधिक संशोधन झाल्यानंतर त्यातील अचूकता आणखी वाढण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Technology