आता WhatsAppच्या E-wallet वरूनही पाठवता येणार पैसे ; NCPI ने दिली परवानगी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 6 November 2020

मागील बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअप पेमेंट सेवा सुरु करण्याच्या प्रयत्नात होते.

नवी दिल्ली: व्हॉट्सअपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआयवर येण्याची परवानगी दिली आहे. NPCIच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकानुसार, व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूपीआय यूजर बेस सेवा टप्प्याटप्प्याने वाढवू शकणार आहे, व्हॉट्सअपची UPI सेवा जास्तीत जास्त दोन कोटी नोंदणीकृत युजर्सपासून सुरू होऊ शकते. सध्या पेटीएम, गुगल पे आणि फोन पे हे डिजिटल पेमेंट मार्केटमधील प्रसिध्द ऍप आहेत. हे ऍप व्हॉट्सऍपला मोठी टक्कर देऊ शकतात.

पाठपुरावा खूप दिवसांपासून-
मागील बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअप पेमेंट सेवा सुरु करण्याच्या प्रयत्नात होते. कारण व्हॉट्सअपला भारतातील डिजीटल पेमेंट मार्केटमध्ये यायचे होते. मागील वर्षी जुलैमध्ये व्हॉट्सअपचे ग्लोबल हेड  Will Cathcart काही उच्च अधिकाऱ्यांसोबत भारतात आले होते. ते RBI, NPCI आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे अधिकारी आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांना भेटले होते. माध्यमांशी बोलताना  Cathcart यांनी सांगितले होते की, कंपनीची डिजीटल पेमेंट सेवा 2019 मध्ये सुरु करण्याचा मानस आहे. पण ते काही अडचणींमुळे रखडले गेले होते.  

भारत ही मोठी बाजारपेठ-
व्हॉट्सअपसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअपच्या 1.5 अब्ज युजर्संपैकी 40 कोटी युजर्स भारतातील आहेत. सध्या भारतात UPIवर आधारित 45 पेक्षा जास्त ऍप आहेत, जे डिजीटल पेमेंट सेवा पुरवतात. यामध्ये गुगल पे, अॅमेझॉन पे, फ्लिपकार्ट आणि फोन-पे अशा प्रकारची ऍप आहेत. तसेच 140 बॅंकाही डिजीटल पेमेंट सेवा देतात यामध्ये पेटीएम पेमेंट्स बँक, एअरटेल पेमेंट्स बँक आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे.

NPCIची थर्ड पार्टी  ऍप  प्रोवाइडर्सवर 30% मर्यादा-
 एनपीसीआयने यूपीआयमधील एकूण प्रक्रिया केलेल्या व्यवहारांच्या एकूण प्रमाणावर 30 टक्के मर्यादा लागू केली आहे. हा नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल. यूपीआयचे दर महिन्याला 2 अब्ज व्यवहार आणि भविष्यातील वाढ लक्षात घेता हे करण्यात आले आहे, असे एनपीसीआयने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp approves UPI based system from NPCI