esakal | व्हॉटस्‌ ॲपवरचा मेसेज आणि बरंच काही...
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॉटस्‌ ॲपवरचा मेसेज आणि बरंच काही...

व्हॉटस्‌ ॲपवरचा मेसेज आणि बरंच काही...

sakal_logo
By
प्रफुल्ल सुतार

व्हॉटस्‌ ॲपवर काही वेळेस चुकून मेसेज पोस्ट होतो, मात्र तो मागे घेता येत नाही. एकदा मेसेज पडला की पडला. त्यामुळे मन:स्ताप होतोच. शिवाय त्याबद्दल खेदही व्यक्‍त करण्याची वेळ येते. असा चुकून पोस्ट होणारा मेसेज मागे घेण्यासाठी व्हॉटस्‌ॲपकडून ‘रिकॉल’ (Recall) हे बटण देण्यात येणार आहे. या सुविधेविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. मात्र याच्या टेस्टिंगचे छायाचित्र ‘लिक’ झाल्यानंतर ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याच्या शक्‍यतेला बळ मिळाले आहे. ट्विटरवर याचा स्क्रिन शॉट पोस्ट करण्यात आला आहे. टेस्टिंगसाठी काही मोजक्‍या युजर्सना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशाप्रकारची सुविधा ही व्हॉटस्‌ ॲपसाठी अनोखी तसेच महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. 

‘रिकॉल’चे या वर्षीच्या सुरुवातीपासून टेस्टिंग सुरू असून ती व्हॉटस्‌ ॲपच्या नवीन व्हर्जनवर उपलब्ध करून दिली जाऊ शकते. यामध्ये मजकूर, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ फाईल, डॉक्‍युमेंटस्‌, कोटस्‌ मेसेज तसेच स्टेटस्‌ रिप्लाय या गोष्टी मागे घेता येणार आहेत. व्हॉटस्‌ ॲप ग्रुप अथवा एखाद्याला चुकून मेसेज टाकल्याचे लक्षात आल्यास ‘रिकॉल’चा वापर करून तो मागे घेणे शक्‍य होईल. मात्र त्यासाठी मेसेज पाठविल्यानंतर पाच मिनिटांचा अवधी असणार आहे. टाकलेला मेसेज वाचला गेल्यास, तो परत घेण्यासाठी मात्र ‘रिकॉल’ चा उपयोग होणार नाही. सध्या व्हॉटस्‌ ॲपवर युजरला त्याच्या स्वतःच्या फोनवरील मेसेज डिलिट करता येतो.

वर्षभरापूर्वी व्हॉटस्‌ॲपशी स्पर्धा करण्यासाठी आलेल्या ‘टेलिग्राम’ या इन्स्टंट मेसेजिंग ॲपमध्ये अशा प्रकारची एक सुविधा आहे की, ज्यामध्ये युजरला त्याने पोस्ट केलेले मेसेज डिलिट करता येतात. व्हॉटस्‌ॲपच्या वापरकर्त्यांना ‘रिकॉल’बरोबरच आणखी एक सुविधा मिळणार आहे. 

‘लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग’ असे या सुविधेचे नाव असून त्याचेही टेस्टिंग सध्या सुरू आहे. 

या सुविधेमुळे ग्रुपमधील मित्रांचे ‘रिअल टाईम’ म्हणजे जिथून ते लाईव्ह असतील ते ठिकाण समजू शकणार आहे. ही सुविधा, कशा पद्धतीने काम करेल, याबाबतची माहिती सध्या तरी उपलब्ध करण्यात आलेली नाही. ‘रिकॉल’ची सुविधा व्हॉटस्‌ॲपच्या ‘2.17.30+’ या नवीन व्हर्जनवर मिळू शकते. मात्र याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

हे माहीत असू द्या...
सध्या व्हॉटस्‌ॲपचा वापर जगभरातील सुमारे १२० कोटी लोक करीत आहेत, तर भारतातील २० कोटी लोक व्हॉटस्‌ ॲपवर कार्यरत आहेत. मराठीसह १० भारतीय भाषांसह जगभरातील ५० भाषांमध्ये व्हॉटस्‌ॲप वापरता येते.

loading image