भटकंती : भुलेश्‍वरच्या लेणी

Bhuleshwar-Caves
Bhuleshwar-Caves

पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्‍वर. तेराव्या शतकात बांधलेले हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून भटक्यांमध्ये ओळखले जाते. हा पूर्वी एक लहानसा किल्ला होता. दौलत-मंगलगड त्याचे नाव. कालौघात किल्ल्याचे फार थोडे अवशेष शिल्लक राहिले आहेत.

पुराणकालात देवी पार्वतीने इथे भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि त्याची महादेवांना भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा विवाह संपन्न झाला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली म्हणून हे ठिकाण भुलेश्‍वर म्हणून ओळखले जाऊ लागले.

भुलेश्‍वरला पोचण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलीकडेच उजवीकडे भुलेश्‍वर आणि माळशिरसकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेलात, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनोऱ्याच्या दिशेला जायचे.

या जुन्या मनोऱ्याच्या शेजारीच भुलेश्‍वराचे मंदिर आहे. बाहेर असणाऱ्या चिंचेच्या झाडावर अनेक पोपट आणि घुबड हमखास दिसतील. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढून गेल्यावर एक लहान दरवाजा आहे. आत प्रवेश केल्यावर विशेष असे काही दृष्टीस पडणार नाही आणि थोडा भ्रमनिरास होईल. पण परकीय सत्ताक्रमणांपासून आपली दैवते सुरक्षित ठेवण्याची ही नामी क्लृप्ती आहे. शत्रूला वाटावे संपले मंदिर, अशी व्यवस्था आहे. आत अजून एक लहानसा दरवाजा आढळतो.

संकटसमयी हा दरवाजा एखादा ताशीव शिलाखंड लावून, भेगा लिंपून बेमालूमपणे बंद करून टाकायचा, की आत मंदिर सुरक्षित! त्या दरवाजातून आत गेले की दोन्ही बाजूंना जाणारे दगडी जिने आहेत. त्यावरून आपण मुख्य बंदिस्त मंदिर वास्तूत प्रवेश करतो आणि आजूबाजूचे दृष्य हरखून टाकते. पुरुषभर उंचीचा नंदी, त्यावर एक दगडी मंडप, जिथे नजर जाईल तिथे अप्रतिम कोरीव काम केलेली शिल्पे. ही सर्व वास्तुशिल्पे लहान दरवाजाच्या आड लपवून परकीय आक्रमणापासून वाचवण्याची बुद्धिमत्ता मंदिर निर्मात्याने योजली आहे. काही मूर्ती भग्नावस्थेत आहेत, पण आजही त्यांचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. 

धीरगंभीर पवित्र वातावरणात मुख्य गर्भगृहात पिंडीवर सतत अभिषेक चालू असतो. दर्शनानंतर मंदिर सौंदर्य पाहायला सुरुवात केल्यावर आपली नजरच हटत नाही. पहाल तिकडे मोहक, रेखीव शिल्पांची जादुई नगरीच. पुराणातले युद्ध प्रसंग, शरभ, व्याल, सूरसुंदरी, कीर्तिमुखे, गणेशपट्टिका अशा अनेक शिल्पांनी आपण स्तंभित होतो. महाराष्ट्रात फक्त मोजक्या ठिकाणी असणारे दुर्मीळ स्त्री-गणेशाचे म्हणजे वैनायकी शिल्प या ठिकाणी आहे. प्रत्येक शिल्प आणि खांब न्याहाळून पाहताना, त्याच्या निर्मात्या हातांना आपण आपोआपच नमन करतो.
तर मग कधी जाताय भुलेश्‍वरला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com