भटकंती : आवडीनुसार ठरवा प्लॅन

Tourism
Tourism

वाचकहो, आजपर्यंत आपण या सदरात अनेक एका दिवसाच्या भटकंतीयोग्य ठिकाणांबद्दल माहिती घेतली. अनेक जण काही ठिकाणी जाऊनही आले. काहीजण प्लॅन करत असतानाच जगावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत आपणांस ‘भटकंती अनलिमिटेड’कडून घरात राहण्याचाच सल्ला देत आहोत. परंतु, घरात राहूनही आपण पुढील काळात सगळे सुरळीत झाल्यावर करावयाच्या भटकंतीसाठी कशी तयारी करता येईल, स्थळांची निवड कशी करावी, भटकंती करताना काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊ. 

स्थळांची निवड
भटकंतीसाठी एखादे ठिकाण कसे ठरवावे, याची अनेक परिमाणे असतात. हाताशी किती वेळ आहे, सहभागी होणाऱ्या सदस्यांची आवड काय आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, कुठला ऋतू सुरू आहे, किती प्रमाणात सुखसुविधा हव्या आहेत यांवर ठिकाण ठरवावे.

आजकाल बऱ्याच ठिकाणांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. अनेक ब्लॉग, व्हिडिओ, मासिके, वृत्तपत्रे आणि पुस्तके, आधी जाऊन आलेल्या मित्रमंडळी-नातेवाईकांकडून मिळणारी माहिती यातून ही माहिती संकलित करता येते. आपणही या सदरातून दर आठवड्याला एका दिवसात करता येतील, अशा स्थळांची माहिती घेत असतोच. 

स्थळ निवडताना शक्यतो गर्दीपासून दूर असलेली जागा निवडावी. आपण शहरापासून दूर भटकंतीसाठी जातो, तेच मुळात शहरी गोंगाट, गोंधळ यांपासून दूर, शांतता लाभावी, प्रियजनांसोबत काही वेळ निवांत घालवावा यासाठी. तेव्हा गर्दीची ठिकाणे टाळलेलीच बरी. असे करताना आपल्याला लागणाऱ्या किमान सुविधा आणि गरजा उपलब्ध होतील, अशी ठिकाणे निवडावीत.

हाताशी किती वेळ उपलब्ध आहे आणि प्रवास कसा करणार आहोत यावर एक दिवसाचे, दोन किंवा तीन दिवसांचे, तीन ते सहा दिवसांचे आणि सहापेक्षाही अधिक दिवसांचे असे वेगवेगळे बेत ठरवता येतात. याशिवाय सहभागी सदस्यांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती यांचा सहभाग हाही आपण जात असलेले ठिकाण ठरवण्यात एक महत्त्वाचा मापदंड आहे. सहभागी सदस्यांना भटकंतीमधून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाज आधीच घ्यावा. काहींना फक्त रुटीनमधून ब्रेक हवा असतो, काहींना निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणे आवडते, तर काहींना त्या-त्या स्थळांच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. काही सदस्यांना ट्रेक, जंगल ट्रेलसारख्या जागा आवडतात. अगदी लहान मुले असतील, तर त्यांची सोय लक्षात घ्यावी. त्यांना लागणारे दूध, साधे फिके पदार्थ यांची उपलब्धता लक्षात घ्यावी. ज्येष्ठ मंडळींसाठी चढउतार करण्यास सोयीस्कर अशा जागा असाव्यात.

याशिवाय कुठल्या ऋतूमध्ये आपण ही भटकंती करणार, आहोत हेही महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्रात आणि आसपासच्या राज्यांतही भटकंती करण्यास साधारण जून ते जानेवारीअखेर हा उत्तम कालावधी असतो. त्यात जून ते ऑगस्ट हा काळ खास ओल्याचिंब पावसाळी भटकंतीचा, सह्याद्री आणि त्याच्या अंगाखांद्यावर पावसाचा आनंद घेण्याचा तर ऑगस्टपासून पुढे विविध स्थलदर्शनाचा काळ असतो. त्यादृष्टीने स्थळांचे नियोजन करावे. उत्तरेकडील राज्यांत हा कालावधी एक ते दीड महिना मागे असतो. 

भटकंती करताना मुक्काम करायचा झाल्यास त्याची सोय काय आहे, तिथे काय सुविधा आहेत, टॉयलेट आणि खोल्यांची स्वच्छता हेही महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अशा मुक्कामाच्या सोयीचे आधी भेट दिलेल्या लोकांचे अनुभव जाणून घ्यावेत. शक्यतो त्याचे आधी बुकिंग करावे. 

बरे, हे एकदम सहलीचे बेत ठरल्यावर प्लॅन करावे असे नाही. यासाठी प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी टिपण वही तयार करावी. त्यात एक दिवसाची, दोन ते तीन दिवसांची, पाच सहा दिवसांची अशी वेगवेगळी ठिकाणे लिहून काढावीत. प्रत्येक ठिकाणाची आपल्याला मिळालेली माहिती, त्याचे अंतर, त्याचे वैशिष्ट्य, वृत्तपत्रे आणि मासिकांची कात्रणे, इंटरनेटवरून मिळालेली माहिती, त्यासंबंधीची पुस्तके आणि त्याचे पान क्रमांक, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, जवळचे पोलीस स्टेशन, रुग्णालय यांचे संपर्क, मदतीला येणारे संपर्क, हॉटेलचे नंबर असे सगळे टिपून ठेवावे. अशी टिपणवही किंवा फाईल कायम आपल्याला उपयोगी पडते, सहा महिन्यांतून एकदा त्यातील माहिती अद्ययावत करत राहावी. आनंददायी भटकंतीसाठी एवढे तर करायलाच हवे!
पुढील लेखात आपण भटकंतीच्या तयारीविषयी माहिती घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com