भटकंती : चिरेबंदी इतिहासाचा अनुभव (सिंधुदुर्ग)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

कसे जाल? 
पुण्याहून सुमारे ३९०, मुंबईहून ४७५, कोल्हापूरहून १५१ किलोमीटर. 
मुक्काम : मालवणमध्ये निवास आणि भोजनाची उत्तम सोय आहे. अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सर्वाधिक आकर्षण असलेलं ठिकाण म्हणजे मालवण. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी ते प्रसिद्ध आहे.

मालवणच्या चिवला किनाऱ्यावर उभं राहिलं, की समोर भर सिंधुसागरात दिसतो सिंधुदुर्ग किल्ला. चार शतकांहून अधिक काळ समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या किल्ल्याची तटबंदी आजही तेवढीच मजबूत आहे. सतराव्या शतकात २५ नोव्हेंबर १६६४मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते कुरटे नावाच्या खडकाळ बेटावर पायाभरणी झाली. मोरयाचा दगड या नावानं ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून, त्या जागी महाराजांनी पूजा केली. तटबंदीच्या पायासाठी दोन हजार खंडीहून (सुमारे आठ टन) अधिक लोखंडाचा वापर करण्यात आला. तटबंदीसाठी बेटावरचेच दगड वापरण्यात आले. दोन दगडांमध्ये मजबुतीसाठी शिसं वापरण्यात आलं. काम पूर्ण करण्यास तीन वर्षं लागली. ज्या चार मच्छिमार बांधवांनी ही जागा शोधली, त्यांना गावं इनाम देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण किल्ला एकूण ४८ एकरांवर आहे. तटाची उंची ३० फूट असून रुंदी १२ फूट आहे. तटबंदीची एकूण लांबी सुमारे तीन किलोमीटर आहे. तटबंदीमध्ये २२ बुरूज आणि ४५ दगडी जिने आहेत. किल्ल्यात आणखी एक चमत्कार आहे. भर समुद्रातल्या या किल्ल्यात दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव अशा गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. छत्रपती राजाराम महाराजांनी इसवीसन १६९५मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शंकराच्या रूपात शिवराजेश्‍वर मंदिर बांधलं. 

आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस आहे. तटाजवळ बोटीतून उतरल्यानंतर उत्तराभिमुख खिंडीतून आत गेल्यानंतरच हे प्रवेशद्वार दिसतं. आत प्रवेश केल्यानंतर मारुतीचं एक छोटं मंदिर आहे. बुरुजावर जाण्याचा मार्ग इथंच आहे. 

किल्ल्याच्या पश्‍चिम भागात जरीमरीचं मंदिर आहे. किल्ल्यात २२८ फूट उंचीचा ध्वजस्तंभ होता. खूप दूरवरून तो सहज दिसत असे. गडावर बहुतेक बुरुजांवर तोफा होत्या. शत्रूवर मारा करण्यासाठी बंदुकांसाठी झरोके आहेत. भारत सरकारनं २१ जून २०१० रोजी हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. किनाऱ्यावर स्नॉर्केलिंग, विविध प्रकारच्या बोट राइड्स, चिवला आणि जवळच प्रसिद्ध तारकर्ली बीच आहे. मालवण परिसर सागरी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on sindhudurg fort tourism