भटकंती : रेहेकुरी अभयारण्य (जि. नगर) काळविटांचे आश्रयस्थान

Antelope
Antelope

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यात रेहेकुरी अभयारण्य आहे. हरणांच्या कुरंग गटातील काळविटांसाठी ते आरक्षित आहे. काळवीट रक्षणाचा कायदा झाल्यानंतर १९८०मध्ये या अभयारण्याची स्थापना झाली. येथील माळरानात लावलेल्या विविध प्रकारच्या गवतात शेकडो काळवीट बागडत आहेत. खुरटी झुडपं आणि गवताळ प्रदेशात राहणारा काळवीट हा अँटिलोप वर्गातील आहे. काळविटाखेरीज येथे माळठिसकी, म्हणजे चिंकारा (इंडियन गझेल) हा तांबूस-पिंगट रंगाचा प्राणी दिसतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गवतात चरणारे, खुल्या माळरानावरून धावणारे काळवीट आणि चिंकारा पाहणे आनंददायी असते. 

वेगाने धावणारे व दुडुदुडु उड्या मारणारे हरीण सर्वांना आवडते. हरणांमध्ये दिसायला सुंदर, वेगवान आणि चपळ अशी काळविटाची ओळख आहे. या अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ कुरणे आणि बाभळीच्या झाडांनी व्यापला आहे. रेहेकुरी अभयारण्य काळविटांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येथे काळवीट पाहण्यासाठी येतात. पर्यटकांना काळविटाबरोबरच कोल्हा, लांडगा, चिंकारा आदी वन्यप्राण्यांचेही दर्शन घडते. 

अभयारण्यात झाडे आणि झुडपांच्याही विविध प्रजाती आहेत. अभयारण्याच्या परिसरात १९८०मध्ये काळविटांच्या संख्येत कमालीची घट होऊन केवळ १५ ते २० काळवीट उरले होते. त्यामुळे काळविटांचे संरक्षण करण्याच्या खास हेतूने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. रेहेकुरी अभयारण्य हे शुष्क काटेरी वन या प्रकारामध्ये येते. या अभयारण्याचा परिसर प्रामुख्याने गवताळ असल्याने या परिसरातून चालण्याचा वेगळाच आनंद पर्यटकांना घेता येतो. त्याचप्रमाणे पर्यटक येथे दुर्बिणीद्वारे काळवीट व इतर प्राणी पाहण्याचाही आनंद घेतात. रेहेकुरी अभयारण्याजवळ भेट देण्यासारखी इतरही ठिकाणे आहेत. अभयारण्याजवळच असलेल्या भिगवण येथील तलावावर विविध फ्लेमिंगोंसह स्थलांतरित व मूळ रहिवासी असलेले विविध जलपक्षी पाहण्याचा अनुभव घेता येतो. सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. रेहेकुरी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी आहे. सुरुवातीला काळविटांची संख्या कमी असल्याने फारशी अडचण येत नव्हती. मात्र, काळविटांची संख्या वाढत असल्याने अभयारण्य त्यांच्यासाठी अपुरे पडत आहे.

  • प्रमुख वृक्ष आणि वनस्पती : कडुनिंब, बोर, तरवड, खैर, हिवर, बोर, बाभूळ, मारवेल, डोंगरी, कुसळी, पवन्या 
  • प्रमुख प्राणी : काळवीट, साळिंदर, कोल्हा, लांडगा, चिंकारा, तरस, मुंगूस, खोकड 
  • प्रमुख पक्षी : घार, भारद्वाज, चंडोल, सुतार, तितर, माळढोक, कापशी, सातभाई इत्यादी.
  • स्थापना : १९८० 
  • क्षेत्रफळ : २.१७ चौरस किलोमीटर 
  • जवळचे रेल्वे स्थानक : दौंड ८० किलोमीटर 
  • जवळचा विमानतळ : लोहगाव (पुणे) १६० किलोमीटर 
  • भेट देण्याचा काळ : ऑगस्ट ते जानेवारी

कसे जाल
पुण्याहून दौंड वालवडमार्गे रस्त्याने रेहेकुरीला जाता येते. 
राहण्याची आणि भोजनाची सोय - रेहेकुरी येथे पर्यटकांसाठी निरीक्षण कुटी असून, दोन कक्ष आणि हॉस्टेलमध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय होऊ शकते. परिसरात आता हॉटेलची संख्या वाढल्याने भोजनाची सोय होऊ शकते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com