esakal | Video : संस्कृती, सौंदर्याने नटलेले लेह-लडाख!
sakal

बोलून बातमी शोधा

Video : संस्कृती, सौंदर्याने नटलेले लेह-लडाख!

कसे जाल? -
श्रीनगर आणि मनालीहून रस्ता मार्गे. दिल्लीहून थेट विमानाने लेहला जाऊ शकता.

‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आलेल्या लेह-लडाखला त्याआधी भेट देणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. निसर्गाची भरभरून देणगी लाभलेला आणि ती जपलेला ‘लेह-लडाख’ हा प्रदेश आश्‍चर्यांची जणू खाणच! इथे बर्फ पडतो, वाळवंटही आहे, मूनलॅंडही आहे, त्याचबरोबर जगातील सर्वांत उंच रस्ताही (जिथे वाहने जाऊ शकतात) आहे...

Video : संस्कृती, सौंदर्याने नटलेले लेह-लडाख!

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

वीकएंड पर्यटन - सुवर्णा येनपुरे-कामठे
‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आलेल्या लेह-लडाखला त्याआधी भेट देणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. निसर्गाची भरभरून देणगी लाभलेला आणि ती जपलेला ‘लेह-लडाख’ हा प्रदेश आश्‍चर्यांची जणू खाणच! इथे बर्फ पडतो, वाळवंटही आहे, मूनलॅंडही आहे, त्याचबरोबर जगातील सर्वांत उंच रस्ताही (जिथे वाहने जाऊ शकतात) आहे... आणि त्यासोबतच मनाला प्रफुल्लित करणारा निसर्ग, स्वच्छ हवा!
भारताबाहेर फिरायला जायची अनेकांची इच्छा असते, तसे प्लॅनही होतात, पण त्याआधी भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेली सुंदर ठिकाणे तुम्ही पाहायला हवीत. फिरण्यासाठी तुम्ही अगदी जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणी भेट दिली असेल, पण लडाखची खासियतच वेगळी आहे. इथला प्रवास आव्हानात्मक असला तरी तेवढाच रोमांचक आहे.

श्रीनगर किंवा मनालीमार्गे लडाख करणार असल्यास हळूहळू उंची वाढत जाते आणि तुम्हाला त्रास होत नाही. तेच दिल्लीवरून थेट विमानाने गेल्यास तुम्हाला उंचीचा फरक लगेच जाणवू लागतो आणि त्रास होण्याची शक्यताही खूप असते. लडाखमध्ये गेल्यानंतर शक्यतो एक दिवस आराम करून मगच फिरायला सुरुवात करावी. आपण उंचीवर असल्याने तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे आपल्याला वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागू शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इथे आल्यावर पुढचा प्रश्‍न असतो मी इथे कसे फिरणार, फिरण्यासाठी काही परवानगी आवश्‍यक असते का, राहण्याची सोय वगैरे. यावर मूळ लडाखचे रहिवासी असणारे स्टॅनझिन गुरमेट उत्तर देतात, ‘तुम्ही इथे येणार असल्याची आगाऊ कल्पना स्थानिक ट्रॅव्हल एजंटला दिल्यास तुमच्या राहण्याची व प्रवासाची सोय करतात. या ठिकाणी प्रवास करण्यासाठी (इनर लाइन परमिट) परवानगी लागते, ती लेखी परवानगी मिळवण्याचे कामही आमच्या सारखे ट्रॅव्हल एजंट करतात. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाचा वेळ वाचतो.’

लडाखमध्ये आल्यानंतर रोजच्या जीवनातील ताणतणाव विसरून जायला होते. या ठिकाणी हेमीस, अल्ची, प्यांग, लिकिर, स्पिटुक, थिक्से अशी अनेक बौद्ध धर्मीय मॉनेस्ट्रीज म्हणजेच मठ पाहायला मिळतात. बहुतांशी मठ हे प्राचीन काळातले असल्यामुळे प्रत्येकाचे वेगळे महत्त्व आहे. अप्रतिम वास्तुकलेचा नमुना असलेल्या मठांबरोबर येथील शांत, सुंदर असलेल्या बुद्धांच्या मूर्तीच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. गिर्यारोहक आणि फोटोग्राफर्ससाठी लडाख म्हणजे नंदनवनच! 
लडाखला आल्यानंतर अनेकजण पेंगाँग या ठिकाणी राहायला पसंती देतात. ‘थ्री इडियट्स’मध्ये शेवटच्या सीनमध्ये पेगाँगचा तलाव तुम्ही पाहिला असेलच. पारदर्शक नितळ पाणी आणि सुखावणारे नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ठिकाणाचे वेगळेपण म्हणजे हा तलाव सकाळ-दुपार-संध्याकाळ पूर्णपणे वेगळा दिसतो. येथील वातावरण शुद्ध असल्याने पहाटे आपल्याला संपूर्ण सूर्यमालेचे दर्शनच घडते. दुर्मीळ अशा काळ्या मानेचे सायबेरियन क्रेनही इथे दिसतात. या पक्ष्यांची प्रजोत्पादनाची ही जागा आहे, असे म्हटले जाते. त्सो मोरीरी या तलावाबद्दल तुम्ही ऐकले नसेल, पण हे स्थळही प्रेक्षणीय आहे.

गुरमेट सांगतात, ‘इथे लेह टॅक्सी युनियन आहे. तुम्ही त्यामार्फत एखादी टॅक्सी बुक करून फिरू शकता. सर्वांचे दर मीटरप्रमाणेच घेतले जातात. परंतु, जगातील सर्वाधिक उंचीवरच्या रस्त्यावर स्वतः ड्राइव्ह करून जाण्याची मजा काही औरच असते. तुम्हाला बाईक चालवायची आवड असेल आणि या रस्त्यावरील वातावरणाचा आनंद घ्यायचा असल्यास इथे भाडेतत्त्वावर बाईकही उपलब्ध करून दिल्या जातात. रस्त्याच्या उंचावर पोचल्यावर तिथे जाऊन मस्तपैकी कॉफीचा घोट घेतल्यावर स्वर्ग सुखाचा अनुभव मिळतो. लेहमध्ये तुम्हाला शाही सौंदर्याचा आविष्कार करणारा शांती स्तूप पाहायला मिळतो. बुद्धाचे पुतळे, जुनी, दुर्मीळ हस्तलिखितेही पाहायला मिळते.

बर्फातील वाळवंट हे ही या ठिकाणचे वेगळेपण आहे. सध्या इटली, फ्रान्स, जपान, जर्मनी, थायलंड या देशातील लोकांसोबत इथे भेट देणाऱ्या भारतीय लोकांचीही संख्या वाढत आहे. लडाख म्हणजे ऑल इन वन पॅकेज आहे. आजपर्यंत आम्ही त्याचे सौंदर्य जपले आहे. विकासाच्या नावाखाली या नैसर्गिक देणगीची धुळधाण होऊ नये, असे मनापासून वाटते. विकास नक्कीच व्हावा, पण हे सगळे जपायला हवे.’  
समृद्ध संस्कृती, प्राचीन वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे लडाखहून आल्यानंतरही पुढील कितीतरी काळ तुमचे मन तुम्ही तिथेच ठेवून आल्याची अनुभूती मिळते.