भटकंती : माळशेज घाट पश्‍चिम घाटातलं सौंदर्यस्थळ

Malshej-Ghat
Malshej-Ghat

पश्‍चिम घाट, जगातील सर्वाधिक जैववैविध्य असलेली डोंगररांग. या रांगेत अनेक उंच शिखरं आहेत. महाराष्ट्रातलं कळसूबाई (१६४६ मीटर) हे सर्वांत उंच शिखर. त्याखालोखाल साल्हेर (१५६७ मीटर), महाबळेश्‍वर (१४३८ मीटर) आणि हरिश्‍चंद्रगड (१४२४ मीटर) ही शिखरं आहेत. भारतात सरीसृपांच्या किमान १८७ जाती आहेत. त्यापैकी निम्म्या सह्याद्रीत आढळतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सपुष्प वनस्पतींच्या ४००० जाती इथं आढळतात. त्यांपैकी १४०० या केवळ सह्याद्रीपुरत्या मर्यादित आहेत. तेरड्याच्याच ८६ पैकी ७६ या केवळ सह्याद्रीतच दिसतात. सह्याद्रीत ५ हजारांहून अधिक फुलझाडं, १३९ प्रकारचे प्राणी, ५०८ प्रकारचे पक्षी आणि १७९ प्रकारचे उभयचर जीव आढळतात. सह्याद्रीच्या महाराष्ट्रातल्या रांगेत महाबळेश्‍वर, पाचगणी, माथेरानबरोबरच आणखी एक थंड हवेचं ठिकाण विकसित झालंय. समुद्रसपाटीपासून केवळ ७५० मीटर उंचीवर असलेला माळशेज घाट. हा घाट पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. वर्षातल्या तीनही ऋतूंमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारं हे ठिकाण. पुणे, मुंबई आणि नाशिकच्या पर्यटकांनी हे ठिकाण सदैव गजबजलेलं असतं. पावसाळ्यात इथं धुवाधार पाऊस पडतो. लहानमोठे धबधबे, हिरव्यागार टेकड्या आणि सुखद हवामानाचं वरदान या परिसराला लाभलंय. माळशेजला निसर्गाची विपुलता तर पाहता येतेच, त्याशिवाय घनदाट जंगलांमध्ये विविध प्रकारच्या वन्यपशू आणि पक्ष्यांनी आश्रय घेतला आहे. या परिसरात असलेल्या अनेक किल्ल्यांमुळं, साहसी पर्यटकांचं हे नेहमीच आकर्षण ठरलंय. पावसाळ्यात दाट धुक्याची चादर पांघरलेला हा प्रदेश, पर्यटकांना खुणावत असतो. 

माळशेज घाटाजवळच साहसी पर्यटकांचा आवडता हरिश्‍चंद्रगड, भैरवगड आणि आजोबा किल्ला आहे. इथून जवळच नाणेघाट आणि गोरखगडही आहे. माळशेजपासून सुमारे २६ किलोमीटरवर पुष्पवती नदीवर बांधलेलं खुबी गावाजवळ पिंपळगाव जोगा धरण आहे. धरण परिसर हा पक्ष्यांचं माहेरघर आहे. इथल्या निसर्गरम्य परिसरात, अनेक चित्रपटांचं चित्रीकरण होतं.

घाटाच्या पायथ्याला थितबी नावाचं आदिवासी गाव लागतं. इथून वाटाड्या घेतल्यास, थितबी धबधब्यापर्यंत जाता येतं. हा अनुभव थ्रिलिंग आहे. धबधब्याच्या खाली मोठा जलाशय असून तिथल्या खोल पाण्यात जलक्रीडेचा आनंद घेता येतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com