निसर्गाचा चमत्कार - लोणार सरोवर

अरविंद तेलकर
Friday, 6 December 2019

कसे जाल?
पुणे, नगर, औरंगाबाद, जालनामार्गे ३७५ किलोमीटर. मुंबईहून पुणे, नगर, औरंगाबाद, जालनामार्गे ५१९ किंवा ठाणे, मुरबाड, घाटघर, वेल्हे, नगर, पैठण, अंबडमार्गे ५१२ किलोमीटर. औरंगाबादहून १५० किलोमीटर. लोणारला एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे. त्याशिवाय बजेट हॉटेलही उपलब्ध आहेत.

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
पृथ्वीतलावर मानवनिर्मित आश्र्चर्यं खूप आहेत. अगदी इजिप्तच्या पिरॅमिडपासून भारतातल्या ताजमहालापर्यंत. मानवी बुद्धिमत्तेची भरारी कुठपर्यंत जाऊ शकते, हे यावरून सहज लक्षात येईल. तथापि, निसर्ग हा अद्वितीय आणि कसबी कारागीर आहे.

मानवी आश्र्चर्यांपेक्षा निसर्गानं निर्माण केलेली आश्र्चर्यं, ही अधिक देखणी आणि मानवी मती कुंठित करणारी आहे. अमेरिकेतलं ग्रँड कॅन्यन घ्या किंवा अॅमेझॉनचं जंगल, गगनाला गवसणी घालणाऱ्या हिमालयापासून अरबस्तानातल्या सर्वव्यापी वाळवंटापर्यंत सर्व काही निसर्गनिर्मित आहे. ही आश्र्चर्यं अधिक महान आहेत.

अद्वितीय, अद्‍भुत आणि रहस्यमय, असं ज्याचं वर्णन करता येईल, असं एक निसर्गनिर्मित आश्र्चर्य भारतात आणि तेही महाराष्ट्रात आहे. अनेकांना त्याची कल्पना असेल, पण अनेकांना त्याचं रहस्य कदाचित ठाऊक नसावं. अशनीपातामुळं निर्माण झालेली विवरं आणि सरोवरं जगात अनेक ठिकाणी आढळतात. परंतु, अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं एकमेव विवर, जगात केवळ एकाच ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये आहे. निसर्गानं महाराष्ट्राला दिलेला हा जणू अनमोल ठेवाच आहे. त्या वेळी झालेल्या अशनीपातामुळं, पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांत एकूण चार विवरं तयार झाली होती. त्यापैकी दुसरं आणि तिसरं, उत्तर अमेरिकेतील अॅरिझोना आणि ओडेसा इथं आणि ऑस्ट्रेलियातल्या बॉक्सव्हिल् इथं चौथं. मात्र, अग्निजन्य खडकातलं लोणारचं हे एकमेवाद्वितीय ठरलं आहे. या सरोवराचं वय साधारणपणे ५ लाख ७० हजार वर्षं असल्याचं संशोधकांनी शोधून काढलंय. भारत सरकारनं या सरोवराला राष्ट्रीय भू-वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

बुलडाणा परिसरात बेसॉल्ट जातीचा दगड सापडतो. पृथ्वीवर ज्या काळात अनंत ज्वालामुखी होते, त्या काळात लाव्हारसामुळं या खडकाची निर्मिती झाली. या विवरात कालांतरानं पाणी जमा झालं. ते आश्र्चर्यकारकपणे खारं पाणी आहे. हे पाणी अल्कलीधर्मी आहे. कदाचित अशनीसोबत आलेल्या विविध क्षारांचा किंवा जिथं आदळली, तिथल्या जमिनीत असलेल्या क्षारांचा हा परिणाम असावा. अमेरिकेतली स्मिथसोनियन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे आणि भारतातल्या जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यांसारख्या नामवंत संस्थांनी या सरोवरावर बरंच संशोधन केलं आहे. सरोवराचं वय ५०,००० वर्षं सांगण्यात येत होतं. मात्र संशोधकांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर ते साधारण ५ लाख ७० हजार वर्षं असल्याचं निश्र्चित करण्यात आलं. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. ही अशनी पूर्वेकडून ३५ ते ४० अंशांच्या कोनातून आल्यामुळं हा आकार प्राप्त झाला. सरोवराचा व्यास १.८ किलोमीटर आहे.

हे सरोवर अशनीपातामुळं तयार झालं, हे आता सिद्ध झालं आहे. मात्र, प्रत्येक नैसर्गिक चमत्कारामागं एखादी दंतकथा असतेच. पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान विष्णूनं लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या राक्षसाच्या नावावरूनच या परिसराला लोणार असं नाव पडलं. ब्रिटिश राजवटीमध्ये जे. ई. अलेक्झांडर यानं या सरोवराची नोंद केली आहे. त्याचबरोबर आईनेअकबरी, पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही या विवराचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख विराजतीर्थ किंवा बैरजतीर्थ असा करण्यात आला आहे. सरोवराच्या संवर्धनासाठी लोणार सरोवर परिसर, वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात सुमारे १२०० वर्षांपूर्वीची मंदिरं आहेत. त्यापैकी १५ मंदिरं विवरातच आहेत.

मुख्य सरोवरापासून जवळच एक छोटा विवरवजा खड्डा आहे. त्यात हनुमानाचं मंदिर आहे. इतर बहुतेक मंदिरं आता नामशेष झाली आहेत, तर काहींचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. लोणार शहरात दैत्य सूदन मंदिर आहे. लवणासुराचा वध करणाऱ्या विष्णूचा गौरव करण्यासाठी हेमाडपंती पद्धतीचं हे मंदिर, चालुक्य राजांच्या राजवटीत सहाव्या ते बाराव्या शतकांच्या दरम्यान बांधण्यात आलं होतं. मंदिरातील मूर्ती दगडी असली, तरी त्यात धातूचा अंश मोठ्या प्रमाणात आहे. मध्यकालीन स्थापत्यशास्त्राचा हा अप्रतिम नमुना आहे. मंदिरामध्ये अनेक सुंदर शिल्प आहेत. मंदिराच्या मागे सूर्याची प्रतिमा आहे. हे मंदिर १०५ फूट लांब आणि ८४.५ फूट रुंद आहे.

गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप, असे मंदिराचे तीन प्रमुख भाग आहेत. अंतराळ भागात पौराणिक कथांवर आधारित प्रसंग कोरण्यात आले आहेत. लवणासूर वधाचा प्रसंगही त्यात आहे. गर्भगृहातली सध्याची मूर्ती नागपूरच्या भोसले राजघराण्यातर्फे बसवण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत सरोवरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पुण्याच्या सेंटर फॉर सिटिझन सायन्स या संस्थेनं काही वर्षांपूर्वी त्यादृष्टीनं पाहणी केली आणि त्यातून धक्कादायक सत्य बाहेर पडलं. या पाहणीसाठी उपग्रह छायाचित्रांची मदत घेण्यात आली होती. सरोवराला पाण्याचा पुरवठा करणारे एकूण पाच नैसर्गिक स्रोत आहेत.

यापैकी दोन स्रोत बंद पडले आहेत. या झऱ्यांचा स्रोत असलेल्या भागातूनच पाण्याचा बेसुमार उपसा करण्यात येत असल्यानं ही स्थिती उद्‍भवली आहे. सरोवरापासून १०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास बंदी आहे. तरीही बांधकामं झाली आहेत आणि अनेक बोअरवेल्सही घेण्यात आल्या आहेत. त्याचाही परिणाम पाणी घटण्यावर झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miracle of Nature Lonar lake