भटकंती  : अकोल्यातील सिद्धेश्वर मंदिर

पंकज झरेकर
Monday, 15 June 2020

या अकोलेच्या मंदिरांसोबत रतनवाडीचे अमृतेश्‍वर मंदिर, ताहाकारीचे जगदंबा मंदिर अशी प्राचीन मंदिरे पाहता येतील. सोबत भंडारदरा परिसराच्या निसर्गसौंदर्याचीही जोड देता येईल. 

नमस्कार मंडळी, 
आपण साधारण दोन-अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर वीकेंड भटकंती पुन्हा सुरू करतोय. पावसाळा काही दिवसांतच सुरू होईल, तर सुरुवात करूया एखादी लाईटवेट, कमी कष्टाची भटकंती घेऊन. आज पाहूया नगर जिल्ह्यातील अगस्तीनगरी अकोले आणि तेथील मध्ययुगीन कोरीव मंदिर सिद्धेश्‍वर. अकोलेला पोचण्यासाठी पुण्याहून आळेफाटा-संगमनेर-अकोले आणि नाशिकहून सिन्नर-गोंदे फाटा-दापूर-अकोले असा रस्ते मार्ग आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

अकोले गावात पोचल्यावर सिद्धेश्‍वर मंदिर शोधण्यास फारसे प्रयास पडणार नाहीत. गावातील जवळपास प्रत्येकास हे मंदिर ठाऊक असावे. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर त्याच्या विस्तीर्ण प्रांगणाची आणि मंदिराच्या शिल्प कौशल्याची चाहूल लागते. मंदिर कुठेही ऑइलपेंटने न रंगवता आणि कॉंक्रिटचा आधार न घेता नीट जपले आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीची आहे. मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरू आहे आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला आहे. मुख्य सभामंडपात खिडकीतून डोकावल्यास अनेक सुंदर मूर्तींच्या खजिन्याची झलक पाहावयास मिळते. मुख्य गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतल्यानंतर सभामंडपात जाण्यास आसपास चौकशी करावी. शक्यतो मंदिराच्या पुजाऱ्याकडे चावी असते. विनंती केल्यास ते कुलूप उघडून देतात. सिद्धेश्‍वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून, अतिशय नाजूक कोरीव काम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्य भागात अश्‍वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे समोर मांडून ठेवला आहे. या सर्व शिल्पकलेचा आस्वाद घेतल्यानंतर अकोले गावात चहा-नाश्त्याची सोय होऊ शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यानंतर गंगाधरेश्‍वर मंदिराचा रस्ता विचारावा. हे खासगी मालकीचे मंदिर अलीकडच्या काळात, म्हणजे पेशवाईत बांधले गेले आहे. एका अरुंद रस्त्याने पेठेतल्या एका गल्लीत असे विशाल मंदिर असेल याचा अंदाजही येत नाही. तिथे मालकांची परवानगी घेऊन हे मंदिर पाहता येते. विशाल वृक्षाच्या छायेत अतिशय सुबक शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल कोरलेले खांब, प्राचीन काचेची झुंबरे, प्रशस्त फरसबंदी आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू नये असे. 

या अकोलेच्या मंदिरांसोबत रतनवाडीचे अमृतेश्‍वर मंदिर, ताहाकारीचे जगदंबा मंदिर अशी प्राचीन मंदिरे पाहता येतील. सोबत भंडारदरा परिसराच्या निसर्गसौंदर्याचीही जोड देता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaj Zarekar article about Siddheshwar Temple in Akola

Tags
टॉपिकस
Topic Tags: