भटकंती :  आकर्षण चिंकाराचे

पंकज झरेकर
Saturday, 22 February 2020

सासवड आणि मोरगावच्या शेजारी हे छोटेखानी अभयारण्य आहे. एकूण क्षेत्र अगदीच पाचेक चौरस किलोमीटरचे असले तरी अफाट जैवविविधता इथे एकत्र नांदते. मुळात हा प्रदेश बेताच्या पावसाचा असल्याने मुख्यतः हे शुष्क पानझडीचं गवताळ रान आहे.

पुणे तिथं काय उणं! अगदी पुण्याच्या उशाला एखादं अभयारण्य आहे, असं म्हटलं तर कदाचित बऱ्याच जणांना आश्‍चर्य वाटेल. पण अगदी तास-दीड तासभराच्या अंतरावर ताम्हिणी आणि मयूरेश्‍वर ही अधिसूचित अभयारण्ये आहेत. त्यांपैकी आज मयूरेश्‍वर अभयारण्याची थोडी माहिती करून घेऊ. सासवड आणि मोरगावच्या शेजारी हे छोटेखानी अभयारण्य आहे. एकूण क्षेत्र अगदीच पाचेक चौरस किलोमीटरचे असले तरी अफाट जैवविविधता इथे एकत्र नांदते. मुळात हा प्रदेश बेताच्या पावसाचा असल्याने मुख्यतः हे शुष्क पानझडीचं गवताळ रान आहे. बोरीबाभळीची मुबलक झाडी. साहजिकच त्याच्या अनुषंगाने त्या अधिवासात टिकाव धरून राहणाऱ्या प्राण्यांचं इथं अस्तित्व आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे अभयारण्य चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याहून अर्ध्या दिवसात जाऊन हे अभयारण्यात भेट देता येते. चिंकाराबरोबरच विविध प्रकारचे बुलबुल, खंड्या, लाल आणि पिवळ्या गाठीची टिटवी, पाखर्डा (sandgrouse), कापशी घार, चंडोल, तितर, खाटीक, नीलपंख अनेक सरीसृपवर्गीय प्राणी, सर्पगरुड, मोर, कोल्हे, लांडगे, खोकड (hyena), जंगली कुत्री, ससे इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी या अभयारण्यात आढळून येतात. 

भटकंती  : दिवेआगरच्या आडवाटेने

पावसाळ्यानंतरच्या काही दिवसांत हा संपूर्ण परिसर हिरवागार होऊन जातो. गवतावर अनेक प्रकारची फुले येतात. अनेकविध जातींची फुलपाखरे सभोवार बागडत असतात. या वातावरणात दूरवर चरणारे चिंकारा हरणांचे कळप, भेदरून धावणारा एखादा ससा, आकाशात विहरणारा गरुड, ऊन खायला बाहेर आलेला सळसळता सोनेरी सर्प हे सगळं अनुभवण्यासाठी एकदा तरी या अभयारण्याला भेट द्यावीच. सध्या अभयारण्याच्या आसपास होणारे जागेचे प्लॉटिंग, त्याला केले जाणारे तार कंपाउंड हा सध्या तेथील प्राण्यांच्या अधिवासाला अडथळा ठरत आहेत. ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. 

मयूरेश्‍वर अभयारण्यासोबतच त्याला जोडून आसपासची जेजुरी, मोरगाव, भुलेश्‍वर, वटेश्‍वर ही मंदिरे, मल्हारगडचा किल्ला, सोनोरीची गढी इत्यादी ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट देता येईल. अभयारण्यात पर्यावरणास हानी होईल असे कुठलेही करू नये. 

कसे जाल  :  पुणे-सोलापूर महामार्ग-चौफुला-सुपे. सुपे गावाजवळ अभयारण्याची माहितीदर्शक पाटी आणि वन खात्याचे कार्यालय आहे. तिथे रीतसर नोंद करून आणि प्रवेशशुल्क भरून अभयारण्यात प्रवेश करावा. अभयारण्यात काही अंतरापर्यंत आत गाडीने जाता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaj zarekar article chinkara deer